Print
Hits: 65202

तुळशी (Oscimum sanctum)
वर्णन

Tulsi तुळशी

हे भारतीयांचे प्रसिध्द आणि पवित्र झाड आहे. ती बहुशाखीय ताठ - सरळ, ७५ सेमी. पर्यंत वाढणारी औषधी आहे, सर्व अवयव केसयुक्त, पाने संमुख, सुमारे ५ सेमी. लांब, कडा दातेरी किंवा साध्या, वरच्या व खालच्या पृष्ठभागावर केंसाळ, बारिक ग्रंथीच्या ठिपक्यांनीयुक्त, सुवासिक, फुले लहान, जांभळट किंवा तांबुसआरक्त, लहान दाट, गुच्छ, सडपातळ कणिसात, फळे लहान बिया पिवळसर किंवा तांबूस-आरक्त.
वितरण
हे झाड भारतात सगळीकडे, घरांमध्ये, बागामध्ये आणि मंदिरामध्ये लावले जाते. बऱ्याच जागी ते जंगली स्वरूपातही उगवते.
औषधी गुणधर्म
या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत. पानांपासून काढलेल्या तेलात जीवाणू व कीटाणू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे. पानांचा काढा किंवा रस फुफ्फूसाच्या नळ्या सुजण्यावर, पडशावर, पचनाच्या विकारात उपयोगी आहे. ते त्वचारोगावर व नायट्याच्या जागी लावण्यात येते. पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात. पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो. बिया मूत्र उत्सर्जन संस्थेच्या रोगावंर उपयोगी आहेत. मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो.

सर्पगंधा (Raulfia serpentina)
भारतात बऱ्याच ठिकाणी या झाडास सर्पगंधा या नावाने ओळखली जाते. काही ठिकाणी शास्त्रीय नावावरून राउवोल्फिया या नावानेपण ओळखतात. हे शास्त्रीय नाव जर्मन वनस्पती तज्ञ आणि वैद्य लिओनाई राउवोल्फ यांच्या नावावरून देण्यात आले आहे.
वर्णन
३०-७५ सेमी. उंच ताठ सरळ गुळगुळीत क्षुप, पाने मंडलाकार, ८-२० सेमी. लांब निमुळते होत पर्णवृतांत सांमीलित होणारी, फुले सुमारे १.५ सेमी. लांब दले पांढरी किंवा फिकट गुलाबी, पुष्पबंधाक्ष गर्द लाल, लहान गुच्छांमध्ये, फळे लहान गोल, पक्व झाल्यावर गर्द जांभळी किंवा काळपट.
वितरण
१०० मीटर उंचीवर हे झाड भारतात सर्वत्र सापडते. हिमालयाच्या पायथ्याशी, पुर्व आणि पश्‍चिम घाटाच्या कमी उंचीच्या पर्वत रांगामध्ये हे झाड सर्वसामान्यपणे सापडते. ते बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राच्या अनेक मैदानी सपाट जागेवरूनही गोळा करण्यात आलेले आहे. सध्या हे झाड अनेक जागी लावण्यात येते.
औषधी गुणधर्म
सालीसह वाढवलेली मुळे या झाडापासून मिळणारे औषध आहे, मात्र ती शक्यतो ३-४ वर्षाच्या झाडांपासून हिवाळ्यात जमा करण्यात आलेली असावीत. राउवोल्फिया, भारतीय औषधात ४००० वर्षापुर्वीपासून माहीत होते असे समजण्यात येते. चरकाच्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. या झाडाच्या मुळात अनेक ऍल्कलॉइडस असतात या औषधाचा मुख्य उपयोग उपशामक म्हणून निद्रेसाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. सध्या या औषधाचा उपयोग मनोविकारात आणि उच्च रक्तदाबात मोठया प्रमाणावर होतो. उपशामकतेस या औषधाने वेळ लागतो म्हणुन तीव्र त्रास असलेल्या रूग्णांसाठी हे फारसे उपयोगी नाही. प्राथमिक व सौम्य अवस्थेत असलेल्या रूग्णांसाठी किंवा जुन्या मानसिक विकारावर ते अतिशय योग्य औषध आहे. या औषधात मन शांत स्थिर ठेवण्याचा गुणधर्म आहे. श्वासनलिका सुजलेल्या, दम्याच्या व जठरात क्षत असलेल्या रूग्णांना हे औषध देण्यात येऊ नये.

या झाडांची मुळे उदराच्या रोगावर आणि ज्वरात सुध्दा उपयोगी आहेत. सर्पगंधा या प्रजातीच्या इतर जातीही (टेट्राफिला L. syn रा. कॅनसेनस L) औषधी म्हणून उपयोगी आहेत.

या झाडाच्या समूहावर बरेच संशोधन करण्यात आलेले आहे आणि सध्याही होत आहे. या बाबतीत भारताची प्रगती अभिमानास्पद आहे तरी काही देश राउवोल्फियाचा परिणाम असलेली कृत्रिम उत्पादने निर्माण करण्यात गुंतलेले आहेत. सर्पगंधाची भारताची वार्षिक गरज १२०० क्विंटल्स आहे आणि त्याची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हे झाड मैदानी प्रदेशात जवळपास सगळीकडे आणि उपहिमालयाच्या सदाहरित अरण्यात लावले जाऊ शकते.

या झाडाचे मुळांच्या तुकडयांपासुन उत्कृष्ट असे शाकीय प्रजनन होऊ शकते. नवी झाडे बी आणि खोडांच्या तुकडयांपासूनही निर्माण केली जातात. एक एकारात ६-७ क्विंटल्स औषध जमा करण्यात यश आले आहे. याहीपेक्षा जास्त उत्पादन दोन वर्षाच्या शेतीपासून फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट, देहराडूनने करून दाखवले आहे. या औषधाची निर्यात करण्यात आले आहे. आणि १९७७-७८ साली ४०,००० रूपयांचे राउवोल्फिया निर्यात करण्यात आले आहे.