Print
Hits: 14882

बाळ ५-६ महिन्याचं झालं की, त्याच्या हिरड्या टणक व्हायला लागतात आणि लाळही येऊ लागते. हीच दात येण्याची सुरवात. या वयापासून ते दीड वर्षापर्यंत कधीही दात येऊ लागतात.

दात येणं म्हणजे दात येण्याचं वय, त्याचा अनुक्रम, त्यांच रंग-रूप, टणकपणा इत्यादी सर्व गोष्टी अनुवंशिक असतात. काही कुटुंबात उशिरा दात येण्याची ठेवण असते तर काहींमध्ये लवकर. म्हणून दात लवकर किंवा उशिरा येण्याबद्दल काळजी करण्यापेक्षा, मागच्या पिढ्यांमध्ये दात कधी आले होते असं पाहिलं तर लगेच याचं उत्तर मिळतं.

काही मुलांमध्ये म्हणजे २००० मुलांत एकाला जन्मत:च दात असतात. या दातांबद्दल खूप समज-गैरसमज आढळतात. पण शास्त्रीय दृष्टीनं पाहिलं तर, यातील निम्म्या वेळा हे दात ‘जादा’ आलेले असतात. म्हणजे, यानंतर खरे दुधाचे दात येणार असतात. पण निम्म्यावेळा, हेच दुधाचे दात असतात अन्‌ फारच लवकर आलेले असतात. अशा वेळी कधी कधी दातांमुळे आईला आणि बाळाला त्रास मात्र होतो. हे दात नीटसे घट्‌ट बसलेले नसतात. आणि सैल, हलणाऱ्या, धारधार दातांमुळे आईच्या स्तनांना बाळानं पितांना इजा होते.

दातही हलून आणखी सैल होऊन त्याच्या मुळातून रक्त येतं किंवा तो सहजच निसटून बाळाच्या घशात अडकू शकतो. म्हणून असे दात जर सैल असतील तर डॉक्टरांकडून काढून टाकलेले चांगले, पण जर दात घट्‌ट असतील तर काढू नयेत. एक्सरे काढल्यास हे दात ‘जादा आहेत की नाहीत या बदल नक्की माहिते मिळते.

दात येणं
दात येतांना खरं तर काही फारसं वेगळं घडत नसतं. दुखणं, ताप येणं, जुलाब, इ. गोष्टी त्यामुळं होतात असेही गैरसमज आहेत. जुलाबांच्या वेळी मुलाला दात येत आहेत त्याला काहीच महत्व नाही. दात येताहेत म्हणून या जुलाबसाठी उपचार करायचे नाहीत हे चूक आहे आणि या जुलाबांसाठी काही विशिष्ट उपचार करायाचे असतात हे ही चूक आहे. थोडक्यात या दोन्हीचा काही संबंध जोडू नये हे बरं!

सर्वसाधारणपणे मुलांपेक्षा मुलींचे दात लवकर येतात आणि खालचे दात वरच्या दातांच्या आधी येतात. पण या क्रमात मागे पुढं होऊ शकतं. त्याला फारसं महत्व नाही. दाताचा रंग आणि ठेवण अनुवंशिक असते. ६ व्या वर्षी सर्वांत मागे एक दाढ येते ती कायमच्या दातांपैकी असते. म्हणून तिच्या आरोग्याकडं फार लक्ष द्यायला हवं.

तसंच तिच्या मागं बाराव्या वर्षी आणखी एक आणि नंतर तिच्याही मागं अठराव्या वर्षी अक्कलदाढ येते, आणि दात येणं पूर्ण होतं. मधल्या काळात दुधाचे दात पडणं आणि नवे कायमचे दात येणं चालूच रहातं.

दात किडणं
बाळाच्या दातांची काळजी दात तोंडात दिसू लागल्यापासूनच घ्यायची असते. बाळाला दूध पाजत निजू देणं, तोंडात बाटली ठेवून निजवणं, अशा सवयींमुळे दात किडायला सुरूवात होते.

दात प्रत्यक्ष किडतो त्या आधी कितीतरी दिवस त्याची नीट देखाभाल केलेली नसते, आणि नंतर लक्षात येतं तेव्हा फार उशीर झालेला असतो.

अगदी लहान मुलांचे दात फडक्यानं पुसून स्वच्छ करावेत. तीन वर्षावरच्या मुलांना दात घासायला ब्रश, पेस्ट वगैरे द्यावं. पण, त्यांनी साफ केलेल्या दातांकडं सोईस्कर दुर्लक्ष करू नये. इतर कोणताही दात असलेला प्राणी साखर खात नाही. त्यामुळं त्यांचे दात किडतही नाहीत. दातांची कीड रोखण्यासाठी फ्ल्युराईड असलेल्या टूथपेस्टचा फायदा होतो. त्या अवश्य वापराव्यात.

दातांच्या नेहमी उपचारांविषयी
दात भरणं (filling)- या उपचारात कीड यंत्रानं साफ करून टाकतात आणि त्यात सिमेंट किंवा चांदी भरतात. अशामुळं दात काढून टाकणं वाचतं आणि कीडही निघते.

रूट कॅनाल -दाताच्या मुळापर्यंत कीड गेली असल्यास दात निकामी होतोच पण औषधांनीही दुखणं कमी होत नाही. जबडयाखाली गाठ येते. गळू होते. अशावेळी दात मुळापर्यंत पोकळ करून कीडविरोधी औषधांनी भरतात. दात जागेवर ठेवणं महत्वाचं असल्यानं दुधाच्या दातासाठीही हे करावं लागतं.

दात वेडेवाकडे येणं, उशिरा पडणं, यावर उपाय:
नवीन येणारे दात आकारानं मोठे असल्यानं त्यांना जागा जास्त लागते. ही जागा दुधाच्या दातात फटी पडून तयार होत असते. तशी जागा जर जबडयाच्या हाडाची वाढ नीट झाली नाही तर नव्या दातांना मिळत नाही, परिणामी दात वेडेवाकडे येऊ लागतात.

अंगठा किंवा बोटं चोखल्यानं किंवा चोखणी चोखल्यानं, समोराचे दात पुढं येतात. चेहरा बेढब दिसू लागतो. हे टाळता येण्यासारखं असतं. ह्यासाठी मुलांना बाटली किंवा चोखणी चोखवत बसवू नये. जसंजसं मूल मोठं होतं तसतसं चेहऱ्यात बदल होत जातात. चेहऱ्याचा गोलावा जाऊन तो उभट होतो. तसंच जबडाही आडवा वाढून दातांसाठी जागा निर्माण होते. जबड्याची व दातांची वाढ पूर्ण होत असतांना बरेचसे बदल होऊन दातांची कायमची ठेवन ठरत असते. अशा वेळी दात बरोबर जागी नसतील तर डॉक्टरांकडून त्यांची जागा नीट करून देता येते.

वेळेवर केलेल्या ट्रीटमेंट मुळं चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढतंच पण दातातंच आरोग्यही सुधारतं. त्यामुळं दातांचं आयुष्य वाढतं. दात चांगले असणं हे व्यक्तिमत्वाच्य विकासात खूपच महत्वाचं असतं. वाकडया, वाईट दातांमुळं मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो.

दातांच्या इजा
मुलं पुष्कळदा तोंडावर पडतात आणि दातांना इजा होते. यात दात वाकडा होणं, हिरडीत घुसणं, दात पडणं , मोडून तुकडा पडणं इ. गोष्टी, यापैकी, दात वाकडा होणं यासाठी लगेचच तो सरळ करून जागेवर बसवावा लागतो. दात वाकडा झाला तर त्याचा रक्त पुरवठा कमी होतो म्हणून तो नंतर काळसर होतो. दात जागेवर दिसला नाही तर तो हिरडीत घुसला असण्याची शक्यता असते. ते एक्सरे काढून समजतं.

कायमच्या दाताला इजा झाल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावं. तसंच यापैकी एखादा दात पडला तर लगेचच स्वच्छ डबीत दुधात किंवा लाळेत घालून तासाभरात डॉक्टरांकडे न्यावा. तो लगेच परत बसवता येतो.