म टा वृत्तसेवा
४ ऑगस्ट २००९
पुणे, महाराष्ट्र
स्वाइन फ्लूने देशातील पहिला बळी सोमवारी पुण्यात घेतला. एका १४ वर्षांच्या मुलीचा संध्याकाळी जहांगीर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याबाबत जहांगीर हॉस्पिटलच्या प्रशासनाने एका प्रेस नोटद्वारे माहिती दिली असून पत्रकारांशी थेट बोलण्यास, तसेच त्यांना आत सोडण्यास मात्र प्रशासनाने नकार दिल्याने हॉस्पिटलच्या रात्री गोंधळाचे वातावरण होते. अनेक आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी, तसेच इतर संबंधितांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली होती.
या मुलीला फुफ्फुसाच्या त्रासामुळे २७ जुलै रोजी जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, इतर स्वाइन फ्लूच्या पेशंटांप्रमाणे ती परदेशी गेली नव्हती किंवा कोणत्याही स्वाइन फ्लूच्या पेशंटशी तिचा थेट संपर्कही आला नव्हता, असे जहांगीरने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झाले होते, तसेच दाखल झाल्यानंतर तिची प्रकृती झपाट्याने ढासळत होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या आजाराचे नमुने स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र तोपर्यंत तिची तब्येत सरकारी हॉस्पिटलात हलवण्याऐवढी चांगली राहिली नसल्याने तिला जहांगीरमध्येच ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलमधील वरिष्ठ तज्ज्ञांनी तिच्या उपचारांकडे लक्ष पुरवले होते; मात्र सोमवारी ती या उपचारांना प्रतिसाद देईनाशी झाली. संध्याकाळी तिचा मृत्यू झाला, असे या पत्रकात नमूद केले आहे. ही मुलगी गुरुवार पेठेत राहणारी होती.
या मुलीला स्वाइन फ्लू असल्याचे कळाल्यावर हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्यात आले होते. तसेच इतर पेशंट, हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि इतरांना या आजाराची लागण होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेत असल्याचा आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला याबाबत माहितीही देण्यात आल्याचा दावाही प्रशासनाने या पत्रकातून केला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव नरेश दयाल यांनीही या दुदैर्वी मृत्यूला दुजोरा दिला आहे.
पुण्यातील सेन्ट एन्स शाळेत ९ व्या इयत्तेत शिकणारी रिया शेख हीला ताप आल्याने २७ तारखेला जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर, २९ तारखेला तिची तब्येत अधिकच ढासळली. ती कोणत्याही परदेशी नागरिकाशी किंवा स्वाइन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली नव्हती. तरी तिचे थ्रोटचे नमुने ३० तारखेला एनआयव्हीमध्ये पाठवण्यात आले. तिला स्वाइन फ्यू असल्याचे ३१ तारखेला लक्षात आले.
या घटनेची माहिती नायडू हॉस्पिटलला कळवली होती, असा दावा जहांगीर हॉस्पिटलने केला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने जहांगीरचा दावा खोडून काढला आहे. पालिका आयुक्त महेश झगडे यांनी जहांगीरने या संदर्भात स्थानिक प्रशासनानाला काहीही कळवले नसल्याचे रात्री उशीरा पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, सिंगापूर येथेही एका भारतीय वंशाच्या महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या महिलेविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी चार दिवसांपूवीर् ती सिंगापूरमधील चांगी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यानच तिचे रविवारी निधन झाले.
पुण्यात स्वाइन फ्लूने मुलीचा मृत्यू!
- Details
- Hits: 3251
0