सकाळ वृत्तसेवा
२२ जून २००९
नागपूर, महाराष्ट्र
पावसाळ्याच्या तोंडावर ऐरणीवर येणाऱ्या बालकुपोषणाच्या निर्मूलनासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असले, तरी कुपोषण थोपविण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यातील ३२.२ टक्के बालके कुपोषित तर ७,५४४ बालके ही कुपोषणाच्या सर्वांत दाहक असलेल्या चवथ्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. खुद्द सरकारनेही ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. अमरावती, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, गडचिरोली आणि यवतमाळ ही जिल्हे राज्यात पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. रायगडमध्ये "गंभीर अवस्थेतील कुपोषण' शून्य टक्क्यांवर आणल्याचा दावा "जिजामाता मिशन'च्या ताज्या अहवालात करण्यात आला आहे. पुण्यालाही कुपोषणावर मात करता आली नसल्याचे अहवालातून उघड झाले आहे. मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत कुपोषण वाढले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दर पावसाळ्यात स्वयंसेवी संघटना आणि सरकारी यंत्रणा यांच्यात वाक्युद्ध सुरू होते. दोघांच्या आकड्यांचा एकमेकांशी मेळ बसत नाही. स्वयंसेवी संस्थांचे आकडे सरकारी आकडेवारीच्या किमान पाचपट अधिक असतात. कुपोषणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही मोठे असल्याचा त्यांचा दावा आहे. आदिवासी नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करत असल्याने योग्य नोंदी होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
'जिजामाता मिशन'ने मार्च ०९ मधील तपासणीच्या आधारे अहवाल तयार केला आहे. सर्वाधिक कुपोषित बालके (श्रेणी तीन, चार) अमरावती जिल्ह्यात (७७२) असून, त्याखालोखाल नाशिक (७३४), नंदूरबार (५२५), अहमदनगर (४९७), गडचिरोली (४६२) आणि यवतमाळ (३४२) यांचा क्रम आहे. रायगडमध्ये गंभीर कुपोषण शून्य टक्क्यावर आणल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या खालोखाल सिंधुदुर्ग (४३), वर्धा (४८), धुळे (५१) आणि सातारा (६०) यांनी चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रत्नागिरी, बीड, परभणी, सांगली, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत गंभीर कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे.
राज्यात आज एकूण मुलांच्या ०.११ टक्के बालके गंभीर कुपोषित असल्याचे सरकारने मान्य केले आहे. कुपोषणाच्या पहिल्या श्रेणीत असलेल्या मुलांची संख्या आहे लाखामागे २१.२५ टक्के, तर राज्यातील एकूण बालकांच्या ती ३२.२ टक्के एवढी आहे. दुसऱ्या श्रेणीमधील बालकांची संख्या ही दर लाख लोकसंख्येमागे ३.५४ टक्के आहे.
कुपोषणामध्ये अमरावतीतील धारणी, नंदुरबारमध्ये तळोदा, ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथील स्थिती अत्यंत गंभीर आहे. आदिवासी भागातील आरोग्य सुविधाही अपुऱ्या आहेत. एक लाख लोकसंख्येमागे सरासरी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी हजर नसतात.
"सकाळ'चा उपक्रम नाशिक विभागातील कुपोषण निर्मूलनात "सकाळ' सहभागी झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी येथे आयुर्वेदाच्या माध्यमातून कुुपोषणावरील संशोधन व उपचार प्रकल्प वैद्य विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून राबविला. कुपोषित बालकांची पचनक्रिया, प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या प्रयत्नांना यश मिळविले. शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड देणे हा या प्रकल्पामागील उद्देश होता. "राजमाता जिजाऊ मिशन'च्या अधिकाऱ्यांनीही या प्रकल्पाची माहिती घेतली आहे.
अवस्था कुपोषणाच्या… प्रति दिन १०००-१२०० एवढ्या उष्मांकाची शरीराला गरज असते. वयोमानानुसार त्याची गरज वाढते. हा उष्मांक योग्य प्रमाणात न मिळाल्यास कुपोषणाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. वय, वजन यांच्यानुसार आवश्यक असलेली कर्बोदके शरीराला मिळाली नाहीत तर मानसिक, शारीरिक वाढ खुंटते. अशा व्यक्तींमध्ये कुपोषण आढळून येते. डॉक्टरांना कुपोषित बालकाची चिकित्सा करणे सोपे जावे, याकरिता चार अवस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात वजन कमी होते; तर दुसऱ्यात त्यांच्या अवयवांची कार्यक्षमता ढासळते. तिसऱ्या टप्प्यात प्रतिकारशक्ती क्षीण होऊन चलनवलन कमी होते. चौथ्या टप्प्यात संपूर्ण हालचाल मंदावते. अनेकदा बालकाच्या तोंडून आवाजही निघू शकत नाही.
राज्यातील ३२ टक्के बालके कुपोषित!
- Details
- Hits: 5051
5