सकाळ वृत्तसेवा
२० जुलै २००९
अनिल वर्तक
तीव्र लक्षणे आटोक्यात आलेल्या मानसिक रुग्णांसाठी चिकाटी, सातत्य, पेशन्स असेल तर रिकव्हरी पद्धत एक वरदान होऊ शकेल.
शारीरिक आजार व मानसिक आजारात साम्य आहेच. शारीरिक आजारात शरीरात किंवा शरीरातील एखाद्या अवयवात दौर्बल्य आलेले असते, तर मानसिक आजारात मानसिक यंत्रणेत दौर्बल्य आलेले असते. शारीरिक आजारात औषध योजना चालू करून शरीरातील बिघाड दुरुस्त केला जातो व शरीराचे कार्य पुन्हा तंदुरुस्त पद्धतीने चालू होते.
मानसिक आजारातदेखील औषध योजना चालू करून भास, भ्रम, नैराश्य इत्यादी तीव्र लक्षणे आटोक्यात आणली जातात. शारीरिक आजारात औषध योजनेनंतर आजार पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणत्या गोष्टी करायच्या किवा करायच्या नाहीत, कोणती पथ्ये पाळायची याविषयी व्यवस्थित मार्गदर्शन रुग्णाला केले जाते. रुग्णाची आजाराला तोंड देण्याची क्षमता व उत्साह यामुळे वाढतो. मानसिक आजारात मात्र तीव्र लक्षणातून बाहेर आलेले रुग्ण अशा प्रकारचे मार्गदर्शन नसल्यामुळे आयुष्यात तसेच रेंगाळत राहतात, हेलपाटत राहतात.
मानसिक आजारातून पुन्हा उभारी घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी "रिकव्हरी' पद्धत एक वरदान होऊ शकेल. गेल्या शतकाच्या विसाव्या दशकात मनोरुग्णांवर काम करताना अमेरिकेतील न्यूरोसायकॅट्रिस्ट डॉ. अब्राहम लो यांना असे लक्षात आले, की शॉक ट्रीटमेंटनंतर अनेक रुग्णांची लक्षणे आटोक्यात येतात; परंतु रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर गेले की काही कालावधीनंतर पुन्हा लक्षणे घेऊन येतात. या दरम्यानच्या कालावधीत रुग्णांना आपली लक्षणे तीव्र होऊ नयेत यासाठी काही करता येईल का? रोजच्या जीवनातील छोट्या प्रसंगांना तोंड द्यायला त्यांना शिकवून, तीव्र लक्षणांकडे होणारा त्यांचा प्रवास रोखता येईल का? पुन्हा एकदा त्यांना दीर्घकालीन शांत, स्वस्थ व संतुलित आयुष्याकडे आणता येईल का, या विचारातून त्यांनी रुग्णांवर प्रयोग चालू केले.
मनोरुग्णाच्या समस्येनुसार निरनिराळी मदततत्त्वे (रिकव्हरी टूल्स) त्यांनी रुग्णांना शिकवली. रोजच्या जीवनात समस्या आणणाऱ्या प्रसंगात ही मदततत्त्वे वापरायची. वापरायची याचा अर्थ असा, की ती आठवायची (रिकॉल). मदततत्त्वे आठवायची म्हणजेच आपली आजाराला सामना करण्याची यंत्रणा (कोपिंग मेकॅनिझम) जागृत करायची. अशा प्रकारचे रोजच्या जीवनात घडणाऱ्या क्षुल्लक (ट्रिव्हीअल) प्रसंगांना तोंड द्यायला शिकायचे. याबद्दल स्वतःला शाबासकी द्यायची व असे करता करता या प्रसंगांना तोंड देण्यात सफाई आणायची, असा एकूण रिकव्हरीकडे प्रवास करायचा.
डॉ. अब्राहम लो यांनी लिहिलेल्या "मेंटल हेल्थ थ्रू विल ट्रेनिंग' या व अन्य पुस्तकांतून रिकव्हरी पद्धतीची माहिती व विविध रिकव्हरी मदततत्त्वे आपल्याला कळू शकतात. वरकरणी कठीण वाटणारी अशी पद्धत रुग्ण रुग्णांसाठी चालविल्या जाणाऱ्या मदत गटामध्ये सहज आत्मसात करतात. प्रत्येक रुग्ण आपापली लक्षणे व ती हाताळण्याविषयीचे अनुभव चार टप्प्यांमध्ये शेअर करतात.
पहिल्या टप्प्यात शारीरिक व मानसिक लक्षणे आणणारा प्रसंग कोणता होता, हे सांगितले जाते. उदा. घरातील काम करताना गोंधळ कसा उडाला, दुकानात चौकशी करताना अडखळण्याचा प्रसंग कसा आला., सामाजिक समारंभात लोकांशी संवाद साधताना अडचणी कोणत्या आल्या इत्यादी.
दुसऱ्या टप्प्यात कोणती शारीरिक व मानसिक लक्षणे उद्भवली ते सांगितले जाते. उदा. - भीती वाटली, कमीपणा वाटला, घाम फुटला, निघून जावेसे वाटले इत्यादी.
तिसऱ्या टप्प्यात प्रसंगाला तोंड देण्यासाठी कोणती रिकव्हरी तत्त्वे आठवली (रिकॉल केली) ते सांगितले जाते. उदा. ः मानसिक शांतता टिकवणे हे माझे सर्वोच्च ध्येय आहे, माझी मानसिक शांतता ही माझ्या रागापेक्षा महत्त्वाची आहे, दोषारोप करण्यापेक्षा क्षमा करा, इत्यादी.
चौथ्या टप्प्यामध्ये रिकव्हरी मदत तत्त्वे माहिती व्हायच्या आधी काय परिस्थिती व्हायची आणि रिकव्हरी मदततत्त्वे वापरल्यामुळे कोणता फायदा झाला. समस्या आणणाऱ्या प्रसंगातून मी कसा सावरलो, क्षुल्लक प्रसंगातून गंभीर होणारी परिस्थिती मी कशी आटोक्यात ठेवू शकलो हे सांगितले जाते.
थोडक्यात, पूर्वीची आणि आत्ताची परिस्थिती स्पष्ट केली जाते. उदा. पूर्वी एखाद्यावर आलेला राग तसाच उत्तरोत्तर वाढत गेला असता आणि दोनचार दिवस असेच फारसे काही न करता गेले असते. परंतु आता मात्र "बाह्य परिस्थितीवर माझे नियंत्रण नाही, माझे नियंत्रण फक्त माझ्यावर आहे,' हे मदततत्त्व आठवून मी कसा लवकर सावरलो, हे सांगितले जाते अथवा घरातील काम करताना माझा गोंधळ झाल्यामुळे हे संपूर्ण कामच मी कसे अर्धवट सोडून देत असे; परंतु आता "कोणतेही काम टप्प्याटप्प्याने करा' व "केलेल्या प्रयत्नांबद्दल स्वतःला शाबासकी द्या. केवळ यशासाठी नाही,' या मदततत्त्वामुळे मी काम कसे वेगवेगळ्या टप्प्यात विभागून घेतले व गोंधळ झाला तरी निम्मे काम कसे पूर्ण केले, हे सांगितले जाते.
अत्यंत साधी व सोपी वाटणारी पद्धत रोजच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांना तोंड देण्याची कला रुग्णांना शिकवते. त्यांचा आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढवते. आजाराविषयीचा ऍक्सेप्टन्स व इनसाइट आणण्यास मदत करते. विस्कळित व असंघटित झालेले मनोव्यापार पुन्हा एकदा संघटित होऊ लागतात. रुग्ण पुन्हा एकदा उभारी घेऊ लागतो व आणखीन आणखीन गुंतागुंतीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी सिद्ध होतो.
तीव्र लक्षणे आटोक्यात आलेल्या मानसिक रुग्णांसाठी चिकाटी, सातत्य, पेशन्स असेल तर रिकव्हरी पद्धत एक वरदान होऊ शकेल, असे निश्चितपणे सांगता येईल. स्क्रिझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनच्या एकलव्य गटातर्फे पुण्यात गेली सहा वर्षे रिकव्हरी पद्धत वापरली जात आहे.