आजारातला बाळाचा आहार
भरपूर द्रव पदार्थ म्हणजे ग्लुकोज पाणी, लिंबू सरबत, चहा कॉफी इ. पेये, फळांचे रस, नारळ पाणी, साधं पाणी, ताक, सूप इ. काही मुलं चहा कॉफी आवडीनं घेतात पण सवय लागेल या भीतीनं पालकच द्यायला तयार नसतात. अशा वेळी कुठूनतरी द्रव पदार्थ पोटात जाणं महत्वाचं असतं. त्यामुळं सलाईन, ग्लुकोज शिरेतून देणं असे पर्याय टळू शकतात. शिवाय ही पेयं पिणं हे काही गैर नव्हे. हे ही लक्षात ठेवून त्याबद्दल बाऊ करू नये.
मऊ वरण भात, मुगाची खिचडी, साबुदाणा खीर इ. पदार्थ आवडी प्रमाणे अन् मागेल तितकेच द्यावेत. आजारात अन्न पचवण्याची क्षमता तात्पुरती मंदावत असते. त्यामुळं सक्तीनं दिलेल्या अन्नाचा फारसा उपयोग नसतो. भूक लागत असली तर मात्र हे पदार्थ भरपूर द्यावेत.
अन्न कमी खाल्ल्यानं अन् शरीराची या काळात गरज जास्त वाढलेली असल्यानं मुलाचं वजन लगेच मागे येऊ लागतं. अशा वेळी वाईट वाटणं सहाजिक आहे. पण जेव्हा मुल आजारातून बरं होऊ लागतं तेव्हा भरपूर भूक लागून ही सर्व कसर ते जास्त खाऊन, पचवून भरून काढतं. त्या काळाची वाट पहावी. कोणत्याही तथाकथित भुकेच्या औषधाशिवाय, टॉनिकशिवाय लागणारी भूकच मुलाला परत मूळपदी आणून वजन वाढण्यास मदत करते. आजारात दिलेली टॉनिकं, भुकेची औषधं यांचा काहीच उपयोग नसतो. अशा औषधांसाठी डॉक्टरांकडे आग्रह धरू नये.
स्वच्छता:
आजारी बाळाची स्वच्छता फार महत्वाची असते. बाळाला जुलाब उलटया होत असतील तर हे फारच कटाक्षानं लक्षात घ्यायला हवं. त्याचे लंगोट, दुपटी वेगळी ठेवून, स्वच्छ धुऊन, वाळवून वापरावीत. खाण्याच्या गोष्टी हाताळतांना हात स्वच्छ धुण्याचं विसरू नये.
हे कपडे, खाण्याचे पदार्थ झाकलेले ठेवावेत म्हणजे माशांपासून जंतूंचा प्रसार होणं टाळता येईल. तसंच बाळाच्या शरीराची स्वच्छताही करायला हवी. अंगात ताप असताना आंघोळ घालायची नाही हे जरी खरं असलं तरी ताप उतरल्यावर चटकन् स्वच्छतेच्या उद्देशानं छोटीशी आंघोळ घालायलाच हवी. या आंघोळीमुळं काहीच तोटा होणार नाही. उलट मूल स्वच्छ, उत्साही होऊन काळजी घेणाऱ्यांनाही बरं वाटेल.
कपडे:
बाळाला आजारात काढा घालायला सोपे, मऊ, स्वच्छ, सुती कपडे घालावेत. ताप असतांना बाळाला अंगात कमीत कमी कपडे हवेत. म्हणजे ताप उतरायला मदत होते. तापात अंगात स्वटेर्स, टोपडी इ. जादा कपडे घातल्यानं मूल उबतं आणि ताप वाढल्यानं चिडचिड होत. काही मुलांना तापात झटके येण्याची शक्यता असते हे ही लक्षात ठेवावं.
औषध देणं:
बाळाला आजारात औषधं देणं हे अगदी अवघड पण आवश्यक काम! बरेचदा आजार आपले आपणच बरे होत असतात, पण औषधं मुलाला ‘आराम’ पडण्यासाठी वापरावी लागतात. उदा. ९९ अंश फॅ. पर्यंतचा ताप उतरवण्याची जरूरी नसते. पण १०० अंश फॅ. च्या पुढे गेल्यास त्याचाच मुलास त्रास होतो म्हणून तापाची औषधं देऊन, अंग पुसून तो कमी करावा औषधं आणून देणं हे जरी बाळावरच्या तुमच्या प्रेमाचंच द्योतक असलं तरी फार औषधं देणंही बरं नाही. औषधांचे दुष्परिणाम जर परिणामांपेक्षा जाचक होणार असतील तर ती टाळलेलीच बरी. शिवाय आजार आणि दुखणी सोसण्याची सहनशक्ती थोडीसी वाढवायचाही प्रयत्न करावा. त्रास जास्त होतोय असं दिसताच औषधं जरूर देऊन बाळाला आराम द्यावा.
कोणतीही औषधं रिकाम्या पोटी द्यावी. पण जी औषधं भरल्यापोटी द्यायची असतात. ती खाण्यानंतर देण्याऐवजी औषधं देऊन लगेच खायला घालावं. अशा मुळं समजा उलटी झाली तर. फक्त औषधच वाया जातं. खाल्लेलंही परत भरवावं लागत नाही. फक्त थोड्या वेळानं औषधं परत पाजलं म्हणजे झालं. कानात, नाकात, डोळ्यात औषधाचे थेंब घालताना घ्यायची काळजी म्हणजे, थेंब टपकन पडणार नाही अशा रीतीनं घालावं डोळ्यात थेंब घालतांना नाकाच्या बाजूच्या डोळ्याच्या कडेला १-१ थेंब डोळा मिटलेला असतांना घालावा व नंतर हातानं डोळा उघडून तो डोळ्याच्या घरंगळू (ओघळू) द्यावा. त्यामुळं डोळ्यांत औषधं घालणं सोपं जातं. नाकात थेंब घालतांनाही ड्रॉपर नाकात न घालता १-१ थेंब नाकपुडीत घालुन नंतर मुलाला कुशीवर वळवावं व नाक थोडसं चोळावं. नाहीतर थेंब सरळ नाकातून घशात जातात. मुलाला कडवट चव लागून एखादेवेळी उलटीही होते अन् नाकाला थेंब न लागल्यानं चोंदलेले नाकही ठीक होत नाही. कानात औषधं घालतांना एका वेळी एकाच कानात औषध घालू शकतो हे लक्षात ठेवून त्याप्रमाणं करावं.
हे सगळं करतांना मुलाला दाबून धरून जबरदस्तीनं, कशाचे तरी भीती घालून करू नये. औषधांचा आणि त्यावेळेचा कटु अनुभव मुलं विसरत नाहीत आणि मग औषधं पाजणं आणखीच अवघड होतं तसंच रडणार्या मुलाला नाक दाबून औषधं पाजणं तर फारच धोक्याचं असतं. अशा वेळी थोडे थेंब जरी श्वासमार्गात गेले तरी ते प्राणघातक ठरू शकतात, हे लक्षात ठेवावं. तोंडानं औषधं देतांना चमचा औषधं तोंडात सोडल्यानंतर जिभेच्या टोकावर दाबून धरला तर मूल औषधं लगेच गिळून टाकतं आणि काम लवकर संपतं.
आजारी मुलाची काळजी - आजारातला बाळाचा आहार
- Details
- Hits: 11306
4
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
