महाराष्ट्र टाईम्स
- म. टा. व्यापार प्रतिनिधी
गृहकर्ज काढताना आपले अनपेक्षितपणे काही बरेवाईट झाले तर पुढील पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार तुम्ही केला आहे का? असा विचार आताच्या काळात करणेच योग्य नाही का? म्हणूनच 'होम लोन' घेताना त्यासोबत कर्जाची परतफेड करू शकेल इतक्या रकमेची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेणे हा विचारच शहाणपणाचा ठरतो. असे केले तर आपल्या अकस्मात जाण्याने मृत्यूनंतर आपण काढलेल्या कर्जाचे ओझे नक्कीच राहणार नाही.
झपाट्याने विस्तारत चाललेल्या देशातील विमा क्षेत्रात इन्शुरन्स कंपन्या आता नवनवीन प्रकारच्या, विशिष्ट वैशिष्ट्ये आणि सोयी असलेल्या आयुविर्मा पॉलिसी आणत आहेत. एक पर्याय आहे 'होम लोन'च्या रकमेइतकीच विमा रक्कम ('सम अॅश्युअर्ड') असलेली मुदतबंद आयुविर्मा योजना ('टर्म इन्शुरन्स') किंवा कर्जाच्या परतफेडीच्या किमान कालावधीची, नियमित हप्त्यांची मुदतबंद आयुविर्मा योजना ('रेग्युलर प्रिमियम टर्म इन्शुरन्स') खरेदी करण्याचा.
दुसरा पर्याय आहे, 'मॉर्ट्गेज रिड्युसिंग टर्म इन्शुरन्स' ('एमआरटीआय') खरेदी करण्याचा. अशा प्रकारच्या लाइफ इन्शुरन्स योजनेत तुम्ही जसजसे दर महिन्याला गृहकर्जाचे हप्ते ('ईएमआय' अर्थात 'इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेन्ट') भरत जाता तसतसे इन्शुरन्स कव्हर (आयुविर्मा संरक्षणाची रक्कम किंवा 'सम अॅश्युअर्ड') दरमहा कमी होत जाते. वेगळ्या शब्दांत, कर्जदाराच्या कर्जाची रक्कम जसजशी कमी होत जाते, तसतशी विमा संरक्षणाची रक्कम कमी होत जाते. पण, गृहकर्जदाराचा अचानक मृत्यू झाला तर विमा कंपनी ('इन्शुअरर') विम्याची रक्कम अर्थात 'सम अॅशुअर्ड' होम लोन देणाऱ्या बँकेला देऊन त्याचे कर्ज फेडून टाकते. गृहकर्जाची रक्कम दिल्यानंतरही 'सम अॅश्युअर्ड'मधील काही रक्कम शिल्लक राहिली तर ती गृहकर्जदाराच्या वारसाला दिली जाते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यानंतर विमा संरक्षणही थांबते. कारण अशा लाइफ इन्शुरन्स स्कीमचे प्रिमियम अगदीच कमी असते.
लाइफ इन्शुरन्स पॉलिसी विकणाऱ्या कंपन्या आयुविर्माधारकाला अपघातामुळे संपूर्ण आणि कायमचे अपंगत्व आले तर त्यासाठी अधिक प्रिमियम आकारून 'अॅडिशनल बेनिफिट'ही देतात. मात्र या अतिरिक्त लाभासाठी काही अपवाद आणि 'वेटिंग पीरियड'ही निश्चित केलेला असतो.