सकाळ वृत्तसेवा
०३ ऑगस्ट २००९
पॅरिस, फ़्रान्स
शास्त्रज्ञांना एड्सचे विषाणू आता नव्या स्वरूपात सापडले आहेत. यापूर्वी एड्सच्या विषाणूंचा प्रसार चिम्पांझी या माकडाच्या जमातीतून जगभर पसरला होता. पण नुकतेच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे, की एचआयव्ही नव्या रूपात गोरील्ला माकडाच्याच जमातीतून सर्वत्र पसरतोय.
कॅमरून या जमातीतील स्त्रीमध्ये या नव्या एड्सच्या विषाणूचा संसर्ग पॅरिसमधील डॉक्टरांना आढळून आला. या 62 वर्षीय स्त्रीमध्ये मिळालेले विषाणू ठळकपणे गोरील्ला जमातीतील माकडांशी मिळतेजुळते होते. या स्त्रीवर उपचार करताना विषाणूंच्या जडणघडणीत काही बदल दिसून आले म्हणून विविध प्रक्रिया करताना या नव्या विषाणूंचा शोध लागला.
या विषाणूंसाठी सध्या तरी जुन्याच औषधांचा उपयोग केला जातोय; पण विषाणूंचे स्वरूपच नवे असल्याने यावर तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे.
याचाच अर्थ असा होतोय, की एड्सचे विषाणू नवनव्या पद्धतीने रचना बदलून कार्यरत राहणार. सध्या तरी या स्वरूपाची ही पहिलीच केस असली तरीही हा विषाणू संक्रमणाने मोठ्या स्वरूपात पसरण्याची शक्यता अधिक आहे. या विषाणूंचा शोध जुन्या एड्सच्या विषाणूंच्या पद्धतीने लागणे अशक्य आहे. यासाठी काही नव्या चाचण्या कराव्या लागल्या.
सहज हे परीक्षण करून बघितल्याने या विषाणूंचा शोध लागला, त्यामुळे हा विषाणू अधिक ठिकाणी पसरला असण्याची शक्यता अधिक आहे. हा धोका लक्षात घेऊन अधिकाधिक नव्या परीक्षणांना डॉक्टरांनी सामोरे जायला हवे, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
एड्सचे विषाणू नव्या स्वरूपात?
- Details
- Hits: 2902
0