Print
Hits: 3401

सकाळ वृत्तसेवा
९ जून २००९
पुणे

नेत्रदानामुळे गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील ५२७ अंधांना हे जग पाहण्यासाठी नवी दृष्टी मिळाली आहे. दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्याने दृष्टी गेलेल्या सोळा हजार १२२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांची दृष्टी परत देण्यात जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीला यश आले आहे.

आज राज्यभरात “दृष्टिदान दिन' साजरा करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा जन्मदिन १० जून १९२४ आणि मृत्युदिन १० जून १९७९ आहे. त्यांनी ८० हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना नव्याने दृष्टी दिली. त्यांच्या या कार्यामुळे राज्यात दहा जून हा ”दृष्टिदान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील नव्याने दृष्टी मिळालेल्या रुग्णांची ”सकाळ'ने माहिती घेतली.

राज्यात ६२ टक्के अंधत्व हे मोतीबिंदूमुळे येते. त्या खालोखाल दृष्टिदोष (२० टक्के), काचबिंदू (६ टक्के) उर्वरित अंधत्व इतर कारणांमुळे येते.

या बाबत जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक महाडिक म्हणाले, “पुण्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नेत्रदानाचे प्रमाण वाढत आहे. या वर्षी पुणे जिल्ह्यात उच्चांकी नेत्रदान झाले. या अंतर्गत एक हजार ६६ डोळे जमा झाले होते. त्यापैकी ५२७ जणांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी मिळाली. त्यातील काही जणांनी प्रथमच हे जग उघड्या डोळ्यांनी पाहिले. एकूण मिळालेल्या डोळ्यांपैकी तीस टक्के डोळे अंधांना दृष्टी देण्यासाठी वापरले जातात. पुण्यात मिळालेल्या ५० टक्के डोळ्यांमुळे अंधांना स्वतःच्या डोळ्याने जग पाहता आले. दान केलेले डोळे संशोधनासाठी वापरण्यात येतात. दान केलेल्या प्रत्येक डोळ्याचा योग्य वापर करण्यात येतो.”

एक हजारपैकी सहा जणांना मोतीबिंदूमुळे अंधत्व येते. पुण्यात ९६ हजार २७ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी ४७ हजार ६८५ शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात करण्यात आल्या. दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेल्या १६ हजार १२२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी दृष्टी देण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ७४ हजार ७७ शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन हजार ४०१ जणांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.