Print
Hits: 7786

संमोहनशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे. सर्वसाधारण कोणत्याही व्यक्तिला प्रभावी सूचनांव्दारे कृत्रिम झोपेमध्ये नेऊन अंतर्मनाशी संपर्क निर्माण करता येतो. यामुळेच या शास्त्राची अशी व्याख्या करता येईल. ‘प्रभावी सूचनांव्दारे बाह्यमनास कृत्रिम निद्रावस्थेत नेऊन अंतर्मनाशी संपर्क साधण्याच्या शास्त्राला संमोहनशास्त्र असे म्हणतात.’

संमोहन होण्याची प्रक्रिया संमोहनकार व संमोहित होणारी व्यक्ति या दोघांच्या परस्पर सहकार्यावरच अवलंबून असते. तसेच संमोहित होण्यासाठी संमोहनकाराच्या सूचनांवर मन केंद्रीत करणे आवश्यक असते.

यामुळेच पूर्णत: अथवा अंशात्मक वेड्या व्यक्ति व नकारात्मक विचारसरणीचे लोक ("माझ्यावर संमोहनाचा प्रभाव होऊ शकणारच नाही", अशी धारणा बाळगणारे लोक) अशा लोकांवर संमोहन होत नाही. मात्र यापैकी चंचल आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांचे हळूहळू मतपरिवर्तन केल्यास बऱ्याच प्रयत्नाने संमोहन होऊ शकते.

संमोहनाची हलकी अवस्था
संमोहनाचा प्रभाव सुरु झाल्यावर डोळे जड होऊन बंद होतात. या अवस्थेत डोळे उघडता येत नाहीत किंवा खूप ताण दिल्यावर थोडेसे उघडू शकतात. मात्र डोळे बंद ठेवणे बरे वाटते. शरीराला व मनाला थोडे शैथिल्य प्राप्त होते. सहसा कुणाशी बोलण्याची इच्छा होत नाही. मात्र आजूबाजूला घडणाया घटनांची जाणीव असते. या अवस्थेत आणखी प्रभावी सूचना दिल्यास मध्यम अवस्था प्राप्त होते.

संमोहनाची मध्यम अवस्था
या अवस्थेत आजुबाजूची जाणीव खूपच पुसट होते. किंवा बऱ्याच वेळा जाणीव राहत नाही. शरीर पूर्ण शिथिल झालेले असते. संमोहित व्यक्ति दिलेल्या सूचना सहजतेने स्वीकारते. या अवस्थेनंतरच पुढे गाढ अवस्था प्राप्त होते.

संमोहनाची गाढ अवस्था
या अवस्थेत आजुबाजूचे कोणतेही भान राहत नाही. संमोहित व्यक्ति ही संमोहनकाराच्या पूर्ण नियंत्रणाखाली असते. संमोहनकाराच्या सर्व सूचनांचे (अनैतिक सोडून) तंतोतंत पालन केले जाते. या अवस्थेतून जागे न होता संमाहित अवस्थेतच डोळे उघडवता येतात. संमोहित अवस्थेतून बाहेर आल्यावर या अवस्थेची आठवण राहत नाही.

संमोहनाची अतिगाढ अवस्था
ही समाधी सदृश अवस्था असून फारच थोड्या व्यक्तिंना ही अवस्था प्राप्त होऊ शकते. या अवस्थेत भूल न देता सुध्दा शस्त्रक्रिया करता येतात. सर्वच लोक संमोहनाच्या सगळयाच अवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही. सांख्यिकी निष्कर्षाप्रमाणे सुमारे ८०% लोकांवर संमोहनाचा प्रभाव चालतो व २०% लोकांवर संमोहन होत नाही. संमोहित होण्यांपैकी ५०% हलक्या अवस्थेच्या पलीकडे जात नाहीत. ४०% मध्यम अवस्थेपर्यंत पोहचतात व केवळ १०% लोकांनाच गाढ किंवा अतिगाढ अवस्था प्राप्त होऊ शकते.

वर वर्णन केलेल्या संमोहनाच्या अवस्था या ढोबळ मानाने सांगितल्या आहेत. प्रत्यश्रात या अवस्थांना सिमारेषा नाही, तसेच सूचनांचा परिणाम मिळवण्यासाठी मध्यम गाढ किंवा अतिगाढ अवस्थाच निर्माण झाली पाहिजे अशी आवश्यकता नाही. हलक्या अवस्थेत दिलेल्या सूचनांचा सुध्दा योग्य परिणाम मिळतो.

व्यक्तिमत्व विकास साधून यशस्वी जीवन जगण्यासाठी चांगल्या सूचना अंतर्मनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच वारंवार त्यांची जळणी केल्यास त्या अंतर्मनात खोलवर रुजतात व दीर्घकाळ चांगला परिणाम मिळतो. अशाप्रकारे अंतर्मनाशी संपर्क साधण्यासाठी संमोहित होणे आवश्यक आहे.