Print
Hits: 24535

माणसाचे मन हे एक अजब रसायन आहे. वेळोवेळी दृग्गोचर होणार्‍या मनाच्या क्रीडेला संपूर्ण मानसशास्त्रीय बैठक असते. याच पार्श्वभूमीवरून या मालेतील लेख प्रशिध्द झाले.

हा शेवटचा लेख. विषय काहीसा स्फोटक, पण शास्त्रीय मीमांसा बानवकशी- सोन्याएवढीच झळझळीत. पन्नाशीत असलेल्या किंवा पन्नाशी ओलांडलेल्या स्त्री- पुरूषांनी लैंगिक- सुख मिळवायचे तर या लेखातील सूचना लक्षात ठेवायला हव्यात. आपल्या भारतीय संस्कृतीत लैंगिकता या शब्दाचा फारच बाऊ केला जातो. या शब्दाच्या निव्वळ उच्चारानेसुध्दा वातावरणात संकोच, लज्जा निर्माण होते.

शास्त्रीय सत्यापेक्षा लैंगिक आयुष्य अनुभवणे हे निरोगी, निकोप जीवनाचे लक्षण आहे. या उलट विषयवासनेबद्दल अनिच्छा हे अनारोग्याचे लक्षण आहे. जसजसे आपण वयाने प्रौढ बनत जातो. तसतसे लैंगिक सुख घेण्याची गरज उरत नाही, असा एक गैरसमज, समाजात रूढ आहे. सत्य हे आहे. की प्रौढावस्थेतसुध्दा व्यक्ती लैंगिक आयुष्य पूर्वायुष्यातील रसिकवृत्तीने व समरसतेने जगू शकतात. एखादा साठीचा माणूस त्याच्या तरूणपणीच्या आयुष्याप्रमाणे खवय्या असू शकतो. त्याचप्रमाणे तारूण्यात त्याने अनेकदा अनुभवलेले लैंगिक सुख त्याच प्रमाणात तो उतार वयातही अनुभवू शकतो. भूक लागल्यावर खाणे ही ज्याप्रमाणे प्रत्येक स्त्री- पुरूषाची गरज आहे, अगदी तशीच लैंगिक आयुष्य अनुभवण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सर्वसाधारणपणे असा एक समज (गैर?) समाजात सर्वदूर पसरलेला आहे की उतारवयात स्त्री- पुरूषांनी समागमाचे सुख घेणे हे शिष्टसंमत नाही, पण हे खरे नाही. एखादे जोडपे वयाच्या तिशीत लैंगिक सुख ज्या उत्कटतेने घेऊ शकते, त्याच उत्कटतेने पन्नाशीतही ते जोडपे समागमसुख अनुभवू शकते.

नैसर्गिक इच्छा दबून राहिल्या तर
सर्वसाधारणपणे भारतीय जनमानसात अशी एक दृढ कल्पना आहे की, समागमाचा उद्देश म्हणजे अपत्यप्राप्ती! त्यामुळे मुल बाळ झाल्यावर समागमाची आवश्यकता नाही, अशी भ्रामक कल्पना कित्येक जोडपी उराशी बाळगून असतात. त्यामुळे एकदा चौकोनी कुटुंब तयार झाले की, लैंगिक संबंध कमी होत जातात व त्यामुळे पती- पत्‍नीपैकी एखाद्याला लैंगिक इच्छा अनावर झाली तरी ती आपल्या जोडीदारापुढे व्यक्त करणे हे सुध्दा त्यांना अपराधीपणाचे वाटते. या नैसर्गिक इच्छा अशा दबून राहिल्या म्हणजे दु:ख, नैराश्य, अगतिकता यासारख्या भावना मूळ धरू लागतात. आयुष्य दिशाहीन व एकाकी वाटू लागते. सर्व कळत असते पण वळत नाही.

आम्हा भारतीयांच्या बाबतीत वैवाहिक आयुष्यातील लैंगिक अनुभवांवर ‘धर्म’ या संकल्पनेचा जबरदस्त पगडा आहे. शिवाय पालकांकडून लैंगिक आयुष्याबद्दलचे स्पष्ट व शास्त्रशुध्द धडे नव्या जोडप्याला मिळण्याची शक्यता जवळजवळ नसतेच, त्यामुळे मग नवविवाहितांचे लैंगिक आयुष्य असमाधानकारक बनते. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे, की समजा एखाद्या जोडप्याच्या बाबतीत लैंगिक अनुभव समस्याप्रधान असेल तर त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक जीवनावर गंभीरपणे होतो.

उतारवयातील स्त्रियांमधील लैंगिक समस्यांची काही कारणे पुढीलप्रमाणे
साधरणत: पन्नाशीतील स्त्री ही आपल्या आयुष्याबद्दल उदासीन बनलेली असते. कुटुंबाच्या पालनपोषणताच तिचे आयुष्य खर्ची पडलेले असते. अर्थात स्त्रियांची या वयातील मानसिक परीपक्वता इथपर्यंत येऊन पोहचलेली असते, की लैंगिक आयुष्य जगण्यात एकप्रकारचे अपराधीपण नसून आनंद, किंव सुख आहे, असे त्यांना मनापासून वाटते. अपत्यप्राप्ती किंवा गुप्तरोगाचा संभव आता नसणारच ह्या भावनेमुळे त्या जास्त मोकळ्या बनलेल्या असतात. या काही कारणांमुळे अशा वयातील स्त्रियांची कामेच्छा फुलूनही येते. बर्‍याचशा स्त्रियांना या वयात आपल्या पतीबद्दलचे नैसर्गिक आकर्षण नव्याने जाणवू लागते. शारीरीकदृष्ट्या उत्तम व टुकटुकीत रहाण्यासाठी, व्यक्तिमत्व आकर्षक करण्याकडे तिचा कल वाढतो. त्यामुळे पन्नाशीच्या सुरवातीला ‘दुसरा मधुचंद्र’ साजरा करण्याचे दिवस लाभतात.

वरील मनोवस्था ही एका स्त्रीगटाच्या बाबतीत सकार होते, पण ह्याउलट स्त्रियांचा असाही एक वाढता गट आहे की, जो समागमसुखाबाबतीत टोकाची भूमिका गाठतो. अशा स्त्रियांना आपल्या तरूण वयात काम‍उद्दीपन होण्याची शक्ती कमी असते.

भिन्नलिंगी आकर्षण कमी असते. ह्या स्त्रिया मग पौढपणी उत्तेजित होत नाहीत. मग ह्या स्त्रिया असा समज करून घेतात, की या उतारवयामुळे आपण लैंगिक बाबतीत उदासीन आहोत. या समजुतीमुळे त्या स्वत:ची कमतरता, अस्वस्थता कमी करण्याच्या उद्योगाला लागतात.

आपल्या समाजात विधवा किंवा परित्यक्ता स्त्रिया क्वचितच पुनर्विवाह करतात. अशी संधी ज्यांना मिळत नाही त्या स्त्रिया सततची एक असुरक्षिततेची भावना घेऊन जगत असतात. ह्या भावनेवर मात करण्यासाठी मग त्या धर्मकांडांच्या मार्ग लागतात. समाजसेवा, धंदा व्यवसाय ह्यात स्वत:ला गुंतवून टाकतात किंवा मुलां- नातवंडांची नको इतकी काळजी घेण्यात गर्क राहतात. त्यांच्या लैंगिक भावभावनांचा निचरा नैसर्गिकपणे होत नसल्याने त्या शारीरिक पातळीवर कमालीच्या दमतात, हरप्रयत्‍नांती संभोगसुख न मिळाल्याने निर्माण झालेले ताणतणाव अशा स्त्रिया कमी करतात. त्यामुळे ऋतूनिवृत्तीपूर्व काळातच स्त्रियांना त्यांच्या पुढील लैंगिक आयुष्याबद्दल शास्त्रीय (counselling) देणे हिताचे ठरेल. लैंगिक आयुष्याबद्दल असुरक्षित असमाधानी, अज्ञानी स्त्रियांचे पुढील आयुष्यातील ताणतणाव त्यामुळे हलके होण्यास मदत होईल.

प्रौढावस्थेतील पुरूषवर्गाचा त्यांच्या वैयक्तिक पातळीवरून अलग अलग पध्दतीने विचार केल्यास त्यांची मनोवृती वेगवेगळ्यां सहा स्तरांवर विभागली जाईल.

१. लैंगिक अनुभवातील तोच तोचपणा
ह्यामुळे पत्‍नीविषयी एकप्रकारचा कंटाळवाणा सूर निघत राहतो. सर्वसाधारणपणे पुरूष हा एकाच वेळी अनेक स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटण्याच्या निसर्गदत्त प्रवृत्तीत मोडतो. साहजिकच पत्‍नीशी ( एकाच स्त्रीशी) सततचा लैंगिक अनुभव घेण्याच्या एकसुरीपणामुळे त्याचे पत्‍नीविषयीचे शारीरिक आकर्षण उत्तरोत्तर कमी होत जाते.

सहाजिकच प्रौढ पुरूषांमध्ये एक प्रकारची लैंगिक विफलता, क्वचित वैमनस्य त्यामुळेच निर्माण होते. हे लैंगिक आकर्षण, समर्पणभाव लोप पावण्याची इतरही कारण असतात. त्यांची व्यावसायिक व सामाजिक जीवनातील व्यग्रता, कुटुंबाचे संवर्धन अशा सारख्या जबाबदाऱ्यांमुळे तो लैंगिक जीवना बद्दल उदासीन होऊ शकतो.

२. कामेच्छाचे कमी जास्त प्रमाण
४० ते ६० वयोगटातील बहुतेक पुरूष आपला धंदा-व्यवसाय, कार्यालयीन उद्योग म्हणजेच ‘करियर’ ह्यामध्ये इतके गुंतून गेलेले असतात की त्यांना इतर गोष्टींचा विचार करायला वेळ नसतो आणि काही वेळा इच्छाही! स्वत:च्या व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासही ते अग्रक्रम देतात. ह्या साऱ्या गोष्टीत ते इतके बुडून गेलेले असतात की, आपल्या कामधंद्याविषयी पत्‍नीबरोबर बोलण्यासही त्यांना वेळ उरत नाही. सहाजिकच स्त्री-पुरूषामधील परस्परसामंजस्य, उरतच नाही. असे जोडपे मग लैंगिक-सुख सहजतेने कसे घेऊ शकेल? एखाद्या दिवशी त्याच्या धंद्याव्यवसायात त्याचे काम बिघडले. बिनसले तरीही त्याची कामेच्छा कमी होते. याउलट आपल्या कार्यक्षेत्रात तो यशस्वी ठरला, खुशीत असला तर त्याची समागमाची इच्छा उफाळून येते.

३. शारीरिक व मानसिक ताणतणाव
अवास्तव शारीरिक श्रम, ताण, समागमाची इच्छा यामुळे कमी होते.

या वस्तुस्थितीचा विचार केल्यास आपण अशा महत्वाच्या मुद्यापर्यंत येऊन पोहचतो, की आपल्या समाजातील मध्यवयीन पुरूष स्वत:च्या शारीरिक तंदुरूस्ती बाबत जागरूक नसतात. उत्तम आरोग्य जोपासण्याबद्दल बेफिकिर असतात. त्यामुळे आठवडाभर काम उपसल्यावर शनिवार, रविवार-सुट्‌टीचे दिवससुध्दा करमणूक, सहली अशांसाठी कारणी लावले तरी त्यांची दमछाक होते. अशी स्थिती विशेषकरून पन्नाशीपुढील पुरूषांचे होते. त्यामुळे शरीरीक दृष्ट्या फारसा ‘फिट’ नसलेला कोणताही पुरूष सततच्या शारीरिक श्रमाने लैंगिकजीवनात उत्तेजित होऊ शकत नाही. शारीरिक अतिश्रमानंतरचे २४ ते ४८ तास तर त्याल समागमाची उत्कट ओढ वाटतच नाही.

ऑफिस मधल्या ताणतणावाची परीणीती मानसिक थकव्यात होते व मग हळुहळु त्याला शारीरिक दृष्ट्या गळून गेल्यासारखे वाटू लागते. वाढत्या वयाबरोबर त्याची जास्तीत जास्त मानसिक ऊर्जा खर्ची पडत जाते व त्याबरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, व्यावसयिक अडचणींंमुळे तो कातावून जातो. त्यावेळी तर त्याची लैंगिक-भावना उद्दीपित होतच नाही, पण त्यानंतर काही कालपर्यंत तो समागमोत्सुक राहू शकत नाही. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे ती ही की, शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा लैंगिक भावनांच्या जास्त आड येतो.

४. खाण्याचा व अपेयपानाचा अतिरेक
खाण्यावर व अपेयपानावर निर्बंध नसेल तर अशा पुरूषांची कामेच्छा मंदावत जाते. मद्याच्या अंमलाखाली असणार्‍या पुरूषांमध्ये संभोगाच्यावेळी लिंगाचे उद्दीपनही होत नाही व अशावेळी पन्नाशीच्या पुरूषांमध्ये नपूंसकत्वाची भावना रूजू लागते.

५. तत्कालीन किंवा दीर्घकालीन अशा शारीरिक किंवा मानसिक उणीवा किंवा विकलांगता
मानसिक व शारीरिक विकलांगतेमुळे स्त्री-पुरूषांच्या लैंगिक सहवासात ताणतणाव निर्माण होतात. पती शारीरिक दृष्ट्या विकलांग असेल तर त्याच्या पत्‍नीमध्ये लैंगिक जीवनात असामाधानाची भावना निर्माण होते. याउलट पत्नीमध्ये शारीरिक असमर्थता असेल तर पुरूष लैंगिकदृष्ट्या असमाधानीच रहातो. असे म्हणता येणार नाही कारण सध्याच्या समाजरचनेत पुरूषाला लैंगिकतेच्या इतर अनेक वाटा उपलब्ध होतात.

६. लैंगिक अपयशाची भीति
वर दिलेल्या काही कारणांमुळे आपण आपल्या जोडीदाराचे लैंगिक अनुभवानंतर समाधान करू शकू किंवा नाही या भीतीपोटीच काही स्त्री-पुरूष संभोगक्रियेपासून दूर रहातात. एखाद्यावेळी स्वत:च्या नपूंसकत्वाचा अनुभव आल्यावर पुन्हा त्या लाजिरवाण्या अनुभवाला सामोरे जाऊन आपला पुरूषी अहंकार (Ego) दुखावला जाण्यापेक्षा एकूणच या प्रकारापासून लांब राहिलेले बरे असाही विचार काही पुरूषांच्या मनात बळावतो.

आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला राग किंवा तिरस्कार असल्यामुळे आपण लैंगिक अनुभव घेऊ शकत नाही. अशीही कारणे पुढे केली जातात. त्यामुळे लैंगिक उत्तेजनासाठी कित्येक पुरूष आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांकडे वळताना शास्त्रीय कार्यकारणभाव विचारात घेतल्यास असा निष्कर्ष काढता येईल, की पुरूषांच्या खोल अंतर्मनात कोठेतरी आपली लैंगिक क्षमता शक्ती पुनरूज्जीवन करण्याची ऊर्मी असते. आपली लैंगिक ताकद, जोम, अद्यापी टवटवीत असल्याचा आभास ते निर्माण करतात.

बाहेरख्याली पुरूषांमुळे त्यांच्या बायका स्वत:ला पराभूत समजतात. त्यांच्यात एक प्रकारची उदासीनता निर्माण होते. सारासार विचार करूनही अशा स्त्रिया मग आपणहून उत्स्फूर्तपणे आपल्या पतींकडून समागमसुख मिळण्याबद्दल सांशक राहतात, मग त्यांच्या मनातील लैंगिकक्रियांसंबंधाची आत्मीयता, समर्पणाची भावना कमी कमी होत जाते व उरतो तो फक्त विवाहामुळे मिळालेला अटळ व्यवहार! अशा रीतीने प्रौढ पुरूष त्याच्या पत्‍नीकडून चेतवला गेलाच नाही तर त्याचीही समर्पणवृत्ती संपुष्टात येते.

या सार्‍याचा निष्कर्ष थोडक्यात असा मांडता येईल, की वयस्कर जोडप्यांनी आपल्या शरीराचे व मनाचे संवर्धन उत्साहीवृत्तीने करून लैंगिक अनुभवामध्ये वैवाहिक जीवनातील कामोत्सुक वातावरण सदाबहार राहील, अशा पध्दतीची निकोप, आनंदी वातावरणनिर्मिती केली तर आपले लैंगिक आयुष्य वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत टिकून राहील.