Print
Hits: 10266

१. बाळाची छाती पिळून दूध काढणं
आईच्या शरीरातल्या हॉर्मोन्समुळं बाळाची छाती (स्तन) मोठी होत असते. पिळल्यास दूधही येतं पण ते काढायची, पिळायची जरूर नसते. ती आपोआप कमी होते. पण अशा पिळण्यामुळं छाती दुखावून त्यात गळवं होऊ शकतात. अशी गळवं मुलीच्या छातीला झाली तर पुढं तिच्या स्तनाचा काही भाग दूध येण्यासाठी कायमचा निकामी होतो.

२. तेल लावून मालिश करणं
बाळाला थोडासा, सोसवेल इतका, हलकेच मसाज केला तर चांगलाच, पण सर्व जोर लावून पैलवानांना रगडतात तसं रगडून बाळाला रडत ठेवणं योग्य नाही. (काही मुलांची हाडं चोळताना मोडल्याचं पाहिलं आहे) तसेच, आंघोळी आधी तेल लावलं तर ते डाळीचं पीठ वगैरे लावून धुऊन टाकण्यात वाया जातं. त्यापेक्षा आंघोळी नंतर थोडसं तेल अंगाला लावलं तर तेल कमीही लागेल आणि आंघोळ घालतानाचा संभाव्य धोका टाळता येईल (बाळाला तेल लावल्यानं बाळ तेलकट, निसरडं होतं, हातातून निसटू शकते)

३. बेंबी सुकली नसताना त्यावर तेल घालणं
तेल लावल्यानं बेंबी सुकणं लांबतं. सहाजिकच नाळ, पडंणही लांबतं. ओल्या नाळेवर जंतू बसून पू होतो. त्यातले जंतू बेंबीतून शरीरात पोचतात आणि सर्वत्र पसरतात. त्यानें बाळ आजारीही पडू शकतं. कधी कधी असा पू होण्याने शरीरावर होणारे परिणाम मोठेपणीही भोगावे लागतात. यासाठी, बेंबी स्वच्छ कोरडी ठेवायला हवी. तरीही ओली रहात असल्यास डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

४. (खराब हातानं) डोळ्यात काजळ घालणं
बहुतेकदा बाळाला न्हाऊ घालायला ठेवलेल्या स्त्रिया इतर वेळा धुण्या-भांडयाची कामं करतात. त्यामुळं हाताला भरपूर भेगा असतात. यात अनेक प्रकारचे जंतू असतात. ते बाळाच्या डोळ्यात जाऊन डोळे खराब होतात. यातून डोळ्यात पू होऊन डोळे गेल्याची उदाहरणं आहेत

बाळाची आंघोळ आईनं गोड हक्‍क समजून स्वतःकडे घ्यावी आणि हाताखाली कोणाला तरी मदतीला घेऊन ते काम करावं. बाळाला पायावर पालथं उलथं घेऊन, कढत पाण्यानं, चोळत आंघोळ घालणं आणि हातपाय ताणून, दाबून लांब करणं आणि ‘रडू दे’ रडल्यानं व्यायाम होतो, असं म्हणत त्याच्या रडण्याकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही. त्यापेक्षा टेबलावर टब ठेवून कोणाच्या तरी मदतीनं बाळाला आरामशीरपणे स्वच्छ केलं पाहिजे. आंघोळ घालतानाचं पाणी मध्यम कोमट असावं, हे कोपर बुडवून पहावं. (बायकांच्या हाताला स्वयंपाकाचे चटके सहन करायची सवय झालेली असते म्हणून बोटं बुडवून पाहिल्यास खूप गरम पाणी कमी गरम वाटण्याची शक्यता असते)

आंघोळीनंतर लागणाऱ्या वस्तू म्हणजे कपडे, टॉवेल इ. आधीच गोळा केलेल्या असाव्यात. आंघोळीच्या वेळी नाक, डोळे, गळा, वळया, काखा, जांघा, शी शू च्या जागा स्वच्छ करण्याकडे कल असावा. आंघोळ घालताना विशिष्ट साबनानंच आंघोळ घालावी असं नाही. पण नाजूक त्वचेसाठी ग्लिसरीन साबण नेहमीच्या बेबी सोपपेक्षा सुध्दा चांगले असतात ते वापरावेत. आंघोळीनंतर बाळाला स्वच्छ, कोरडं करून, हवीत ती सौंदर्यप्रसाधनं (बाहेरच्या बाहेर) लावावीत.