बाळाच्या वाढीचे टप्पे
सदृढ हसतं खेळतं बाळ वाढताना पाहाण्यात, त्याचं निरीक्षण करण्यात एक वेगळांच आनंद मिळतो. हे पहातांना जीवनिर्मिती आणि त्याचा आपोआप घडणारा विकास पाहून निसर्गाची कमाल वाटत रहाते. कित्येक गोष्टी शास्त्राला समजत गेल्यात पण तरीसुध्दा अद्याप कित्येक गोष्टी अशा आहेत की त्यांची उत्तरं सापडलेली नाहीत. शेवटी सर्व गोष्टी निसर्गच करतो असं उत्तर येत आणि आपलं शास्त्र किती अपुर्या ज्ञानावर उभं आहे ते लक्षात येतं.
समज, जाण, आकलन शक्ती, आणि वाढत्या, हालचालीं याकडं शास्त्र समजून किंवा शास्त्रात न डोकावता पाहिलं तरी आनंदच मिळतो. मुलांची शारीरिक आणि मानसिक स्थिती नेहमीच प्रगतीच्या वाटेवर असल्याने परत मार्ग वळून त्याचा आनंद घेता येत नाही म्हणुन वेळेलाच त्या त्या गंमतीचा आनंद लुटावा. शक्य तर या आठवणी जपाव्यात (लिखाण, फोटो, फिल्म इ. रूपांनी)
मुलांची शरीरिक वाढ:
शारीरिक वाढीचा वेग पहिल्या ३ महिन्यात जेवढा असतो. तेवढा पुन्हा कधीही नसतो. बाळ जन्मत: जितक्या वजनाचं असतं त्याच्या दुप्पट ४ महिन्यात होतं. साधारणपने पहिले १० दिवस प्रथम वाढत १००-११० दिवसात मूल जन्मवजनाच्या १०० टक्के वाढतं. म्हणजेच दुप्पट होतं. अशाच प्रकारची वाढ आईच्या पोटात असतांना शेवटच्या काही दिवसात होते. त्यामुळं वाढ चांगली होत असलेली जी मुलं अपुरे दिवस भरून जन्माला येतात, त्यांची नीट काळजी घेतली तर झपाटयानं वाढतांना दिसतात.
मुलाचं जन्मत:चं वजन, त्याची पोटात झालेली वाढ आणि त्याच्या आई वडिलांची शारीरिक ठेवण, आहार व आजारपण यावर मुलाची भविष्यातली वजन उंचीची वाढ ठरत असते. पोटातच ज्या बाळाची वाढ सुरूवातीपासूनच खुरटाली आहे, आणि ज्यांचे पालक, आणि घराण्यातच सर्वजण छोटया चणीचे आहेत अशांची वाढ जन्मानंतर झपाटयान होत नाही. यासाठी फारसे उपायही नसतात. याउलट आई-वडील चांगले धिप्पाड असतील अणि बाळाची पोटात वाढ झाली असेल तर ते बाळ झपाटयान वाढतं आणि त्याच्याच वयाच्या छोटया बाळाशी तुलना केल्यास खूपच मोठ वाटतं. सहाजिकच छोटया मुलाच्या पालकांना आपलंही मूल असंच व्हावसं वाटतं. त्यासाठी खर्चिक उपाय योजायलाही ते तयार होतात. पण मुळातच त्यांनी ठेवणच लहान असल्यानं या उपायांचा फायदा होत नाही हे लक्षात घेऊन अशा प्रयत्नात पैसे आणि वेळ वाया घालवू नयेत.
४ महिन्यानंतर वाढीचा वेग थोडासा कमी होतो पण तरी बराच चांगला रहातो. आणखी ३ महिने तरी. या काळात बाळ चांगलंच बाळसेदार दिसू लागतं. खरं तर ही फक्त आईच्या दुधाचीच किमया असते. बाकीच्या गोष्टींमुळं बाळाचं वजन वाढत नसतं. पण यावेळी ज्या ज्या इतर गोष्टी बाळाला दिल्या जातात उदा. टॉनिकचे, व्हिटॅमिनचे थेंब, गुटया किंवा आणखी काही उपाय, उदा. मसाज, तेल लावणं, इ. यांना बाळाला बाळसं आणण्याचं श्रेय मिळतं आणि अंगावरच्या दुधाला श्रेय द्यायचं सर्वचजण विसरतात.
अंगावरच दूध ज्या मुलाला भरपूर मिळतंय अशा मुलाचं वजन वाढल्याशिवाय रहाणारच नाही अन् दुधाशिवाय नुसते हे पदार्थ कधीच वजन वाढवणार नाही. हे ध्यानात घ्यावं. डोक्याचा आकार त्यातल्या मेंदूची वाढच दर्शवतो म्हणून त्याच्या वाढीकडं लक्ष ठेवायला हवं. जन्मतः बाळाच्या शरीराच्या आकाराच्या मानानं त्याचं डोकं खूप मोठं असतं. नंतर हळू हळू बाकीचं शरीरही वाढत जाऊन मोठेपणी डोकं शरीराच्या आकाराच्या १:८ या प्रमाणात रहातं.
बाळाच्या मेंदूची वाढ मोठेपणच्या मेंदूच्या तुलनेत ७५ टक्के जन्मतःच पूर्ण झालेली असते. राहिलेल्या २५ टक्क्यांपैकी ७५ ट्क्के पहिल्या काही महिन्यात तर उरलेली पुढच्या एक दोन वर्षात होत असते. मूल दोन वर्षाचं होईतो जवळ जवळ संपूर्ण वाढ होत आलेली असते. तर ५ व्या वर्षी मेंदू आकारानं आणि त्याच्या कार्यक्षमतेनं पूर्ण वाढलेला असतो. म्हणजेच वयाची पहिली ५ वर्ष मेंदूच्या कार्याच्या आणि वाढीच्या दृष्टीन फारच महत्वाची धरायला हवीत. याकाळात मेंदूला कोणत्याही प्रकारची गंभीर इजा झाल्यास त्याचे परिणाम फार दूरगामी आणि कायमस्वरूपी होतात. या वाढत्या मेंदूच्या कार्याचं प्रतिबिंब बाळाच्या हालचाली, नवनवीन कौशल्य, समज बोलणं यातून दिसत असतं. या गोष्टी ठरवलेल्या योग्य वेळी होतांना दिसल्या म्हणजेच मेंदूची वाढ आणि विकास योग्य तऱ्हेने होत असल्याचा आणि शरीर त्याला साथ देत असल्याची खात्री होते. म्हणूनच वेळोवेळी बाळ, वाढ आणि विकासाचे टप्पे योग्य तऱ्हेने पार करतंय ना हे पाहिलं जातं.
पहिल्या वर्षभरात दर महिन्याला बाळाची वाढ अन् विकास नीट होत आहे ना हे पहावं. नंतर दर ३ महिन्यांनी अन् २ वर्षानंतर दर ६ महिन्यांनी त्यादृष्टीनं पहावं. दुसऱ्या वर्षानंतर मूल दर वर्षी साधारणपणे दीड ते दोन किलो वजनान तर ६ ते ८ सेमी. उंचीनं वाढतं. याप्रमाणं वयात येण्याच्या जोरदार वाढीच्या टप्प्यांपर्यंत असचं वाढतं. बाळाच्या अशा नैसर्गिक वाढीबद्दल काही माहिती समजावून घेण्यासारखी आहे. जरी वाढ आणि विकास यांचे वयानुसार काही अंदाज दिलेले असतात तरी तसेच ते सर्व मुलांमध्ये त्याच वयाला दिसतील असं नाही.
‘वरचं खाणं’: घन आहार - बाळाच्या वाढीचे टप्पे
- Details
- Hits: 30956
15
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
