Print
Hits: 10657

आत्मसंमोहन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. संमोहनाव्दारे थेट अंतर्मनाशी संपर्क साधता येतो. आत्मसंमोहनाने अंतर्मनाचे दार उघडता येते.

प्रथम स्वत:च्या स्वभावाचे अवलोकन करा. स्वत:कडे तटस्थतेने पहायला शिका. आपल्यातील गुण व दोष शोधून काढा. सुरुवातीस हे काम खूप कठीण वाटेल पण सरावाने सहज शक्य होईल. माझे एक स्नेही डॉ. अमर निकम हे होमीओपॅथीची प्रॅक्टीस करतात. होमीओपॅथीक औषध योजना करताना स्वभाव धर्माचा सुध्दा विचार केला जातो. नवीन आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारतात "तुमचा स्वभाव कसा आहे?"

डॉक्टरांना अभिप्रेत उत्तर असते भित्रा, धीट, मनमिळाऊ, चंचल इ. पण यावर बहुतेक सर्वजण उत्तर देतात "चांगला आहे" म्हणजेच स्वत:च्या स्वभावातील गुण-अवगुणांची परीक्षा करण्यास आपण तयार नसतो. त्यासाठी काही सोपे प्रश्न स्वत:ला विचारा.

उदाहरणार्थ

 1. मला पटकन राग योतो का?
 2. लहान सहान संकटांनी मी घाबरुन जातो का?
 3. मी नवीन कामाची जबाबदारी टाळतो का?
 4. मी व्यसनाधीन झालो आहे का?

अशाप्रकारच्या प्रश्नांनी तुम्हांला तुमच्या स्वभावाचे अवलोकन करता येईल. नंतर आपल्या स्वभावाचे परिक्षण करा. परीक्षणात दिसून येणारे गुण व दोष गोष्टींची नोंद करा. आपले जीवन अधिक यशस्वी करण्यासाठी गुण वाढीस लागले पाहिजेत व दोष दूर झाले पाहिजेत. म्हणून दोष दूर करण्याच्या व गुण वाढीस लागणाऱ्या सूचनांची यादी बनवा. (काही चांगल्या सूचनांची यादी पहा.) तुम्हांस काही आजार असल्यास तो आजार बरा होण्याच्या सुचनांचा सुध्दा यात समावेश करावा. उदा.‘माझी पाठदुखी आजपासून कमी होऊन थोड्याच दिवसांत ती पूर्ण बरी होणार आहे.’ या सर्व सूचनांची उजळणी करा व नंतर आत्मसंमोहित व्हा.

आत्मसंमोहनाच्या हलक्या किंवा मध्यम अवस्थेत असताना अंतर्मनास सूचना देत रहा. पूर्ण श्रध्देने व गाढ आत्मविश्वासाने नियमितपणे आत्मसंमोहित होऊन सुचना घेत रहा. थोड्याच दिवसांत या सूचनांचा प्रभाव तुम्हांस नक्कीच जाणवू लागेल.

औषधोपचाराने बरे न होऊ शकलेले दूर्दम्य आजार केवळ आत्मविश्र्वास व स्वयंसूचनांनी बरे झाल्याची अनेक उदाहरणे या जगात आहेत.

कही चांगल्या स्वयंसूचना

 1. आजपासुन माझ्या मनातील सर्व ताणतणाव दूर होऊ लागले आहेत आणि थोड्याच दिवसांत ते संपूर्ण नाहीसे होतील.
 2. माझ्या मनाची एकाग्रता आजपासून अधिकाधिक वाढत जाईल.
 3. माझ्या मनांत असलेली सर्व प्रकारची भिती आज पासून कमी कमी होत जाऊन थोड्याच दिवसांत संपूर्ण नाहीशी होईल.
 4. मला जाणवणारा सर्व प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास आज पासून कमी होत जाईल व काही दिवसात पूर्णपणे नाहीसा होईल.
 5. माझी स्मरणशक्ति अधिकाधिक विकसित होत चालली आहे. लिहिलेले, वाचलेले, ऐकलेले व पाहिलेले माझ्या संपूर्ण लक्षात राहील व योग्य वेळी ते मला संपूर्ण आठवेल. माझ्या बुध्दीचा मी पूर्ण क्षमतेने वापर करीन.
 6. माझ्या मनांत जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होत चालला आहे आणि तो रोज अधिकाधिक वाढत जाणार आहे.
 7. मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक यशस्वी होइन.
 8. आजपासून सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मी मुक्त होइन.
 9. रोज रात्री मला शांत आणि गाढ झोप लागेल.
 10. जीवनात मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक सुधारत जाइन.