सकाळ वृत्तसेवा
११ जून २००९
सोलापूर, महाराष्ट्र
उपेक्षित आणि आर्थिक दृष्टीने कमकुवत अशा वर्गापर्यंत आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने कुंभारीजवळ साकारलेल्या "लोकमंगल हॉस्पिटल'मुळे सोलापूरच्या मेडिकल टुरिझमला चालना मिळणे अपेक्षित आहे. येत्या रविवारी या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे.
सोलापुरात आरोग्यसेवेसाठी अतिशय चांगले डॉक्टर व सुविधा उपलब्ध असल्या तरी अशी एकत्रित सेवा देणारी मोजकी रुग्णालये आहेत. काही ठिकाणी तेथील दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा स्थितीत दर्जेदार आरोग्यसेवा इतर रुग्णालयांच्या तुलनेत ४० ते ५० टक्के कमी दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा "लोकमंगल हॉस्पिटल'ने केली आहे. भविष्यात सुपर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे वाटचाल करतानाही "सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा' हेच मध्यवर्ती ध्येय असेल, असा विश्वास लोकमंगल मेडिकल फौंडेशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती शरदकृष्ण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
सोलापुरात सर्वोपचार रुग्णालय वगळता इतर कोणत्याही रुग्णालयास रक्तपेढी संलग्न नाही. "लोकमंगल' सुरवातीपासून रक्तपेढीचीही सोय उपलब्ध करून देणार आहे. प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. विजय रघोजी यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यापासूनच रुग्णालयातील प्रत्येक विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असेल. रुग्णांच्या वाहतुकीसाठी सुसज्ज रुग्णवाहिका आहेत.
रुग्णालय प्रकल्पासाठी ३० एकर जागा उपलब्ध असून यात आगामी काळात डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने असतील. वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रशिक्षण केंद्र असतील. प्रदूषण मुक्त वातावरणासाठी चार हजार वृक्ष लागवडीची वनराई विकसित होत आहे. संकल्पित ५०० खाटांच्या रुग्णालयातील पहिला टप्पा १५० खाटांचा आहे.
रुग्णालयात डॉ. पी. जी. शितोळे (सर्जन),
डॉ. आर. एम. स्वामी (फिजिशियन), डॉ. खांडेकर (सर्जन), डॉ. लीना अंबरकर (नेत्ररोग तज्ज्ञ),
डॉ. अमोल गोडसे (दंत विभाग), डॉ. महेंद्र जोशी (अतिदक्षता विभाग), डॉ. भारत मुळे (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. एम. डी. खोसे (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. गवळी (स्त्री रोग तज्ज्ञ) आदींची सेवा उपलब्ध असेल.
स्त्री रोग, प्रसूती विभाग, अस्थिशल्य, सर्वसाधारण शल्य चिकित्सा, मेडिसीन, नेत्रचिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, त्वचा व गुप्तरोग, मानसोपचार हे सर्व विभाग पहिल्या टप्प्यात आधुनिक साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. पुढील टप्प्यात हृदयरोग, मूत्ररोग, मेंदूरोग, कॅथलॅब सूक्ष्म शल्य चिकित्सा, प्लॅस्टिक शल्यचिकित्सा, डायलिसिस, आणि रोपण चिकित्सा हे विशेष विभाग आधुनिक साधनसामुग्रीसह सज्ज होत आहेत.
माजी खासदार सुभाष देशमुख, श्री. ठाकरे, बालाजी अमाईन्सचे डी. रामरेड्डी, रुदाली ग्रुपचे संजय गुप्ता, क्रॉस इंटरनॅशनलचे काशिनाथ ढोले, प्रभू रॉकशेकचे सिद्धाराम चिट्टे, मनीष बोथरा, दामोदर देवसाने, डॉ. रघोजी, डॉ. विजय सावस्कर, डॉ. अंबुजा गोविंदराज, डॉ. संध्या सावस्कर आदी विश्वस्त आहेत.
मेडिकल टुरिझमला चालना अपेक्षित
- Details
- Hits: 3275
0