महाराष्ट्र टाईम्स
- म. टा. व्यापार प्रतिनिधी
गुंतवणुकीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कारण भविष्यकाळात गुंतवणुकीची पूंजीच आपला एकमेव आधार असतो. तुमची नोकरी काही कारणास्तव मध्येच सुटलेली असो वा सेवानिवृत्तीचा काळ असो किंवा घरखरेदी, मुलीचे लग्न, परदेशवारी, मुलांचे उच्च शिक्षण अशा खचिर्क बाबींसाठी ही गुंतवणूक आपणास उपयोगी पडत असते. त्यामुळे असे म्हटले जाते की, पैसा सहज जमा केला जाईल परंतु, तो हाती राखून ठेवणे महत्त्वाचे आहे आणि त्याहीपेक्षा त्याचे मूल्य जपणे अधिक जिकरीचे आहे.
कारण पैशाचे मूल्य दिवसेंदिवस घसरत असते. त्यामुळे उत्पन्नाचे साधन हाती नसेल तेव्हा तुमचे राहणीमान योग्य पातळीवर टिकवून ठेवण्यासाठी या बचतीचा उपयोग होणार असतो.
पैशाचे मूल्य झपाट्याने घसरण्यास चलनवाढ किंवा महागाई मुख्य कारणीभूत ठरते. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या काळातही या बचतीचे मूल्य कायम राहील या दृष्टीने गुंतवणुकीचे पर्याय शोधणे आवश्यक आहे. काही निवडक अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअरखरेदीचा पर्याय जोखमीचा असला तरी चांगला आहे. त्यानंतरचा पर्याय 'आरबीआय बाँड्स' आणि पोस्टातील बचतीचा. नियमित व्याज देणाऱ्या ठेवयोजना योग्य ठरतात.
पोस्टातील 'मंथली इन्कम स्कीम' ('एमआयएस') योजनेत प्रत्येकी साडे चार लाख रुपये प्रमाणे दोघांच्या नावे नऊ लाख रुपये ठेवता येतात. मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडाच्या शॉर्ट टर्म योजनेतही गुंतवणूक करता येईल.
सध्या बँकांच्या काही मुदत ठेवी योजनांवरही दहा टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देण्यास सुरूवात झाली आहे. परंतु, उत्पन्न इन्कम टॅक्सच्या वरच्या ब्रॅकेटमध्ये असेल तर बँक ठेवीपेक्षा म्युच्युअल फंडाच्या डेट योजना अधिक लाभदायक ठरतात. अर्थात त्यातील जोखमीचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
एकूण उत्पन्नातील छोटा भाग म्हणजे पाच ते सात टक्के हिस्सा इक्विटी इंडेक्स फंडात किंवा 'ब्लू चिप' कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतविता येतील. अधिक जोखीम असलेल्या सेक्टर फंडात गुंतवणूक करण्याचे टाळण्यात यावे. आणीबाणीच्या प्रसंगास तोंड देण्याकरिता काही रक्कम रोख हाती येईल, अशी तरतूद असणेही आवश्यक आहे.
' गोल्ड ईटीएफ' ही सोन्यातील युनिट गुंतवणूक योजनाही फायदेशीर ठरते. सोन्याचे भाव वाढत असल्याने त्या प्रमाणात गुंतवणुकीतही वृद्धी होत असते.
विम्याची गरज असते. परंतु, त्याचबरोबर वैद्यकीय लाभ मिळवून देणारी विमा योजना अधिक चांगली ठरते. तुम्ही सेवेत असताना तुमची कंपनीही आयुविर्मा किंवा वैद्यकीय लाभ देणाऱ्या विमा पॉलिसी काढून देत असते. परंतु, सेवानिवृत्तीनंतर हे पॉलिसी कव्हर मिळत नाही. त्यामुळे आपण आधीच स्वत:ची सोय करून ठरणे आवश्यक आहे.
व्याज उत्पन्नावरील 'टीडीएस' टाळण्यासाठी फॉर्म '१५ एच' भरून देणेे आवश्यक असते.
अशा प्रकारे योग्य ती उपाययोजना केलेली असेल तर तुमच्या बचतीचे गुंतवणुकीचे मूल्य कायम राहीलच, नव्हे तर ते वाढेलही!
गुंतवणुकीची काळजी
- Details
- Hits: 4847
0