स्टार माझा
२९ जुलै २००९
मुंबईतल्या चौसष्ट सरकारी रूग्णालयात २००७ मध्ये ज्यांनी रक्त तपासण्या केल्या होत्या त्या चुकीच्या आहेत. या तपासण्यांमध्ये अनेकांना एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घोषित करण्यात आलंय पण हे सगळे रिपोर्ट् चुकीचे आहेत. या चुकीच्या रिपोर्टबाबत प्रशासनाला दोन वर्षांनी जाग आली आहे.
स्पान डायग्नोस्टीक लि. कपंनीनं एड्सची टेस्ट करण्यासाठी जे कीट पाठवलं होतं, ते किट तयार करताना त्या उपकरणांमध्ये कमतरता राहिल्या होत्या. ज्यामुळेच ही उपकरणं वापरून ज्या रक्त तपासण्या केल्या गेल्या त्यांवरून समोर आलेले रिपोर्टस् चुकीचे होते. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिल्ली हाय कोर्टानं निर्णय दिलाय की मुंबईत हे किट वापरून ज्या लोकांची तपासणी करण्यात आली ती परत करण्यात यावी.
मुंबईत हे किट वापरून ७६ हजार ४६४ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. ज्यांची रक्त तपासणी आता पुन्हा करावी लागणार आहे. मात्र प्रशासनाकडे या व्यक्तींच्या नावांची नोंद नाही. इतकी मोठी चूक घडूनही प्रशासनानं छातीठोकपणे दावा केलाय की या गोष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं नाही. कारण एचआयव्ही पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह असणा-या रूग्णांची टेस्ट सहा महिन्यांनी पुन्हा केली जाते.
महत्त्वाची बाब ही की या सगळ्या प्रकारात दुर्लक्ष करणा-या अधिका-यांवर काहीही कारवाई अद्यापही करण्यात आलेली नाही. हे प्रकरण अद्यापही कोर्टात प्रलंबित आहे. एवढंच नाही तर हा प्रकार नुसता मुंबईत नाही तर संपूर्ण देशभरात झालाय. मुंबईतल्याच रूग्णांची संख्या ७५ हजारांच्या वर आहे पण देशातल्या किती लोकांची अशा रितीनं चुकीची चाचणी करण्यात आलेली आहे याचा आकडा कोणाकडेच नाही.
एचआयव्ही पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?
- Details
- Hits: 3472
0