Print
Hits: 3493

सकाळ वृत्तसेवा
२२ जून २००९
पुणे, महाराष्ट्र

जगातील ४७ देशांत प्रसार झालेल्या "स्वाइन फ्लू'चे राज्यात दोन संशयित रुग्ण सापडले; त्यापैकी एक पुण्यातील असून दुसरा मुंबई येथील आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या घशातील आणि नाकातील द्रव पदार्थांचे नमुने "राष्ट्रीय विषाणू संस्थे'त (एनआयव्ही) तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) त्याचे अहवाल मिळणे अपेक्षित आहे. पुण्यात आलेला अमेरिका व इंग्लंड येथून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अधिक तपासणीसाठी नायडू संसर्गजन्य रुग्णालयात दाखल केले. त्याचे अहवाल तपासण्यासाठी "एनआयव्ही'कडे पाठविण्यात आले आहेत. मुंबई येथील रुग्ण अमेरिकेतून आला असून त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिबंधात्मक उपाय
दरम्यान, मुंबई येथे सापडलेल्या राज्यातील पहिल्या "स्वाइन फ्लू'च्या रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याची लागण इतरांना होऊ नये, यासाठी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. रुग्ण ज्या विमानातून प्रवास करून आला, त्याच्या पुढील आणि मागील दोन-दोन सीटवर बसलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांना शोधून त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येणार आहेत. पुढील सात दिवस त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण केले जाईल. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्यांना रोग नियंत्रणाची औषधे दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.