Print
Hits: 12043

वेलदोडे - इलायची (Eataroa cardamaom)
वर्णन

Eataroa cardamom वेलदोडे

जाड, रसाळ, बहुशाखीय मूलकाष्ठ आणि अनेक सरळ हवेत वाढणारी खोडे असणारी औषधी, काहीवेळा ३ मीटरपर्यंत उंच वाढणारी, पाने फार मोठी ३०-९० से.मी. लांब, अरूंद, एक ठळक मध्यशिरा व त्यापासुन निघणाऱ्या अनेक लघुशिरा असलेली, पुष्पविन्यासाचा दांडा खोडाच्या खालच्या भागात जमिनीजवळ निघतो फुले ४ से.मी. लांब, पांढरी किंवा फिकट हिरवी, ३०-९० से.मी. लांब गुच्छात.

फळे सुमारे १.५ से.मी. लांब फिकटी हिरवी, पिवळी, अंडाकृती, ३ कोष्ठकी, अनेक बिया असलेली, बिया त्रिकोणाकार, तपकिरी - काळया, झाडांचा आणि त्याच्या अवयवांचा आकार ठिकाणांवर आणि जातींवर अवलंबून असतो व बदलत असतो.

तथापि फळे आणि बियांच्या आकारात फारसा फरक दिसत नाही. बाजारात येणाऱ्या बहुतेक फळांना गंधकाची धुनी देऊन रंगहीन पांढरे केले जाते.
वितरण
दक्षिण भारतात ते विशेषत: म्हैसूर केरळच्या डोंगराळ भागातील ओल्या जंगलात नैसर्गिक अवस्थेत सापडते. ते भारतात इतरत्र सुध्दा लावले जाते.
औषधी उपयोग
वाळलेल्या फळांचा औषधात समावेश होतो. आवश्यक तेवढी फळे फोडून बिया काढतात व या बियाच वापरल्या जातात. पोटाच्या फुग्यावर आराम मिळविण्यासाठी मुख्यत: कॉरडॅमॉमचा उपयोग होतो वस्तूत: ते पचनास मदत करते. ते रेचकाबरोबर वापरतात आणि सुगंधी पदार्थ म्हणून वापरतात.

कॉरडॅमॉमची आले, जिरे, लवंगा या बरोबर भुकटी करण्यात येते व ती अपचन इत्या. वर उपयोगी असते.
इतर उपयोग
स्वयंपाकात, विडयांमध्ये व मिठायामध्ये कॉरडॅमॉम मोठया प्रमाणावर वापरले जाते. बियांपासून काढलेल्या तेलास सुगंधी म्हणून पेयात वापरतात. १९७८-७९ मध्ये ५५० लक्ष रूपयांचे वेलदोडे निर्यात करण्यात आले.

दालचिनी (Cinnamomum zeylanicum)
झिलॅनिकम हे शास्त्रीय नाव सिलोनशी संबंधीत आहे, या ठिकाणी हे झाड नैसर्गिक अवस्थेत वाढते.
वर्णन
हे सदाहरित झाड आहे. वर्षभरात कधीही यांचे पाने गळून पडत नाहीत व ६ ते ८ मीटर उंच वाढते. पाने अंडाकृती, जाड कातडयासारखी, अग्रास टोकदार, चकाकी असणारी खालच्या भागात फिकट हिरवी पानांच्या मुख्य शिरा पानाच्या पायापासून ते मध्यापर्यंत येणाऱ्या, फुले लहान, मोठया केसाळ गुच्छात, फळ लांबट किंवा अंडाकृती सुमारे १.५ ते २ से. मी. लांब, गर्द जांभळे, एक बीजी.
वितरण
हे झाड दक्षिण भारतात समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर उगवते, तसेच २००० मीटरपेक्षा कमी उंचीवरसुध्दा थोडया भागात नियमित आढळते. भारताच्या काही भागात त्याची लागवडही केली जाते.
औषधी गुणधर्म
झाडाच्या फांद्या तोडून त्यांची साल काढण्यात येते, आतली कोरडी साल म्हणजे दालचिनी आहे. ते अतिसार, मळमळ आणि वांत्यावर वापरले जाते. सर्वसाधारणपणे ते मसाला म्हणून वापरले जाते. सालीपासून सिनॅमॉन नावाचे तेल काढण्यात येते. या तेलाचे गुणधर्म सालीच्या गुणधर्माप्रमाणेच आहेत पण काही बाबतीत ते सालीपेक्षा सरस आहेत. पोट दुखणे, पोटात वायु होणे यावर वापरले जाते, तसेच काही प्रकारचे जंतू व बुरशीनाशक गुणधर्मसुध्दा आहेत. पानातून काढलेले तेल रूचिवर्धक आणि संरक्षणशील म्हणून मिठाई, साबणे वगैरेत वापरतात. काही प्रकारच्या संधिवातात दुखत असलेल्या जागेवर लावण्यासाठी उपयोग करतात.
इतर जाती
सिनॅमॉमम कॅम्फोरा ची लागवड भारतात निलगिरी पर्वतात व उत्तर भारतातील वनस्पत्योद्यानात होते. पाने व लाकडाच्या उर्ध्वपतनाने या झाडापासून कापूर मिळतो. मुख्यत: मुडपणे, सुजणे आणि संधिवातामुळे होणारे दु:ख यावर वरून लावण्यासाठी कापूर वापरतात. यास काही प्रकारच्या अतिसारात पोटातूनही देण्यात येते किंवा हृदयाचे उत्तेजक म्हणूनही वापरतात. कापूर आणखी अनेक प्रकारे वापरतात आणि दरवर्षी ५००० क्विंटल्सपेक्षा जास्त कापूर भारतात आयात होते. (आता विशेष प्रकारच्या ऑसिममच्या जातीपासूनसुध्दा कापूर काढण्यात येतो. त्या प्रजातीत तुळशीचा समावेश होतो.) सिनॅमॉमला टॅनेला (तमालपत्र) मध्य हिमालयात, आसाम व बंगालच्या भागात सापडते. पाने मुख्यत: मसाला म्हणून वापरतात, पंरतु पोटातील वायुवर अतिसारातसुध्दा वापरतात.