Print
Hits: 6126

भारतीय परंपरेत संमोहनशास्त्राचे मूळ योगविद्येत सापडते. प्राचीन काळी ॠषी - मुनी तसेच राजघराण्यातील व्यक्ति या शास्त्रात पारंगत होत्या. दैनंदिन जीवनात संमोहनाचा वापर होत असे. जगातील वेगवेगळ्या जाती - जमाती, धर्म व परंपरेत सुध्दा वेगवेगळ्या पध्दतीने संमोहनाचा वापर होत आला आहे. पाश्चात्यांकडे राजाच्या ह्स्तस्पर्शाने रोग निवारण होतो अशी दृढ समजूत होती. यालाच रॉयल टच असे म्हणत. त्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्मात संत महात्म्यांनी हस्त स्पर्शाने लोकांना रोगमुक्त केल्याची उदाहरणे आहेत.

हा सर्व संमोहनशास्त्रातील सूचनांचा प्रभाव आहे. आजही बरेच लोक साधु महाराजांकडे जातात व तेथून आल्यानंतर केवळ श्रध्देने बरे होतात. यामागे आपल्याच अंतर्मनाची प्रचंड ताकद असते याची जाणीव कुणालाच नसते.

संमोहनशास्त्राला इतिहासाची जोड मिळते ती मात्र केवळ पाश्चात्यांकडे शास्त्राशुध्द अभ्यासाने, त्याचे सर्वसाधारणपणे पुढील टप्पे आहेत.

ऍनिमल मॅग्नेटिझम
२३ मे, १७३४ मध्ये जन्मलेल्या डॉ. फ्रन्झ अँटन मेस्मेर यांनी प्राणशक्ति या तत्वाची संकल्पना मांडली. डॉ. मेस्मेर यांच्या म्हणण्याप्रमाणे अंतराळातून एक प्रचंड गूढ शक्ति पृथ्वीवर येत असते. ही शक्ति जड पदार्थांमध्ये साठवून रुग्णांना दिल्यास रुग्ण बरे होतात. यामुळेच रोग्यांवर उपचार करताना डॉ. मेस्मेर आपल्या हातातील छडी उंच आकाशाकडे धरत व नंतर त्या छडीने रोग्यांना स्पर्श करीत असत. डॉ. मेस्मेर यांचा त्यांच्या सिध्दांतावर गाढ विश्वास होता व रुग्णांची डॉ. मेस्मेर यांच्यावर अपार श्रध्दा होती. परिणामी डॉ. मेस्मेर यांच्याकडे प्रंचड प्रमाणात रुग्ण येऊ लागले व औषधांशिवाय बरे होऊ लागले. हजारो रुग्णांना डॉ. मेस्मेर यांनी केवळ स्पर्शाने बरे केले.

इंग्लंडच्या राणीच्या दरबारात पियानो वाजवणारी मिस मेरी वयाच्या चौथ्या वर्षानंतर अचानक अंध झाली. त्यावेळच्या प्रसिध्द डॉक्टरांनी बरेच औषधोपचार करुन सुध्दा तिला दुष्टी प्राप्त होऊ शकली नाही, मात्र डॉ. मेस्मेर यांच्या उपचारांनी चमत्कारच झाला. मिस मेरीला दिसू लागले.

परंतु या घटनेचा परिणाम वेगळाच झाला. इतर डॉक्टर मंडळी व मेस्मेर यांचे हितशस्त्रू यांनी डॉ. मेस्मेर हे परमेश्वरी संकेता विरुध्द काम करतात असे म्हणून त्यांची अवहेलना केली. तत्कालीन शासनाने त्यांना हद्दपार केले. डॉ. मेस्मेर यांच्या आयुष्यात अशा प्रकारे बऱ्याच वेळा मानहानीचे प्रसंग ओढावले पण त्यांनी आपल्या तत्वाचा पाठपुरावा सोडला नाही. त्यांच्या उपचार पध्दतीतील चमत्कार पाहून बऱ्याच जणांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. अशा या अलोकिक व्यक्तिमत्वाचा सन १८१५ मध्ये मृत्यु झाला. या थोर महात्म्याला संमोहनशासत्राचा जनक असा मान मिळाला.