म. टा. वृत्तसेवा
१४ जुलै २००९
लातूर
एड्सबाधीत मुलांची संख्या मोठी असून त्यांनी चांगले जीवन जगण्यासाठी आश्रमशाळांच्या धतीर्वर शाळा सुरू करण्याचा विचार सरकारने करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.
औसा तालुक्यातील हासेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एड्सबाधीत मुलांसोबत इतर मुलांना शाळेत पाठविण्यास गावकऱ्यानी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात हासेगवच्या गावकऱ्यांनी दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन आपला विरोध व्यक्त केला. त्यावेळी जिल्हाधिकारी एकनाथ डवले याच्यांशी चर्चा झाल्यानंतर जबरदस्ती वा कायद्याने यशस्वी होण्यापेक्षा गावकऱ्यांची मानसिकता तयार करणे आवश्यक असल्याचे व हा हासेगावचा प्रश्न काही दिवसांत मिटेल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
एड्स या रोगाविषयी ग्रामीण भागात खूप गैरसमज आहेत. एड्सबाधित मुलांमध्ये न्यूनगंड असतो, त्यांना दिवसातून तीनवेळा औषधे घ्यावी लागतात. त्यांना विश्रांतीचीही आवश्यकता असते. पण हा साथीचा रोग नसल्याने त्यांना अस्पृश्य मानू नये असे देशमुख यांनी स्पष्ट केले. परंतु, गावकऱ्यांना हे स्पष्टीकरण मान्य नसल्याने त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा स्थापन कराव्या या मागणीचा पुनरुच्चार केला.
त्यामुळे आश्रमशाळांच्या धतीर्वर एड्सबाधित मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या या आश्वासनानंतर मात्र, सोमवारी हासेगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी पुन्हा शाळेत पाठवल्याचे शिक्षण विभागाकडून समजते.
एड्सग्रस्त मुलांसाठी वेगळी शाळा
- Details
- Hits: 3614
0