करमणूक
आजारी मूल आईला सोडत नाही हे जरी खरं असलं तरी तीच त्याची करमणूक होऊ शकत नाही. तर आईनं त्याला जमेल, आवडेल असे खेळ खेळणं, गोष्टी, गप्पा, गाणी, मोठ्या मुलांसाठी टीव्ही इ. करमणुकीचे खेळ केले पाहिजेत.
यामुळं दोघांचाही अवघड वेळ चांगला जातो. मानसिक ताण कमी होतो. खेळत्या मुलाला घ्यायला सर्वजण असतात. पण आजारी मुलाला मात्र आईच हवी असते आणि इतरांचा फारसा प्रत्यक्ष उपयोग नसतो.
अर्थात् आईला हवी असलेली मदत ते सर्वजण नक्कीच देऊ शकतीत. घरातल्या इतरांची मोठी जबाबदारी म्हणजे आईला मुलासाठी मोकळं ठेवणं. तिची इतर कामं करणं म्हणजेच मुलाला मदत केल्यासारखं आहे. घरात एक मूल आजरी असलं की काम खूप पडतं. त्यासाठी मनुष्यबळाची जरूरी असते, ती मिळावी इतकीच आईची अपेक्षा असते. त्यास सहभागी झाल्यानं पुष्कळसे प्रश्न सुटतात.
आजकाल नोकऱ्या करणाऱ्या आयांना मुलांच्या आजारासाठी वेगळ्या रजा मिळत नाहीत. पण याच काळात मुलाला आईची फारच जरूरी असल्यानं त्यासाठी प्राधान्यानं रजा घ्यावी. अगदी बिनपगारी असली तरी. मुलांच्या आजारात पालकांच्या रजेसंबंधीच्या प्रश्नांवर विचार होणं आवश्य आहे. परदेशात मुलांच्या आजारासाठी पालकांना पगारी रजा सुध्दा मिळतात. मुलं आजारी पडण्याची शक्यता आणि प्रमाण कमी असून सुध्दा या प्रश्नावर विचार होऊन त्यावरच तोडगा अंमलात आला आहे.
मुलांना आजारबद्दल काही माहिती असल्यानं आणि कोणत्याच जबाबदारीची जाणीव नसल्यानं त्यांची शारीरिक स्थिती सुधारल्या बरोबर मानसिक स्थिती लगेचच पूर्ववत् होते, आणि अगदी खूप आजारी बाळसुध्दा एखाद्या दिवसात उडया मारू लागतं. यावरूनच खरा आजार किती असतो अन् मानसिक ताण किती असतो याचं उत्तर मिळतं एकदा मूल खेळू लागलं की त्याला जबरदस्तीनं अंथरूणात ठेवता येणं शक्यच नसतं. फक्त त्याच्याशी मुद्दाम धावपळीचे खेळ खेळून त्याला प्रोत्साहन न देणं आपण करायचं असतं. तेवढं पथ्य सांभाळलं, तर मुलांना ‘विश्रांती’ ची जरूरी नसते. मुलांची झीज लवकर भरून निघत असल्यानं ते झपाटयानं ‘दुरूस्त’ होतात, आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो!
आजारी मुलाची काळजी - करमणूक
- Details
- Hits: 11287
4
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
