Print
Hits: 7736

सकाळ वॄत्तसेवा
१० जून २००९

तंबाखू हा महाखलनायक आहे. २० व्या शतकात तंबाखूने जगभरात १० कोटी लोकांना यमसदनी धाडले. २१ व्या शतकात तंबाखू हा विक्रम मोडून जगभरातील शंभर कोटी लोकांना देवाघरी पाठवणार आहे. २०१० मध्ये तंबाखू ६० लाख लोकांचा, २०२० मध्ये ७० लाख लोकांचा, २०३० मध्ये ८० लाख लोकांचा तर २०५० मध्ये एक कोटी लोकांचा बळी मिळविणार आहे. भारतात प्रतिवर्षी तंबाखूमुळे ८ ते ९ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यांपैकी १ लाख मृत्यू मुख कर्करोगामुळे होतात. तंबाखूमुळे त्याच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे आयुर्मान सरासरी १५ वर्षे कमी होते. आज तंबाखूच्या आहारी असणाऱ्या एक तृतीयांश लोकांचा तो पुढे प्राण घेणार आहे. तंबाखू हे एक व्यापारी उत्पादन असून, त्यामुळे होणारे मृत्यू व एवढी मनुष्यहानी जगातील कुठल्याही व्यापारी उत्पादनाने होत नाही. अशा प्रकारचे मानवाचा संहार थांबविणे कठीण असले, तरी अशक्‍य नाही.

तंबाखूच्या दुष्परिणांमाबद्दल जनजागृती व्हावी या हेतूने दर वर्षी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त एका विशिष्ट घोषवाक्‍याची घोषणा करून, त्या अनुषंगाने आपली तंबाखूविरोधी मोहीम राबवत असते. १९८८ पासून या प्रथेला सुरवात झाली आहे. या वर्षीचे घोषवाक्‍य आहे. "Health Warning of Tobacco'. "तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या धोक्‍याचा सूचना.' तंबाखूमध्ये एकंदर ४००० घटक आढळतात. यांपैकी ४३ घटकांमुळे विविध अवयवांचा कर्करोग होऊ शकतो. म्हणजेच हे पदार्थ कर्कजन्य पदार्थ आहेत. याव्यतिरिक्त निकोटिन, कार्बन मोनॉक्‍साईड यांसारखे अतिशय घातक पदार्थ तंबाखूमध्ये असतात.

तंबाखू हे एक व्यापारी उत्पादन असल्यामुळे त्यात नेमके कुठले घटक पदार्थ असतात व त्या घटकांमुळे कुठले चांगले वा वाईट परिणाम होतात, हे माहीत करून घेणे, विशेषतः जे पदार्थ शरीरात सेवन केले जातात, हा त्या पदार्थाचा वापर करण्याऱ्या ग्राहकाचा हक्क असतो; तसेच ज्या व्यापारी उत्पादनामुळे शारीरिक धोका पोचू शकतो, त्या व्यापारी उत्पादनाबद्दल माहिती कळविणे हे निर्मात्याचे कर्तव्य ठरते.

तंबाखू हे एकमात्र व्यापारी उत्पादन असावे ज्याचा वापर करणाऱ्याला त्यामुळे जास्त व जीवघेणे नुकसान होते. त्यामुळे तंबाखूमुळे होणाऱ्या शारीरिक नुकसानीबद्दल इत्थंभूत माहिती द्यायची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सचित्र माहिती देण्याची चळवळ उभारण्याची गरज आहे. एक योग्य चित्र 1000 शब्दांपेक्षाही अधिक प्रभावी असते. जर त्यात स्थानिक भाषेचा उपयोग केल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकते. रेल्वे स्टेशन, सरकारी बस स्टॅंड, शासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बॅंका व इतर गर्दीच्या ठिकाणी या सूचना लावता येणे सहज शक्‍य आहे. "तंबाखू शरीरास अपायकारक आहे,' असे मोघम वाक्‍य लिहून काहीच साध्य होणार नाही. याउलट, "तंबाखूमुळे मुख कर्करोग होतो,' असा संदेश व त्यासोबत पायाच्या गॅंगरीनचे छायाचित्र दिल्यास निश्‍चितच जबरदस्त परिणाम साधला जातो. २००३ च्या FCTC (FCTC (Framework convention of tobacco control) च्या ११ व्या कलमानुसार सर्व सदस्य देशांनी अशी प्रत्यक्ष कृती करावी हे अपेक्षित आहे; मात्र जे लोक आज तंबाखूचे कुठलेच उत्पादन वापरत नाहीत; मात्र भविष्यात लवकरच त्याच्या नादी लागू शकतात, उदाहरणार्थ- शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेले चित्रांसोबतचे संदेश उपयुक्त ठरतील. ते तंबाखूच्या फाशीच्या फंदातच पडणार नाही.
स्त्रियांना अधिक धोका
जगभरातील २५ कोटी स्त्रियांना तंबाखूच्या सवयी आहेत. भारतात १ कोटी २० लाख स्त्रियांना तंबाखूच्या सवयी आहेत. त्यांपैकी ५३ लाख भारतीय स्त्रिया धूम्रपान करतात, तर ६५ लाख भारतीय स्त्रिया तंबाखू खातात वा चघळतात. दुर्दैवाने जगभर स्त्रियांमध्ये तंबाखूची लोकप्रियता वाढत आहे.

तंबाखूमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा व इतर अवयवांचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. तंबाखूमुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता घटू शकते व रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते.

तंबाखूमुळे अचानक गर्भपात होऊ शकतो.
तंबाखूमुळे स्त्रियांना होणारे बाळ कमी वजनाचे, मतिमंद, जन्मजात शारीरिक व्याधीसह वा मृत जन्माला येते. तंबाखूमुळे स्त्रियांच्या हिरड्यांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिरड्यांचे विकार वाढतात, त्यामुळे दात अकाली पडतात व विद्रूप दिसू शकतात. तोंडाला दुर्गंधी येते.