Print
Hits: 15224

कांदा (Palandu)

Palandu कांदा

वर्णन
प्रसिध्द आहारोपयोगी कन्द, ६० सेमी, ते १ मीटर उंचीचे द्विवर्षायूक्षुप. पाने लांब मांसल पोकळ. पुष्प लांब आणि हिरव्या पुष्पदण्डाच्या अग्रभागी येणारी सवृन्त येणारी पांढरी क्वचित त्यांच्याबरोबर कलिकाकंद येतो.

फळ तीन कप्पे असलेले स्फुटनशील. बीज त्रिकोणी काळे, हिवाळ्यात फुले व नंतर फळ येतात. भारतात सर्वत्र आढळतो.
औषधी गुणधर्म
वेदनास्थापन, शोथहर, लेखन, व्रणशोथपाचन आणि त्वगदोषहर असल्याने वातवाहिन्यांचा शूल व व्रणावर गरम कल्क, मुखरोगांवर स्वरस किंवा कल्काचा लेप, दृष्टिशक्तिकर असल्याने स्वरस आनि मधाचे अंजन व कर्णशूलावर गरम रसाचे थेंब कानात घालावेत.

रक्तस्तंभन असल्याने रक्तार्श व नाकातून रक्त येत असल्यास, तसेच उत्तेजक व शोथघ्न असल्याने हृदयदुर्बलता व सूज यावर उपयोग होतो तसेच वाताहर आणि वेदस्थापन असल्याने संधिवात, गृध्रसी (sciatica), आचके येणे (फिट येणे), यावर आणि मूत्रजनन असल्याने मूत्र त्रास असल्यास, शुक्रदौर्बल्यात, याचा उपयोग होतो. बल्य व ओजोवर्धक असल्याने सामान्य दौर्बल्य आणि प्लेग या रोगात प्रतिकारशक्ति वाढविण्यास तसेच लेखन आणि वाजीकर म्हणून बीज उपयुक्त.

ज्येष्टमध (Yashtimadhu)
वर्णन
१ ते ५ मीटर उंचीचे बहुवर्षायू क्षुप. मूळ लांबट, लालसर पिवळे किंवा धुरकट रंगाचे, मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाचा व धाग्यांनी युक्त गाभा. पर्ण संयुक्त पर्णदल अण्डाकार. पर्णदलाच्या ४ ते ७ जोडया असतात. पुष्प गुलाबी किंवा वांगी रंगाचे, फळ सुमारे २.५ सेमी. लांबीच्या चपट्या शेंगांच्या स्वरूपात प्रत्येक शेंगात २ ते ३ वृक्‍काकार बिया असतात.
औषधी गुणधर्म
स्वरभंगावर यष्टिमधुचूर्ण तूपसाखरेबरोबर द्यावे. उलटीमध्ये पित्त पडत असल्यास जेष्टमध व रक्तचंदन ही दुधात उगाळून द्यावीत. लघवीला त्रास होत असल्यास जेष्टमधचूर्ण दूधात शिजवून ते पिण्यास द्यावे. खोकला व दम्यामध्ये कफ सुटण्यासाठी यष्टीमधूचा काढा मध व खडी साखर घालून द्यावा. जोडीला मधाचा वापर केल्याने कफ प्रकोप होण्याचा धोका टळतो. विषविकारावर याचा काढा मधाबरोबर द्यावा.

श्वेतेप्रदरात यष्टिमधुचूर्ण तांदूळाच्या ध्रुवणात उगाळून साखरेबरोबर द्यावी. व्रणामध्ये यष्टिमधुचूर्ण तेलात शिजवून ते तेल व्रणरोपणावर वापरावे. रक्तरोगावर श्वेतचंदन व जेष्टमध यांचा काढा करून द्यावा. अतितहान लागत असेल तर जेष्टमधाचा काढा वापरावा.