खरं तर, आईच्या दुधाला पर्यायी दुधाची व्यवस्था असा विचारही मांडून, सविस्तर समजावून द्यायची गरज पडायला नको. पण यदाकदाचित् काही अटळ प्रसंगवशात अशी वेळ आलीच तर व्यवस्थित माहिती असावी.
नुसती पर्यायी योजनेची कल्पनाही मूळ योजनाचा पाया ढिला करू शकते. म्हणूनच कोणाही आईला ‘समजा तुला दुध आलं नाही तर तुझ्या बाळाला उपाशी रहायला लागणार नाही. अमुक इतके पर्याय आहेत असं कोणी आश्वासनपूर्वक सांगण्याला डॉक्टरांचा विशेषकरून बालरोगतज्ञांचा विरोध असतो. उलट आपल्या बाळाला आपलं दूध द्यायची मानसिक तयारी वाढविण्याच्या दृष्टीनं हे पर्याय नजरे आडच राहिले पाहिजेत. म्हणजे तिचं मनोधैर्य आपोआप वाढीला लागेल, आणि स्वत:चं दूध आपल्या बाळाला नक्की मिळेल अशा तऱ्हेचे प्रयत्न करताना ती दिसेल.
कोणत्याही सस्तन प्राण्यात, एवढंच नाही तर अडाणी अशिक्षित गरीब स्त्रीला तिच्या बाळाला ‘वरचं’ दूध म्हणजेच दुसऱ्या कोणा ‘प्राण्याचं’ दूध द्याव लागत नाही. मग माणसालाच, तेही अतिशिक्षित, उच्चशिक्षित, श्रीमंत स्त्रीलाच का लागावं? यात काही तर कमीपणा आहे असं तिला वाटण्याऐवजी आपण खूप सुधारलेली आहोत असं वाटणं किती विपर्यास्त आहे? हे कसं चूक आहे, हे तिला कोणी तरी समजावून सांगणं आता जरूरीचं झालं आहे. इतकं करूनही कधी कधी जर वरचं दूध देण्याची गरज निर्माण झालीच तर काही पर्याय आहेतच. पण ते मूळ योजनेइतके उत्तम निर्दोष कसे असणार? निसर्गाची बरोबरी किती करता येणार?
नैसर्गिक दुधं
आईच्या (मानवी) दुधाला अगदी जवळचा पर्याय म्हणजे गाढवीचं दूध! यातले सर्व घटक-रसायनांचं प्रमाण मानवी दुधाला सर्वात जवळचे आहेत. या खालोखालच्या क्रमांकावर वाघीणीचं, उंटीणीचं, आणि मग गाईचं, म्हशीचं शेळीचं इत्यादि क्रमांक येतात. पहिले तीन पर्याय सहजी पदरी पडण्यासारखे नाहीत म्हणून नंतरच्या ३ पर्यायांकडे पाहिलं गेलं आहे.
पूर्वीपासून आईचं नाही तर दाईचं, नाहीतर, गाईचं असे पर्याय दुधाला मानले आहेत. गाईचं दूध पचायला म्हशीच्या दुधांपेक्षा हलकं असतं. चरबी काढोन टाकल्यावर, रासायनिकदृष्ट्या त्या दोन्हीत पुष्कळसं साम्य आहे. या दोन्ही दूधात प्रोटीन्सचं प्रमाण आईच्या दुधाच्या तुलनेत बरंच असतं. ते कमी करण्यासाठी त्यात पाणी घातलं तर, त्याची चव जाऊन त्याचा अन्नांश कमी होतो. म्हणून त्यात साखर घालून त्याला चव आणून, त्याचा उष्मांक (कॅलरीज्) आईच्या दुधाच्या जवळपास आणता येतो. अशाप्रकाराणं दूध अ पाणी अ साखर याचं मिश्रण करून उकळून, जंतुरहित करून, आईच्या दुधाला जोड म्हणून, किंवा कधी कधी पर्याय म्हणून वापरता येतो. बाळं जितकं लहान तितकं पाण्याचं प्रमाण जास्त.
पुढं पुढं बाळाला हे दूध कसं पचतंय, यावर लक्ष ठेवत दुधाचं प्रमाण हळूहळू वाढवत, दोनास एक, तिनास एक, चारास एक व नंतर संपूर्ण दूध अशा स्थितीला (दर दोन आठवडयाला बदल करत करत) यायला हरकत नाही. तीन महिन्यानंतर बाळाला सर्वसाधारणपणे कोणतंही दूध पूर्ण स्वरूपात पचवण्याची क्षमता आलेली असते.
डब्यातलं पावडरचं दूध
आईच्या दुधाची बरोबरी करण्याचा माणसाचाच हा प्रयत्न, तो थोडाफार यशस्वी झालायही. पण हे कृत्रीम तऱ्हेने करतांना त्याची किंमत मात्र फार वाढत गेलीय. या दुधाच्या डब्यांवरची बाळं पाहून अशिक्षित आयांनाही आपल्या बाळाला हे दूध देऊन पहावं असा मोह होतो. सुशिक्षित स्त्रियांची कारणं निराळी असतील पण त्यांनाही असंच वाटतं. या दुधाकडं पाश्चात्य देशात तर फारच स्त्रिया आकर्षित झाल्या आहेत.
हे दूध देतांना त्याचं प्रमाण पाळणं फार महत्वाचं असतं. गरीब स्त्रीया डबा जास्त दिवस पुरावा म्हणून कमी कमी पावडर वापरून बाळाचं नकळत कुपोषण करतात. तर इतर स्त्रिया ‘जास्त ते चांगलं’ असं मानून जास्त पावडरचं दाट दूध पाजतांना दिसतात. परिणामी दुसऱ्या टोकाचं कुपोषणच (स्थूलपणा) होतं. सर्वसाधारणपणे ३० मिली ( १औंस) उकळून कोमट केलेल्या पाण्यात डब्यात दिलेला चमचा सपाट भरून घेऊन, कालवूनव दूध तयार करणं योग्य असतं. यात बदल झाल्यास वर सांगितल्याप्रामाणं परिणाम झालेले दिसतात.
आजकाल वेगवेगळ्या वयांसाठी, कमीजास्त पचन शक्तीच्या स्थितीसाठी वेगवेगळ्या दुधाच्या पावडरी मिळतात. त्याचा योग्य वापर कसा करावा हे समजून घ्यावं. या दुधाचा खरा फायदा अंगावरचं दुध नसलेल्या आईला प्रवासात आणि इतर कोणाचंही दूध मिळत नाही अशा ठिकाणी होतो. आणि ही पावडर कित्येक दिवस वापरता येते.
शेळीचं दूध हा पर्याय पचनशक्ती मंद असलेल्या मुलांनाच योग्य आहे. अपुऱ्या दिवसांची अशक्त मुलं किंवा खूप दिवसांच्या जुलाबातून बरं होणारं मूल यांच्या साठी तात्पुरता म्हणून हा पर्याय मानला गेला आहे. नेहमीच्या वापरासाठी हे दूध घेतलं तर त्याचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळं काही पोषणद्रव्य कमी पडून एक प्रकारचा ऍनिमिया होतो. तसंच या दुधाचं पोषणमूल्यही कमीच आहे. म्हणून नेहमीच्या वापरासाठी हा पर्याय योग्य ठरत नाही.
मुलाला वरचं दूध, आईच्या दुधाला जोड म्हणून चालू केलं तरी ते कसं पचतंय याकडे लक्ष देणं जरूर आहे. काही मुलांना ही दुधं जड पडतात. पोटाच्या किरकोळ तक्रारी सुरू होतात. हे फार त्रासाचं होत नाही. तोवर सारखे सारखे बदल करू नयेत. वरच्या दुधामुळं शीचा रंग फिका होतो.आंबूस वास येतो, आणि ती घट्ट बनत जाते. ही कडक शी होताना, बाळाला इजा होऊ नये म्हणून शी मऊ करण्याचे उपाय योजावे लागतात. यासाठी दुधातलं पाण्याचं प्रमाण वाढवणं योग्य नाही कारण, त्यामुळं दूध, पातळ होऊन त्याचं पोषणमूल्य कमी होते. त्याऐवजी साखरेचे प्रमाण दुप्पट करावं. याचा लगेच उपयोग झालेला दिसला नाही तर मात्र इतर मार्गांनी अन्नातला चोथा (रफेज) वाढवावा. पालक, टोमॅटो इ. चं दाट सूपही द्यायला लागावं. म्हशीच्या दुधापेक्षा गाईच्या दुधानं हा त्रास कमी होतो. जे दूध पाजल्यानंतर मुलाला त्याचा फारसा त्रास होतो(उदा. गॅसेस,अस्वस्थपणा, जुलाब शीमध्ये रक्त इ.) ते दूध लगेच बदलावं.
कसं पाजावं?
कोणतीही वरची दुधं पाजतांना दोन पर्याय आहेत. वरचं दूध देताना दुधाच्या, हातांच्या वाटी चमच्याच्या किंवा बाटलीच्या स्वच्छतेला फार महत्व आहे. यात कुठंही ढिलाई झाली की रोगजंतूंचा प्रसार झालाच म्हणून समजावं. गाई, म्हशीचं दूध निसर्गानं त्यांच्या बाळाला योग्य असं बनवलंय. या कोणत्याही दुधात रोग प्रतिबंधक शक्ती (माणसाच्या उपयोगसाठी )नसते. त्यामुळे आईच्या दुधावर असलेल्या मुलाच्या स्वच्छतेच्या कितीतरी पट स्वच्छता या बाळासाठी करावी लागते. वाटीचमच्यानं किंवा गोकर्णानं किंवा बाटलीनं यापैकी पाजायला सर्वात कमी त्रासाचं म्हणून बाटलीचा पर्याय स्वीकारला जातो.
बाटलीचे काही फायदे नक्कीच मानले पाहिजेत उदा. बाळाला आरामशीर पडून (आईजवळ किंवा वेगळं इतर कोणाजवळही) चोखण्याचं समाधान मिळून, दूध मिळतं त्याचबरोबर बाटलीची स्वच्छता हे सर्वात मोठे अवघड, वेळखाऊ, श्रमाचं, खर्चिक काम आहे. ते करावंच लागतं.
बाटलीची निवड
दूध पाजण्याची बाटली शक्यतो काचेची, मोठया तोंडाची, बाहेरच्या बाजूने मापाच्या खुणा असलेली, स्वच्छ करायला सोपी आणि स्वच्छ होऊ शकणाऱ्या चांगल्या दर्जाचं निपल असलेली आणि बुचा साठी वरून झाकण असलेली असावी. प्लॅस्टिकच्या बाटल्यांना आतून चरे पडतात. त्यात बसणारी घाण साफ होऊ शकत नाही, म्हणून प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरू नयेत. दुधासाठी, पाण्यासाठी वेगळ्या बाटल्या असाव्यात. त्या निर्जंतुक असाव्यात. दरवेळी झाकून ठेवाव्यात, उरलेलं उष्टं दूध परत वापरायचं नाही अशा त्यांच्या अटी असतात. कुठं बाहेर जातांना बाटली न्यावी लागत असेल तर ती झाकून वेगळ्या पिशवीत ठेवावी. शी आणि शू ची दुपटी वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठेवून त्या दुधाच्या बाटलीपासून दूर, शक्यतो दुसऱ्या पिशवीतच ठेवाव्यात. बदललेल्या शी शू च्या दुपट्यांना, पिशवीत ठेवतांना हाताला असंख्य जंतू लागले असतात ते विसरू नये. यासाठी हात धुऊन मगच बाटलीला हात लावणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळायला लागतात.
बाटली स्वच्छ करणं: म्हणजे खालीलप्रमाणं सर्व करणं असा संकेत आहे.
बाटली प्रथम गार पाण्यानं स्वच्छ धुवावी. साबणानं बुचं, झाकणं, टोप्या इ. भाग स्वच्छ धुऊन त्या उकाळायला ठेवाव्यात.
उकळतांना मोठया पातेल्यात एका वेळी २-३ बाटल्या असतील तर सर्व बाटल्या बुडतील इतकं पाणी घ्यावं. पाण्याला उकळी आल्यानंतर १० मिनिटं त्या उकळल्या गेल्या पाहिजेत. शेवटची ३ मिनिटं बाळाच्या तोंडात जाणारा असेल त्याला अजिबात हात न लावता इतर भागांची जुळवाजुळव करून बाटली तयार करून झाकून ठेवावी. मग त्यात निर्जंतूक केलेलं तयार दूध ओतून बाळाला पाजावं. एकावेळी संपलं नाही तर परत ते दूध उकळल्याशिवाय वापरू नये.
वापरून झालेली बाटली प्रथम गार पाण्यानं विसळून नंतर गरम पाण्यानं साबणानं धुवावी. बुचाच्या छिद्रात, कडेला साय किंवा साका चिकटला असला तर तो स्वच्छ करावा. छिद्र बुजलं नाही ना हे तपासावं अन् मग परत उकळण्यासाठी ठेवावं. अशाप्रकारे दरवेळा इतका वेळ देणं शक्य नसेल तर हे काम बऱ्याच बाटल्या एकावेळी उकळून ठेवून करता येतं. पण दोन्ही प्रकारात बराच वेळ, श्रम, इंधन खर्च येतो. याला फाटा देणे तर त्याहूनही महागात पडतं. म्हणूनच शक्यतो या वाटेला जावंच लागू नये यासाठी अंगावरचंच दूध द्यावं, हे सर्वात चांगलं नाही कां? बाटलीनं दूध पाजतांना देखील कोणीतरी, शक्यतो आईनं, बाळाजवळ असावं, त्याच्याशी बोलत त्याच्या कडे पहात, स्पर्श करीत त्याला बाटलीनं पाजलं तर त्याला आईच्या जवळीकीचे फायदे मिळत रहातात. आणि ते बाटलीलाच ‘आई’ मानत नाही.
याउलट एकटचं ठेवून त्याला आता हातात बाटली धरता येते म्हणून किंवा कामाच्या व्यापामुळं त्याच्या जवळ कोणीच नसलं तर, एकटेपणानं बाळाची पिण्याकडं तंद्री लागून त्याला याचं ‘व्यसन’ लागण्याची शक्यता असते. अशी मुलं दूध संपलं तरी बूच. चोखत पडून रहातात. हेच त्यांचं व्यसन लागल्याचं लक्षण असतं. नंतर नंतर त्यांना एकटं वाटू लागलं की दूध प्यायची तल्लफ येऊ लागते, आणि हे व्यसन पक्क होतं हे टाळायचा जरूर प्रयत्न करावा. बाटलीनं दूध देतांना बुचातून दूध फार सावकाश किंवा भसाभस धारेनं येत नाही ना, हे पाहिलं पाहिजे. दूध सावकाश येत असेल तर चोखण्यासाठी बाळाची जास्त शक्ती व वेळ खर्च होतो अन् ते दमतं. जास्त जोरात येत असलं तर ठसका लागतो किंवा नंतर उलटी होऊ शकते.
बाटलीनं बाळाला पाजताना त्याच्या तोंडात हवा जात नाही ना, हे पहावं लागतं. जसं जसं दूध पिऊन कमी होऊल तसंतसं बाटली वाकडी करून बूच दुधानं भरलेलं राहील असं पाहिलं पाहिजे. बाटली आडवी धरून पीत राहिलेलं मूल दुधाबरोबर हवाही गिळतं आणि नीट ढेकर आला नाही तर उलटी, पोटदुखी, अर्धपोटी रहाणं अशा गोष्टी होत रहातात. बाटली उलटी केल्यास थेंब भराभर पण मोजता येत नाहीत अश वेगानं पडले पाहिजेत. छिद्रातून दूध येत नसलं तर हातानं पिळून अडकलेली साय काढण्यापेक्षा आधीच दूध गाळून ती तशी अडकणार नाही हे पाहिलं पाहिजे. बाटलीनं दूध पाजतांना स्तनपानाच्या वेळी ज्या ज्या गोष्टी करू नयेत असं सांगितलं त्या त्या इथंही करू नयेत. मूल रडतंय म्हणून बाटली देणं, झोपवण्यासाठी बाटलीनं पाजणं किंवा चोखणी देणं इ. यामुळं बाळाला या बाटलीचं ‘व्यसन’ लागतं. ते या बाटलीवर मानसिक आधार, जवळीक आणि झोप लागणं यासाठी अवलंबून राहू लागतं. पुढे पुढे मनातली आईची जागा ही बाटलीच घेते आणि मग मी तोडताना तर आई आणि बाळ या दोघांनाही खूप त्रास होतो. म्हणून अशा तऱ्हेचे प्रसंग भविष्यात येऊ नयेत यासाठी असे परस्पर संबंध कसं निर्माणच होणार नाहीत याकडं लक्ष दिलं पाहिजे.
काही मुलांना जात्याच अशा जवळीकीची जास्त जरूरी असते आणि ती मिळाल्यास ते पटकन त्यावर अवलंबून राहू लागतात. हे असं व्हायला लागलयं, मूल बाटलीला चिकटलंय हे वेळीच लक्षात न आल्यास नंतर ते तोडणं अवघड होतं. या मुलांना वेळीच कपानं, भांडयानं प्यायला शिकवलं तर हे प्रसंग येत नाहीत.
६ महिन्यानंतर भांडयानं, कपानं पाजायला हवं. जास्त काळ व चुकीच्या पध्दतीनं बाटलीनं दुध प्याल्याने दात किडणं, पुढे येणं, व्यसन लागणं, बध्दकोष्ठता हे दुष्परिणाम मागेच सांगितले आहेत. ते सर्व टाळता येतील, जर बाटली हे फक्त भुकेसाठीचं दुध पाजण्याचं एक साधन म्हणून वापरलं तर!
बाटली सोडवणं
बाटलीचं व्यसन लागू नये हे खरंच, पण असं झालंच तर ते सोडवण्याचा एकच उपाय रहातो. तो म्हणजे ती एकदमच सोडवणं. यासाठी आई वडिलांचा मनाचा निश्चय फार महत्वाचा असतो. मूल मोठ झाल्यानं वेगवेगळ्या प्रकारानं त्याचा राग, गरजा व्यक्त करू शकतं. काही मुलं आपण जे करणार, ते त्याचा विरोध पत्करूनही करायलाच हवं नां ? यासाठी मुलाची बाटली सोडवून आपण त्याचं ‘दुध तोडतोय’ अशी पालकांच्या मनातील अपराधाची भावना दुर झाली पाहिजे.
मुल जसजसं मोठं होतं तसतसं त्याची दुध पचवायची शक्ती कमी कमी होत जाते. दुसऱ्या वर्षी त्याचा वाढीचा वेग मंदावल्यामुळं त्याची आहाराची गरजच खूप कमी झालेली असते. आहारातले इतर पदार्थही मूल म्हणावे इतके घेत नसतं. अशा वेळी मूल दूध तरी पितंय ना, मग ते कशाला तोडायचं, असं वाटून ते बाटालीनं देणंच चालू रहातं. इथं मुलाला दुधाची गरज नसुन बाटलीची आहे, त्यावर ते अवलंबून राहू लागलंय, हे समजावून घेण्याची गरज आहे. अन्नाची जी थोडी गरज असते ती या दुधातून सहजपणे भागते. आणि न चावता नुसतं गिळून आवडीच्या पदर्थानं भागत असेल तर चावून खायचा आहार कशाला घेईल ? न चावून खाण्याचा त्याचा आळस अशा तऱ्हेने वाढीला लागतो आणि बाटली सुटंतच नाही. इतर कोणतेही पदार्थ खात नाही मग दूधही नाही घेतले तर कसे होईल, अशा काळजीनं पालकही फारसा आक्षेप घेत नाहीत आणि हे वेळीच बंद होत नाही.
घरातल्या मंडळींचे बाटली सोडवण्याच्या प्रश्नावर मतभेद असतील तर ते काम आणखीनच बिकट होतं. एखाद्याने बाटली द्यायची नाही असं ठरवून काही फायदा होत नाही. तो संपूर्ण कुटंबाचा निर्णय अणि निश्चय असावा लागतो. आपल्या कुवतीनं हा प्रश्न वेळीच सुटत नाही, असं लक्षात येताच डॉक्टरांना विचारून त्यांच्या मदतीनं हा प्रश्न सोडवावा.
पण खरं तर मुळांत बाटलीच्या वाटेलाच न गेलेलं बरं!