Print
Hits: 4023

स्टार माझा
२६ ऑक्टोबर २००९

ग्रामीण भारतात आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा पुरविण्यासाठी अमेरिकेतल्या काही भारतीय डॉक्टरांनी पुढाकार घेतलाय. अनेक जीवघेण्या आजाराचं निदान आणि उपचार करण्यासाठी या परदेशस्थ भारतीय डॉक्टरांच्या गटाने भारतातल्या ग्रामीण डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प सुरू केलाय.

हा प्रकल्प AAPI म्हणजे अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजीशिएन ऑफ इंडियन ओरिजीन या संस्थेनं राबवलाय. यामध्ये ग्रामीण भारतात सहसा उपचार होत नसलेल्या सहा रोगांचं योग्यवेळी निदान आणि उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या सहा रोगांमध्ये ह्रदयरोग, मधुमेह, एड्स, ट्यूबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग, ऍलर्जी तसंच प्रसूती सुविधा यांचा समावेश आहे. हे पाच आजार आणि अपुऱ्या प्रसूती सुविधा यामुळे ग्रामीण सर्वाधिक बळी जातात.

AAPI च्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पथदर्शी कार्यक्रम म्हणजेच पायलट प्रोजेक्ट सुरवातीला बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यात राबवला जाणार आहे. या तीन राज्यात या प्रकल्पाला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहिल्यानंतर संपूर्ण देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. AAPI चे अध्यक्ष डॉ. शंकू राव यांनी राजधानी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.

अमेरिकी भारतीय डॉक्टरांच्या या संघटनेनं आजपासून राजधानीत इंडो-यूएस आरोग्य शिखर परिषदेचंही आयोजन केलंय. या परिषदेला केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. तसंच प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमधील अनेक डॉक्टर्स या परिषदेला उपस्थित राहतील.

यापूर्वीच्या इंडो-यूएस आरोग्य शिखर परिषदेत अमेरिकी डॉक्टरांना भारतीय डॉक्टरांशी संवाद साधून भारतातल्या आरोग्य समस्या समजून घेता आल्या. त्यामुळेच अशा शिखर परिषदांमुळे आम्ही वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाऊ, असं मत AAPI चे सरचिटणीस प्रसाद श्रीनिवासन यांनी व्यक्त केलं.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.