Print
Hits: 3900

सकाळ
११ जून २००९
वैशाली भुते
पुणे, महाराष्ट्र

आता उजाडेल...!
आता उजाडेल...!

कर्करोग. असाध्य आजार. बहुतांश केसेसमध्ये मृत्यू अटळ. त्यामुळे कर्करोगाचं निदान झालं की, 'आमच्या हातात किती कालावधी आहे,' असा प्रश्‍न डॉक्‍टरांना हमखास विचारला जातो. अचानक समोर आलेल्या वास्तवामुळं संबंधित व्यक्तीच नव्हे, तर अवघं कुटुंब खचून जातं. पार मोडकळीला येतं. हातात राहिलेल्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करण्याऐवजी दारात आलेल्या मरणानं भयगंड निर्माण होतो. अन्‌ सुरू होतो अटळ वास्तवाच्या मार्गावरचा नकारात्मक प्रवास. पण, समाजात अशीही माणसं असतात, जी या वास्तवाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. जगणं हेच आव्हान मानत शीवलिलया पेलतात. पुण्यातल्या नीलिमा बापट या अशाच एक वास्तव स्वीकारलेल्या. जुलै २००७ मध्ये त्यांना कर्करोगानं ग्रासल्याचं निदान झालं. हातात काही महिनेच असल्याचं डॉक्‍टरांनी सांगितलं. त्यात आजारानंही गंभीर रूप धारण केलं. 'लिंफोमा' आणि 'बोन इंन्फेक्‍शन' अशा आजाराच्या विचित्र मिश्रणानं डॉक्‍टरांनाही पेचात टाकलं. जगण्याची अशा अगदीच पुसट झाली. गडद होत चाललेल्या आजाराच्या स्वरूपामुळं पुस्तक लिहिण्याचं स्वप्नदेखील कोलमडून पडलं. खूप त्रागा झाला. ज्यासाठी आजवर एवढी तयारी केली, तेच राहून जातंय की काय, असं वाटू लागलं. पण, पर्याय नव्हता. हातात उरलेला वेळ, आजारपणामुळे आलेला अशक्तपणा आणि पुस्तकासाठी लागणारा वेळ याचा ताळमेळ बसत नव्हता. मात्र, उरलेल्या आयुष्यात करायच्या इतर गोष्टींचे प्राधान्य ठरवले होते. त्याप्रमाणं परदेशात स्थायिक झालेल्या मुलं, सुना, नातवंडांना बोलावून घेतलं. नातवंडांच्या मुंजी उरकल्या.

दरम्यान तब्येतीत सुधारणा झाल्याचं वाटू लागल्यानं पुस्तक लिहिण्याचे विचार पुन्हा उफाळून आले. पतींनी प्रोत्साहन देत, काही झालं तरी लिही, असा आग्रह केला. सुरवातीला मैत्रिणीच्या साह्यानं अन्‌ नंतर स्वत:च लिखाण करत पुस्तक पूर्ण केलं. या पुस्तक लिहिण्याच्या ओघात वर्ष कसं लोटलं कळलंदेखील नाही. तब्येतीच्या कुरबुरी असायच्याच, पण पुस्तक लिहिण्याची उमेद मोलाची होती. त्याप्रमाणं पुस्तक लिहून पूर्ण केलं. विशेष म्हणजे या पुस्तकाचं विशेष कौतुक झालं.

'माझं आयुष्यात अमुक राहिलंय, तमुक न मिळाल्याची खंत अशी नाहीच, अन्‌ आजाराचं निदान झाल्यावरही असं वाटलं नाही. उलट साठीनंतर मिळणारं आयुष्य हे बोनस असतं, असं मला वाटतं. त्यामुळे आजार कळल्यानंतरही व्यथित झाले नाही. मी तर म्हणते, 'लोकांना आपण केव्हा जाणार आहोत, याची कल्पना नसते. मला माझं मरण कळल्यानं मी कसं जगायचं हे ठरवू तरी शकतेय. त्यादृष्टीनं मी फायद्यातंच आहे,' असं नीलिमाताई आवर्जून सांगतात. 'आता उजाडेल', या सकारात्मक दृष्टीकोनातूनच त्यांच्या आयुष्याची दोरी कर्करोगाशी झुंज देताना बळकट आहे.

(नीलिमाताईंच्या पुस्तकाचं नावही 'आता उजाडेल', असंच आहे. मानसिक आजार असलेल्या रुग्णांबरोबर काम करताना आलेले अनुभव नीलिमाताईंनी पुस्तकाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. पौगंडावस्थेमध्ये आलेल्या मुला-मुलींच्या वागण्यात झालेले बदल. आजाराची लक्षणे, रुग्णांच्या (शुभार्थी) पालकांना (शुभंकर) सोसाव्या लागणाऱ्या यातना, प्रसंगानुरूप केलेले डॉक्‍टर, ज्योतिष, तंत्र-मंत्र, यज्ञकांड यासारखे उपाय. हे सर्व बारकावे एका कथेतून गुंफले आहेत. नुकताच या पुस्तकाचं प्रकाशन झालं. अनेकांनी पुस्तकाचं भरभरून कौतुक केलं.)

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.