सकाळ वृत्तसेवा
२४ जून २००९
पुणे, महाराष्ट्र
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने येत्या २६ जून रोजी शहर पोलिसांतर्फे जनजागरूकता मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार आहे. यंदा मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र पोलिसांबरोबर या उपक्रमात सहभागी होणार आहे.
येत्या २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थविरोधी दिन आहे. त्या निमित्ताने शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालय मैदानावर त्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमास पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, "मुक्तांगण'चे संचालक डॉ. अनिल अवचट, पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे व सायबर सेलचे उपायुक्त राजेंद्र डहाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील मिशन मृत्युंजयचे सदस्य, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, तसेच विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिस मुख्यालय मैदानावर शुक्रवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणारे प्रदर्शन नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी व त्या विरोधातील मोहीम तीव्र करण्यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, राज्य व केंद्रीय उत्पादनशुल्क व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आराखडा निश्चित करण्यात येणार आहे, असे श्री. डहाळे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्त झालेले काही जण अनुभव कथन करणार आहेत. या कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. डहाळे यांनी केले आहे.
नागरिकांना संपर्काचे आवाहन शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये कोठेही अमली पदार्थांची खरेदी-विक्री सुरू आहे, असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त कार्यालयात (दूरध्वनी क्र: ०२०-२६१२४४५२) संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे आर्थिक गुन्हे व सायबर सेलचे उपायुक्त उपायुक्त राजेंद्र डहाळे यांनी स्पष्ट केले आहे.
अमली पदार्थांविरुद्ध शुक्रवारपासून मोहीम
- Details
- Hits: 3556
0