सकाळ वॄत्तसेवा
२९ जून २००९
डॉ. मिलिंद भोई

भारताला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने वैद्यकीय व तंत्र वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली आहे. तरीही भारतातील जनतेचे आरोग्य सुधारले आहे, असे म्हणू शकत नाही. आज जगभर "डॉक्टर्स डे' साजरा होत असताना आरोग्याबाबत भारतीय जनतेच्या पदरात काय पडले आहे, याचा विचार करण्याची गरज भासते आहे. वैद्यकीय सेवा ही एक अत्यावश्यक गरजेपैकी असूनही या सेवेचे नियोजन लोकाभिमुख नाही, शिवाय देशाच्या विकास धोरणाचा ढाचाच मुळात अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण करणारा आहे. म्हणून या प्रगतीचा फायदा सामान्य जनतेला पुरेसा होऊ शकलेला नाही. शहरी भागातील प्रचंड लोकसंख्या व अनियंत्रित प्रगतीमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात अडकलेली शहरे या सर्वांसाठी पुरेशा सरकारी आरोग्य सेवासुविधा मात्र 30-40 वर्षांपूर्वी होत्या तशाच आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा तर जवळजवळ कोलमडलेलीच आहे, आदिवासी दुर्गम भागातील वैद्यकीय सेवा दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकली आहे.
वैद्यकीय व्यवसाय हा पुरातन कालापासून "सेवाभाव' हा केंद्रबिंदू ठेवूनच माणुसकीच्या नात्यातून विकसित होत गेल्याचा इतिहास आहे. प्राचीन भारतीय आयुर्वेद शास्त्रातील अधिकारी वैद्य असोत वा पशुपालक, जंगलवासीयांच्याकडून जोपासलेल्या पारंपरिक औषधोपचार करणारे वैदू असोत, पैसा हा रुग्णसेवेपेक्षा नेहमीच दुय्यम होता. जगभरात या पेशाकडे रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असे. 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडेही कुटुंबाचे एकच डॉक्टर/वैद्य असत. त्यांनाही कुटुंबातील सर्वांच्या आरोग्य व आजाराविषयी माहिती असे. स्पेशालिस्टकडे जाण्याची गरज भासत नसे. फॅमिली डॉक्टर हा रुग्णांच्या सुखदुःखात, चांगल्या वाईट प्रसंगात कुटुंबातील एक सदस्य या भावनेने सहभागी होत असे. त्यामुळे रुग्णांचीही डॉक्टरांवर श्रद्धा होती. असं परस्पर विश्वासावर आधारलेलं नातं होतं. आता ते जवळजवळ संपल्यातच जमा आहे.
सरकारने ही अत्यावश्यक उपचारात्मक सेवा मुख्यतः खासगी सेवेमार्फतच मिळेल असे धोरण ठेवले. एवढेच नाही तर या खासगी वैद्यकीय क्षेत्रावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही व रुग्णांना योग्य दरात सेवा व औषधाची उपलब्धता हे बाजारपेठेतील स्पर्धेच्या नियमांवर सोडून दिले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब व मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनता यात भरडून निघते आहे.
महागडे आणि वेळखाऊ वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यास 9-10 वर्षे लागतात. त्यामुळे व्यवसाय उतरण्यास वयाची तिशी येते. खासगी महाविद्यालयांमधून लाखो रुपये खर्च करून बाहेर पडणारा वैद्यकीय "व्यावसायिक' या व्यवसायात वाढलेली तज्ज्ञ डॉक्टरांमधील तीव्र स्पर्धा पाहून पैसा हाच केंद्रबिंदू ठेवून या व्यवसायात उतरणे स्वाभाविक झाले आहे. पूर्वी प्रतिष्ठा, पैसा याबरोबरच समाजसेवेची संधी म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाई. गेल्या 10-15 वर्षांपासून औषधी कंपन्या, डॉयग्नॉस्टिक सेंटर्स मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पैसा ओतून पूर्णपणे व्यापारी तत्त्वावर काम करण्यासाठी उतरल्या आहेत. यामागे मोठे अर्थकारण दडले आहे. आणि काही डॉक्टर्सही यात सामील होतात अन् वैद्यकीय सेवेतील "सेवा' दूर होऊन "भाव' फक्त आहे. त्यामुळे या व्यवसायाचा मानवी चेहरा हरवत चालला आहे.
डब्ल्यू.एच.ओ.च्या शिफारसीप्रमाणे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 5 टक्के रक्कम सरकारने आरोग्यसेवेसाठी देणे गरजेचे असूनही साधी 2 टक्के रक्कमही पूर्णपणे व योग्य मार्गाने वापरली जात नाही. त्यामुळेच 2000 मध्ये सर्वांसाठी आरोग्य अशा योजना वाऱ्यावरच विरून जात आहेत. सरकारकडून मोठे उद्योगपती, राजकीय नेते, कलावंतांच्या स्मरणार्थ, सामाजिक बांधिलकीचे नाव पुढे करून मोठ्या शहरामध्ये मोठमोठे भूखंड रुग्णालय उभारणीसाठी मोफत वा अल्प दरामध्ये मिळवितात. ही आलिशान रुग्णालये उभारली जातात. मोठमोठ्या कंपन्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ई.एस.आय. वगैरेंसाठी संलग्नित केली जातात. भरमसाट बिले आकारली जातात. ही रुग्णालये मोठी होतात. परंतु अशा रुग्णालयांमध्ये गरजू, गरीब रुग्णांसाठी ठराविक खाटा या आरक्षित ठेवून त्यांना अत्यल्प दरात सेवा देणे बंधनकारक असते. परंतु या नियमांचे पालन बहुतांश रुग्णालये करीत नाहीत. नामांकित झालेली ही रुग्णालये नंतर सामाजिक बांधिलकी सोईस्करपणे विसरून जातात.
वैद्यकीय क्षेत्राचे हे बदलते स्वरूप निश्चितच आशादायक नाही. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत, स्वीकारलेही जात आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही बदल होणे अपरिहार्य आहे. पण ते स्वीकारणं (पचवणं) अवघड का वाटते आहे? सरकारी वा खासगी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या अधिक असली तरीही प्रचंड लोकसंख्येचे प्रमाण अजूनही व्यस्तच आहे. डॉक्टर हाही एक माणूसच आहे. त्यालाही व्यवहार पाहावा लागतो (प्रपंच असतो). या बदलत्या समाजव्यवस्थेचा तोही एक घटक आहे. मग आय.टी. इंजिनिअरला वयाच्या 24 व्या वर्षी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या पॅकेजविषयी नाराजी नाही, पण डॉक्टरांना मिळणाऱ्या पैशाविषयी निश्चितच असते. मुद्दा कळीचा आहे. पण त्यामागची कारणं समजून घेतली पाहिजेत. आरोग्यपूर्ण जीवन प्रत्येक जिवाची हक्क आहे. प्राचीन काळापासून या व्यवसायाकडून सेवाभावाची अपेक्षा आहे. त्यामुळे समाज आजही त्याच नजरेतून पाहतो आहे. डॉक्टरने नेहमी डॉक्टर म्हणून न राहता पालक, गुरुजन, मित्र या भूमिकांमध्ये जाऊन रुग्णाचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. आज नामांकित हॉस्पिटल्समधील नामांकित डॉक्टर्स असे वागतात का हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्यांच्या मनात आहे. या क्षेत्रात होणारे चांगले वाईट बदल टाळू शकत नाही, परंतु ते मानवी मूल्यांपलीकडे जाऊ नयेत म्हणून किमान या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बौद्धिक पात्रतेबरोबरच त्याची या व्यवसायाविषयीची आवड, कल व भावनिक बुद्ध्यंक विचारात घेतला जावा, जेणेकरून या व्यवसायाचा हरवत चाललेला "मानवी चेहरा' टिकून राहील. शेवटी या पवित्र आणि सेवाभावी व्यवसायाचे पावित्र्य टिकवून ठेवणे ही जबाबदारी रुग्णांपेक्षा डॉक्टरांवर जास्त आहे.