Print
Hits: 10631

नवी बाळगुटी : पालकांसाठी!
लेखिका : डॉ. ज्योस्ना पडळकर
एम्‌. डी. (बालरोग),
पुणे, पडळकर मुलांचे हॉस्पिटल
नळस्टॉप चौक, कर्वे रोड, पुणे ४११००४

Family कुटुंब

पालक लहान मुलांना डॉक्टरांकडे आणतात ते त्यांच्या तब्येतीच्या किंवा वागणुकीच्या लहान मोठया तक्रारींसाठी. कधी कधी अगदी क्षुल्लक लहानशा गोष्टींच्या मागे लागून अनेक अनावश्यक तपासण्या, उपाय, खर्च केले जातात. तर कधी कधी महत्वाच्या गोष्टींकडेंसुध्दा अगदी सहजच दुर्लक्ष झाल्यामुळे उपचार उशीरपर्यंत लांबणीवर पडतात. अनेक गोष्टी पालकांना नीट समजावून देण्याची फार जरूरी आहे. त्यांचा या गोष्टीकडं पहाण्याचा दृष्टिकोनही वेळीच बदलण्याची जरूरी आहे. त्या समजल्यामुळं त्यांच्या मनातल्या शंका, काळज्या, गैरसमज दूर होतील त्याबरोबरच घरातले मतभेदही मिटून बाळाच्या संगोपनाला एक मोकळी मोठी कक्षा मिळेल. सर्वांनाच त्यामुळं निखळ आनंद मिळू शकेल.

गैरसमज दूर करायच्या असतील तर त्यामागचं शास्त्र समजावून सांगण्याची गरज असते. अशा पध्दतीन शंकानिरसन झालं की ती व्यक्ती आणखी अनेकांच्या मनातल्या शंकांचं नीट निरसन करू शकते, म्हणून या साईटवर जरा जास्त खोलवर जाऊन तरीही क्लिष्टता टाळण्याचा प्रयत्‍न करून, शक्य तितकी माहिती पुरवली आहे.

ज्या ज्या गोष्टी पालकांना खरोखरीच माहिती असाव्यात असं वाटतं त्या त्या सर्व इथं सांगितल्या आहेत. काही गोष्टी आपल्या बाळाच्या संदर्भात त्या वेळी लागू नसतीलही, पण मिळालेल्या या माहितीमुळं आपण इतर कोणाला तरी सहजच खरी आणि शास्त्रीय उपयोगी माहिती पुरवू शकाल.

या माहितीमुळं आपल्याला आपल्या बाळाच्या अनेक तक्रारींची उत्तरं आपोआपच मिळतील आणि त्यावरचे उपाय समजतील. रात्री अपरात्री किरकोळ कारणासाठी डॉक्टरांकडे जाणं वाचेल. सर्वात महत्वाचं म्हणजे बाळाला होणारा त्रास किरकोळ की गंभीर हा मूलभूत प्रश्न सुटायला मदत होईल.

मुलं चांगली निपजण्यासाठी पालकांनी स्वतःवर अनेक बंधनं घालून घ्यावी लागतात आणि सातत्यांनं मुलांसमोर स्वतःहून आदर्श वागणूक ठेवत राहावं लागतं. एक दोन दिवस नव्हे, तर सतत आयुष्यभर.......

चांगलं पालक होणं सोपं नाही!