सकाळ
१० सप्टेंबर २००९
- वैशाली भुते
पुणे, महाराष्ट्र
प्रत्येक समस्येचा शेवट हा आत्महत्या नसतो. तर, त्यावरही उपायही असतात, असा संदेश देत अनेक आत्महत्या विरोधी संस्था, हेल्पलाइन आज कार्य करत आहेत. मात्र, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकलांगता या कार्याला फाटा देत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांतला आत्महत्येचा चढता आलेख या विकलांगतेचेच दर्शन घडवतो.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्याचा चिंतेचा विषय असला, तरी कर्जबाजारीपणाव्यतिरिक्त अपयश, अपमान, नैराश्य आदी किरकोळ कारणे आत्महत्येसाठी पुरेशी ठरू लागली आहे. किंबहुना या कारणांमुळेच आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवर केलेले सर्वेक्षणही आत्महत्या विषयातील गांभीर्य स्पष्ट करते. विविध कारणांनी हताश झालेले लाखो लोक आत्महत्येचा पर्याय निवडताना दिसतात. ही संख्या दिवसाला हजारोंच्या घरात असते. २००३ ते २००७ या पाच वर्षांतील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. वर्षागणिक काही टक्क्याने वाढणाऱ्या आत्महत्या सामाजिक विकलांगतेचे दर्शन घडवितात. २००३ मध्ये आत्महत्येचा दर १०.४ टक्क्यांवरून २००७ मध्ये थेट १०.८ टक्क्यांवर गेल्याचा दिसतो.
आत्महत्येची कारणे
२००७ च्या देशाच्या उपलब्ध आकडेवारी आत्महत्येमागील किरकोळ कारणांचा वेध घेते. २००७ मध्ये कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २३.८ टक्के आहे. त्यापाठोपाठ आजारपणाला कंटाळून आत्महत्येला कवटाळणाऱ्यांचे प्रमाण २२. ३ टक्के आहे. २५ टक्के लोकांनी विविध समस्यांमुळे आत्महत्या केली असली, तरी १६.६ टक्के लोकांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तर व्यसन, हुंडाबळी, दारिद्य्र, आर्थिक व्यवहार , प्रेमसंबंध आदी कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांच्या दरम्यान आहे.
देशांत महाराष्ट्र दुसरा
आत्महत्येबाबत देशात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. पहिला क्रमांक पश्चिम बंगालचा असून २००५ ते २००७ या तीन वर्षांतील आत्महत्येचा दर अनुक्रमे १३.२, १३.३, १२.४ टक्के आहे. तर महाराष्ट्रातील हा दर १२.७, १३.१ आणि १२.१ टक्के असा आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेश, तमिळनाडू , कर्नाटकचा क्रमांक लागतो.
हेल्पलाइन
पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या कनेक्टिंग या आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइनने या वर्षभरात ४७१ वैफल्यग्रस्तांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. दहा सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने हेल्पलाइनच्या प्रतिनिधींनी ही माहिती दिली.
राज्यातील तणावग्रस्त लोकांचे जीवन वाचवण्यासाठी २००८ मध्ये ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. पुणे शहरात कार्यालय असणाऱ्या या हेल्पलाइनसाठी ३० प्रतिनिधी आहेत. विविध क्षेत्रात काम करणारे हे प्रतिनिधी दररोज दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत वैफल्यग्रस्तांना धीर देण्याचे कार्य करत आहेत. आत्महत्या प्रतिबंधात्मक काम करणाऱ्या विविध अनुभवी संस्था, हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. किंबहुना या प्रतिनिधींपैकी बहुतांश प्रतिनिधी कुटुंबातील आत्महत्येच्या घटनेतून गेले आहे, अथवा स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वयोगट लक्षात घेऊन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून लहान मुलांबरोबरच वृद्धांशी संवाद साधण्याचे कौशल्य या प्रतिनिधींकडे आहे.
विविध उपक्रम, शाळा, महाविद्यालये, प्रसिद्धी माध्यमे, धार्मिक कार्यक्रमातून या हेल्पलाइनबाबत जागृती केली जाते. बऱ्याचदा आत्महत्येची सर्व तयारी करून किंवा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याचे हेल्पलाइनच्या प्रतिनिधी आदिती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या वर्षभरात आलेल्या दूरध्वनीपैकी ७० टक्के पुरुषांनी केले. तर, महिलांच्या दूरध्वनीचे प्रमाण ३० टक्के होते. सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के दूरध्वनी २० ते ४० वयोगटातील व्यक्तींचे होते. त्यापाठोपाठ ३१ टक्के दूरध्वनी ४० ते ६० वयोगटातील होते. तर, आठ टक्के दूरध्वनी ६० वर्षांच्या पुढील व्यक्तींचे आणि चार टक्के २० वयोगटाखालील मुलांचे दूरध्वनी होते. वयोगटानुसार आत्महत्येची कारण बदलत असली, तरी मन मोकळे करण्यासाठी साधन नसणे, हे त्यातील समान धागा असल्याचे आदिती यांनी सांगितले.
आत्महत्येमागील मानसिक विकलांगता
- Details
- Hits: 4196
0