प्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. किंबहूना तिने तसे असावेच. प्रत्येकीस केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवून अथवा त्याच्याबाबत विचार करून चालत नसते किंवा महाग आणि अद्ययावत सौंदर्य-प्रसाधनांचा वापरही तिने केला, की ती सुंदर दिसू लागते, असे नव्हे. त्यासाठी तिचा देहही आंतरिक आणि बाह्य पातळीवर सुंदर हवा.
देहाची सुंदरता व स्त्रीचे सु-आरोग्य या दोन्ही बाबी परस्पर-निगडीत व परस्पर पुरक असतात. सुंदर देहात तेवढाच सुंदर आत्मा वा मन वास करत असणे आवश्यक ठरते, अन्यथा स्त्री-सौंदर्यास उठाव येत नसतो. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्धन करण्यासाठी तिने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलीत आहार व नियमित व्यायाम ही द्वीसूत्री विसरू नये.
मानवी जीवन सुखी, समाधानी असेल, तर आपोआपच त्याची आभा तिच्या चेहर्यावर पडते. स्त्रीचा निंयत्रीत व पौष्टीक आहार आणि व्यायाम यांची जोडही यास हवी. निसर्गाने आपल्याला केवळ उर्जा, वातावरण, पाऊस, हवा, इ. दिले आहे, असे नाही, तर त्यात उपलब्ध असणारी वनस्पती, फळे भाजीपाला केवळ सु-आरोग्य बनविण्यास नव्हे, तर आपल्याला प्राकृतिक सौंदर्य-प्रसाधने देण्यासही जबाबदार असतात. म्हणूनच आपण आरोग्य, आहार, व्यायाम, व सौंदर्य या महत्वपूर्ण बाबींची सांगड यशस्वीपणे घालून जीवनात समाधान, स्थैर्य आणण्याचे प्रयत्न करणे. ही त्याबाबत उपयुक्त माहिती व या सर्वांचा विचारच आहे.
नैसर्गिक सौंदर्य व निसर्ग
निसर्गाजवळ नैसर्गिक सौंदर्याचे भांडार भरलेले आढळते. आपण जी कृत्रिम सौंदर्य-प्रसाधने वापरतो, त्यांच्यातील बरेच गुणधर्म यांच्यातही आढळतात. यांच्यामुळे आपल्या शरीरास केवळ सौंदर्य प्राप्त होते असे नव्हे, तर सु-आरोग्यही प्राप्त होत असते.
विशेषत: स्त्री- सौंदर्य हे तिच्या त्वचेच्या कांती आणि पोत यावर निर्भर असते. आपल्या दैनंदिन आहारातूनच स्त्रीला आपल्या सौंदर्य व आरोग्यात भर घालण्यास मदत होते. कारण आपल्या सौंदर्यवर्धनास उपकारक अशी प्रथिने, खनिजे, जीवनसत्व इ. आपल्याला स्वयंपाकघरात असणारी फळे, भाज्या, मसाले, डाळी, फूल, पाने, सुके मेवे इ. सर्वांतून या उपकारक घटकांचा मसाला भरलेला असतो आणि जर त्यांचा योग्यवेळी, योग्यप्रकारे वापर केला गेला, तर त्वचेच्या आरोग्य व सौंदर्य- वर्धनास पुष्टी मिळते. आणि मग स्त्रीला कृत्रिम प्रसाधानांची आवश्यकता भासत नाही तिचे रूधिराभिसरण योग्य प्रकारे होऊ लागते व त्यामुळे तिची कांती सुधारत जाते.
जन्मत: आपली त्वचा कोमल, मुलायम असते. परंतु वाढत्या वयात प्रथिने, नैसर्गिक तत्वे यांची जी त्रुटी तिच्यात निर्माण होत जाते, त्यामुळे त्या सौंदर्यास बाधा येत जाते, सतत फास्ट फूड, कृत्रिम प्रसाधने यांच्या नादी लागल्याने व त्यांचा वापर केल्याने शरीरांतर्गत संतुलन बिघडते आणि त्वचेतील उपजत असणारी स्निग्धता व कोमलता संपुष्टात येते.
याखेरीज चिंता, तणाव, क्रोध, निराशा, उच्च रक्तदाब यापैकी कशाचीही शिकार जर ती स्त्री असेल, तर त्याचे विपरीत परिणाम तिच्या त्वचेवर झाल्याखेरीज राहत नाहीत.
जेव्हा देह आहाराने संतुष्ट होईल, तेव्हाच प्रत्येकीस आत्मिक समाधानाचे सौंदर्य प्राप्त होईल व त्यामुळेच तिची त्वचा, डोळे, दात, नखे, केस, इ. चे सौंदर्य वाढेल.
आपला कोठा साफ राहणे महत्वाचे असते. जर कोठा साफ राहिला नाही, तर त्या स्त्रीचे शरीर-स्वास्थ्य व सौंदर्य य दोहोंवर विपरीत परिणाम होत राहतो. आपण आपला दैनंदिन आहार असा ठेवावा की, ज्याचे सहजतेने पचन करता येईल. आपल्या चेहऱ्याच्याच नव्हे, तर सर्व बाह्य त्वचेच्या सौंदर्यांत भर पडण्यासाठी व ते वाढण्यासाठी पोटात सत्वे आपल्या पोटात जातात व त्वचेस मुलायमपणा, नाजूकपणा मिळतो.
सौंदर्य व स्वच्छता यांचाही निकटचा संबंध आहे. विशेषत: तारूण्य उलटू लागलेल्या स्त्रीच्या बाबतीत तर याला आगळेच महत्व प्राप्त होत असते. त्वचा-विशेषत: चेहऱ्याची आणि हात, पाय यांची त्वचा- जर वेळच्या वेळी स्वच्छ केली गेली नाही, तर त्यामुळे अनेक त्रास उद्भवतात. उदा. प्रत्येकीने आपला चेहरा रोज स्वच्छ पाणी व साबण वापरून धुणे जरूर असते, म्हणजे यावर चढलेला मळ, तेलकटपणा निघून येतो. अन्यथा तिच्या त्वचेच्या छिद्रांत हे अडकून बसतात आणि त्वचेचे आरोग्य व पर्यायाने सौंदर्य बिघडवणाऱ्या पुटकुळ्या, तारूण्य पिटिकाही तिच्या चेहऱ्यावर येतात.
त्वचेच्या सफाई एवढेच, केसाच्या स्वच्छतेस आणि आरोग्यास देखील तेवढेच महत्व असते. केसांना वेळीच तेल लावणे, योग्य साहित्य वापरून ते धुतून स्वच्छ करणे, मान, गळा हे देखील चोळून धुणे इ. गोष्टी महत्वाच्या असतात. केस, मान, गळा इ. भाग जर स्वच्छ व आरोग्ययुक्त राहतील तर स्त्रीचे सौंदर्य देखील वाढेल. याखेरीज आपल्या झोपण्याच्या वेळा, आपण रोज किती वाजता झोपून किती वाजता उठतो, या सर्व बाबी महत्वाच्या असतात. आपले आरोग्य आणि सौंदर्य या दोहोचे जतन करण्यास त्यांचा उपयोग होतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नैसर्गिक सौंदर्य व आरोग्यवर्धन याकडे पूर्णत: दुर्लक्ष करतो. कृत्रिम साधने, प्रसाधने यांचा अधिक वापर करतो. यामुळेच आरोग्य ढासळून स्त्रीचे सौंदर्यही धोक्यात येते. म्हणूनच या सवयींचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी प्रत्येकीने पुढील काही बाबी विचारात घेऊन त्यांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक ठरते.
रोज सकाळी उठल्यावर अनुशापोटी ३-४ पेले पाणी प्यावे. एकदम न जमलास थोडे-थोडे, पण पर्याप्त प्यावे. त्यामुळे पोट, कोठा साफ राहतो, आपल्या शरीरात जमलेले विषजन्य घटक पाण्यावाटे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे त्वचाही निरोगी राहते.
रोज थोडावेळ मोकळ्या हवेत वावरणे, लांब श्वास घेऊन तो सोडणे, याला महत्व असते. त्यामुळेदेखील शरीर निरोगी राहते. चालताना काही वेळ अनवाणी चालणे जरूरी असते.
ऋतुमानानुसार थंड अथवा कोमट पाण्याने स्नान करावे. खूप कडक तापलेल्या पाण्याने त्वचेस हानी पोहोचू शकते. अंग चोळून स्नान केल्याने त्वचा टवटवीत राहते व चित्तही प्रसन्न राहते, आपले जेवण, नाश्ता, झोप इ. च्या वेळा निश्चित करा व शक्यतो त्या पाळण्याचे प्रयत्न करा.
एकाच वेळेस खूप खाऊ नये. ताजे, आरोग्यदायी पदार्थ थोडी भूक ठेवून व थोड्या थोड्या वेळाने खावेत. दोन खाण्यात निदान २-३ तासांचे अंतर ठेवावे. यामुळे आरोग्य सुधारते.
डाएटिंगमध्येच जाडी वाढविण्याचा धोकाही दडलेला असतो. असे भयही काहींना वाटत असते व ते काही प्रमाणात खरेही असते. कारण कमी झालेला आहार वाढवला, की त्यातून जाणाऱ्या कॅलरीजचे प्रमाणही वाढत जाते व या कॅलरी शरीरास तशा अनावश्यकच असतात. म्हणूनच डाएटिंग संपले तरीही नियमित व्यायामामध्ये मात्र खंड पडू देऊ नये.
यामुळे आपल्या शरीराचा मेटॅबोलिक रेट कमी न होताच आपले वजन कमी होईल व सौंदर्यही वाढेल. डाएटिंगमध्ये चालू असताना आपल्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या आवश्यक असतात का, असा संदेह काही जणींच्या मनात असतो. जर आहारांद्वारे कॅलरी नियंत्रित केल्या आणि तुमची प्रकृती, आरोग्य, संतुलित असेल, कोणत्याही पदार्थातून जीवनावश्यक प्रथिने, जीवनसत्वे इ. जात असतील, तर मग कृत्रिमरीत्या यांचा पुरवठा करणे आवश्यक ठरत नाही. उदा. दैनंदिन आहार पुढील असावा
- सुमारे अर्धाकिलो भाज्या, चार ते सहा फळे, फुलके, एक प्लेट भात, तीन पेले दूध, दही दोन अंडी, मासळी वा पुरेशी दाट अशी आमटी, छोले अथवा राजमायुक्त आहार.
- या खाद्यपदार्थात दडलेली जीवनसत्वे नष्ट होऊ नयेत म्हणून भाज्या जरूरीहून अधिक उकडू वा भाजू, परतू नयेत. जेवढे शक्य असेल, तेवढ्या प्रमाणात फळे व भाज्या ताज्या आणि सालांसह खाव्यात.
- प्रत्येक स्त्रीच्या शरीराचा मेटाबोलिक रेट हा भिन्न असतो. ज्यांच्यात हा रेट अधिक असतो. त्या स्त्रियांनी जास्त प्रमाणात आहार ठेवला, तरी त्यांचे वजन तेवढ्या जास्त प्रमाणात अजिबातच वाढत नसते.
- म्हणूनच कमी कॅलरीचे पदार्थ खावेत. दिवसाकाठी तीन वेळा नियंत्रीत, संतुलीत आणि अत्यावश्यक एवढ्याच कॅलरींचा आहार ठेवावा.