Print
Hits: 29112

कोणत्याही संस्कृतीमधे स्त्री - सौंदर्याचे पोवाडे हे केवळ त्या स्त्रीच्या सुंदर मुखवट्यावरून गायले जात नाहीत तर त्या स्त्रीच्या सु-आरोग्ययुक्त शरीरयष्ठीचा त्यात संबंध असतो.

लठ्‍ठपणा
प्रत्येकीच्या जीवनात वयाच्या २५ ते ५० या वयोवर्षाच्या दरम्यान वजनात होणारी वाढ. ही कायमची असते. एकाच वयोगटातील स्त्रियाचं शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून ठराविक प्रमाणाहून १० टक्‍के वा त्याहून वाढले, तर अशा शरीरस्थितीस लठ्‍ठपणा म्हणता येईल.

कारणे
१. अल्सर, आवड, सवय, छंद वा अशक्तता वाटणे यापैकी कोणत्याही एक वा एकाहून अधिक कारणांमुळे जर एखादी स्त्री अनावश्यक प्रमाणात आपला आहार वाढवत असेल (मुख्यत्वे करून जर त्यात अधिक प्रमाणात गोड, तळकट, तुपकट खाद्यपदार्थ असतील तर) तिचे वजन वाढतच राहते आणि तिचा लठ्‍ठपणा वाढतच जातो.

२. आनुवंशिकता हेदेखील वजन वाढण्याचे अजून एक कारण असते. काहीच्या शरीराची ठेवण अशी असते की, त्यांचे वजन थोडे जरी वाढले, तरी त्या खूप लठ्‍ठ वाटत रहातात.

३. काही वेळा एखादीच्या शरीरातील अंतःस्त्रावी ग्रंथीतील कंठस्थ वा वृक्‍कस्थ ग्रंथींसारख्या ग्रंथीच्या कार्यात बिघाड होतो व त्यामुळेच वजन वाढते.

४. स्त्रीच्या गर्भारपणात/बाळंतपणात जर नीट काळजी घेतली गेली नाही, मासिक पाळी जाण्याची वेळ आली, तरीदेखील वजन वाढते. या सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकीचा आहार किती आहे, या प्रमाणात तिचा व्यायाम हवा. तसेच जर आपला आहार योग्य नाही अथवा गरजेहून अधिक आहे असे वाटले, तर तो कमी करणे. कमी कॅलरीजचा आहार घेणे आवश्यक असते.

लठ्‍ठपणाचे तोटे
प्रत्येक लठ्‍ठ व्यक्तीस याचे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर धोके पत्करावे लागत असतात. यामुळे शारीरिक पातळीवर व्यंग निर्माण होणे, धाप लागणे वेगाने चालत, पळता न येणे, गुडघे/ सांधेदुखी, हर्निया, श्वसनात अडथळे, हृद्रोग पित्ताशयात खडे होणे यासारखे अनेक आजार होऊ शकतात.

विशिष्ट प्रकारचाच पोशाख वा पादत्राणे घालता येणे, ही मर्यादा लठ्‍ठ स्त्रियांवर पडते, त्यामुळे त्यांनाच थोडी नाराजी येऊन त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्याखेरीज अन्य व्यक्ती त्यांची टिंगल करू शकतात. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊन त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे स्त्रीची आयुर्मर्यादाही कमी होते. म्हणूनचं आहार व व्यायाम या दोहोंची जोड देऊन वजन कमी करावे.

याखेरीज ऍरोबिक्स्‌, योगसाधना, शल्यक्रिया करून शरीरातील चरबी कमी करणे, पळणे, जॉगिंग इ. व्यायाम प्रकार वापरून वजन घटविता येते. परंतु विशीष्ट वयानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अत्यंत तंत्रशुध्द पध्दतीने हे व्यायाम केले, तरच फायदा होतो, अन्यथा यापासून त्यांना अपायच होऊ शकतो.

डाएटिंग हा देखील एक उपाय अनेकजणींकडून केला जातो. पण जर क्रॅश डाएटिंग (थोड्या दिवसात खूप कमी व कमी कॅलरीजचा आहार ठेवून वजनात लक्षणीय घट करणे) केले, तर त्याचे अन्य अनिष्ट परिणामही स्त्रीच्या शरीरावर होऊन त्यापासून तिला अन्य व्याधींना तोंड देणेही अपरिहार्य ठरत असते.काही सुलभ व्यायाम
वजनाबाबत जागरूक स्त्रीने पुढील सुलभ व्यायाम-प्रकार नियमितपणे व आग्रहाने करून पहावेत म्हणजे तिला वजन नियंत्रण करणे, घटविणे जमू शकते. शरीर चुस्त होऊन त्यात तरतरी यावी यासाठी पाय ताठ करून व ते जुळवून उभे रहावे. कथ्थक नृत्यात दोन्ही हात जमिनीस आडवे व समांतर ठेवतात, तसे ठेवा. मग डावा गुडघा हातांच्या दिशेने वर उचलत न्या. उजवा पाय ताठच ठेवा मग उजवा गुडघा असाच वर उचला व डावा पाय स्थिर ठेवा. आलटून पालटून ७५ वेळा करा.

नियमितपणे दोरीवरील उड्या मारा. दर आठवड्यास एका दमात मारल्या जाणाऱ्या उड्यांची संख्या वाढवत न्या. पोट कमी व्हावे यासाठी सोपा उपाय म्हणजे बसताना, उठताना, लिहीत वा चालत असताना पोट आत ओढा. श्वासही जेवढा वेळ आत ओढता येईल, तेवढा ओढा व सोडा. नियमितपणे करा व श्वास आत ओढण्याची वेळ वाढवत न्या.

बेडूक उड्या मारण्यास बसतो, तसे बसा. तेव्हा दोन्ही पाय व हात यावर समप्रमाणात भार टाका. श्वास आत घ्या. डोके खाली घाला. नितंब आत घेऊन पाठ आत ओढा. श्वास टाका. पाठ .मोकळी, पण सपाट सोडा. चोवीस वेळा करा.

स्ट्रेच व्यायाम:
व्यायाम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. आपले शरीर सक्रिय ठेवण्याचा व त्याच्या प्रत्येक इंद्रियाचे कार्य योग्य प्रकारे चालू ठेवण्याचा मार्ग असतो. जर आपण नियमितपणे व्यायाम केला. तर केवळ शारीरिक सु-आरोग्य राहते असे नाही, तर मानसिक स्वास्थ्य, उत्साह यांचेही वर्धन होते.

प्रत्येकीने व्यायामाच्या प्रकाराची निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा. सायकलिंग, जॉगिंग, पायी चालणे इ. प्रकारचे व्यायाम अधिक करावेत. यामुळे शरीर व मन या दोहोंत स्फूर्ती राहते. भराभरा पायी चाळणे हा व्यायामाचा सर्वात सोपा व तेवढाच परिणामकारक प्रकार आहे. यामुळे कॅलरी तर खर्च होतातच. पण त्याबरोबरच रक्तदाब व हृदयाचे कार्यही नियंत्रित राहते. म्हणूनच रोज सकाळ - संध्याकाळ फिरायला जाणे आवश्यक असते. आपल्या सर्वांगात स्फूर्ती, उत्साह व तरतरी आणण्यास याचा खूपच उपयोग होतो. चिडचिडेपणा, अकारण येणारा राग यावरही नियंत्रण राहते, ताठ, भराभरा व मान सरळ व ताठ ठेवून चालावे. पायही ताठ असावेत. चालाता चालता देह पुढे झुकवू नये व गती समान ठेवावी.

खूप वेगाने व्यायाम केली की, काही वेळ कमी वेगाने व्यायाम करावा. म्हणजे कॅलरींचे ज्वलन वेगाने होते व शरीराचा मेटॅबोलिक रेटही वाढतो तसेच जर एकूण व्यायाम तीस मिनिटे करणार असाल, तर पहिली दहा मिनिटे वेग मर्यादित ठेवावा. मग तो वाढवावा व त्यानंतर एक मिनिट कमी करावा. यामुळे शरीरास योग्य प्रकारे व्यायाम होतो. जर पायी चालणे होत नसेल तर जिना चढणे-उतरणे हा व्यायाम करावा. यामुळेही शरीरास श्रम पडून चेतापेशी लवचिक व मजबूत बनतात व त्याची कार्यक्षमता वाढून वात कमी होतो.स्ट्रेच व्यायाम म्हणजेच शरीरावर तणाव आणणारा व्यायाम होय. हा प्रत्यक्षात सुरू करण्याआधी पहिली पाच मिनिटे सांधी पेशी शिथिल व ढिल्या पडतील, असा व्यायाम करावा. उदा. बैठका, ताठ उभे राहून-पुढे वाकून आंगठे पकडणे, ताठ उभे राहून एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे झुकणे इ. मग हळूहळू पाळल्यासारखे करऊन शरीर सामान्य स्थितीत आणावे. या प्रकारच्या व्यायामाचे फायदे पुढील असतात. शरीर लवचिक बनते, रक्तप्रवाह वेगाने व योग्य होतो, माथा थंड राहतो, शरीरात अधिक प्रमाणार ऊर्जा- संचय होतो व काम करण्यास शक्ती मिळते. तसेच,नाडीचे ठोके लयीत पडतात. या प्रकारच्या काही सुलभ व्यायामांची माहिती पुढे देत आहे.


उपकरणांच्या वापराचे फायदे
आधुनिक स्त्रीला जर आपले सौंदर्य टिकवून ठेवायचे व त्यात वाढ घडवून आणायची असेल, तर त्यासाठी तेवढ्याच आधुनिक उपकरणांचा आधार घेणे जरूर ठरते. आजकालच्या आधुनिक युगात स्नायुपेशीतं ढिलाई येणे, वाढते रोग, शरीरावर चढणारे चरबीचे थर या सर्व कारणांमुळे स्त्रीची जीवनशैली आणि व्यक्तिमत्व यावर विपरीत परिणाम घडत आहेत.

स्त्रीला आपल्याकडे आपला बांधा, देहसौंदर्य यांच्या कडे, त्यांच्या सुडौलतेकडे लक्ष देण्यासही फुरसद मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे अखेर तिचे शरीर बेडौल बनून तिच्या सौंदर्यास बाधा येते

यासाठीच कमीत-कमी जागेत शिस्तबध्द व परिणामकारक रीतीने शरीर-आरोग्य सुधारण्याचे प्रयत्‍न स्त्रीने करावेत व त्यासाठी आज-काल बाजारात उपलब्ध असलेली भिन्न प्रकाराची व्यायाम करण्याची उपकरणे तिला उपयोगी पडतील. व्हरांडा, बाल्कनी, बेडरूमधील रिकामी जागा या ठिकाणी सहजतेने या उपकरणांचा वापर करता येतो. ही उपकरणे सातत्यपूर्ण रीतीने वापरावीत म्हणजे त्यांचे परिणाम योग्य घडतात. मध्येच त्यांचा वापर बंद करू नये. अन्यथा वजन वाढते.

प्रत्येक उपकरण का व कसे वापरावे? यांची माहिती देणारी पुस्तिका प्रत्येक उपकरणाबरोबर आलेली असते. तिचा वापर करावा व ते नसल्यास ही माहिती विक्रेता, उत्पादक यांच्याकडे मागावी. ते पूर्ण वाचून घ्यावी व नंतरच तिचा उपयोग करावा. प्रत्येकीने जर यांचा तंत्रशुध्द वापर केला, तर नक्‍कीच तिला आपला बांधा सुडौल ठेवण्यासाठी व शरीरात उत्साह व स्फूर्ती यांचा संचार होऊ देण्यासाठी मदत मिळेल. यांच्या वापरामुळे आपल्या शरीरावर चढू लागलेले अनावश्यक चरबीचे थर कमी करणे सहज शक्य होते.

ब्युटी पार्लर अथवा हेल्थ क्लिनिकमध्ये लठ्‌ठ अनामत रक्कम भरून आपल्याला यांचा वापर करत येतो, पण घरगुती पातळीवर या उपकरणांची खरेदी करून शरीराच्या विविध भागांवरील चरबी कमी करण्याचे प्रयत्‍न नक्‍कीच यशस्वी होतील. यामध्ये आजकाल बाजारात व्हायब्रेटरी बेल्ट, बॉडी मसाजर, ब्रेस्ट डेव्हलपर, स्टँडिंग ऍंड सिटिंग ट्रिस्टर इ. प्रकारची उपकरणे समाविष्ट करता येतील.

वॉर्मिंग - अप व्यायाम
कोणत्याही प्रकारचे व्यायाम करताना त्याआधी वॉर्मिंग-अप करणे किंवा शरीराची व्यायामासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते. यामुळे स्नायुपेशींना बळकटी येते, त्यांचा नाजूकपणा कमी होतो आणि ठेचा लागणे, जखमा कमी होणे, यांचे प्रमाणही येथे कमी होते. यासाठी सायकलिंग अथवा एकाच जागी स्थिर उभे राहून मार्चिंग केल्याप्रमाणे चालणे आवश्यक असते( ३ ते ५ मिनिटे) यामुळे नंतर व्यायाम करताना जो घाम येतो, त्याचे प्रमाण कमी होते व यानंतरच उपकरणे वापरून व्यायाम करण्यास शरीर तयार होते. व त्याचा आतील भाग जमिनीस टेकवता येईल तेवढा टेकवा. यानंतर पूर्ववत्‌ स्थितीत पाय ठेवा आणि दुसऱ्या पायाने नेमका हाच व्यायाम याच क्रमाने करा.

भिंतीला पाठ टेकवून ताठ उभे रहा. दोन्ही हातही सरळ रेषेत शरीरालगत व ताठ ठेवा. पोट जेवढे आत ताणता येईल, तेवढे ताणा व श्वास ओढा. अलगद टाचा वर उंचवा ओढ लागली, की टाचा परत खाली टेका. जेव्हा जेव्हा उभे राहिले असाल अथवा बसला असाल, तेव्हा श्वास ओढून पोटाचे स्नायू आत ताणून घेण्याचे (जेवढा वेळ घेता येतील तेवढा वेळ) प्रयत्‍न करा व नंतर अलगदपणे श्वास सोडा. चालताना शरीर ताठ ठेवून चाला. शरीर ताणून घ्या. डोके, खांदे, व पोट यांच्या स्नायुपेशी मजबूत व घट्‌ट होण्यासाठी हे व्यायाम उपयुक्त ठरतात फक्त ताण बरोबर रीतीने, वेळ व ढब ठेवून देता यावा. अन्यथा परत एखादा स्नायू ताणला जाऊन आखडला जाऊन त्रास होऊ शकतो.

पोट सपाट करण्याचे व्यायाम
उंची, वय, वर्ण यांच्या सौंदर्याचा संगम जरी स्त्रीत झाला असला, तरीही तिचे बाहेर आलेले पोट, तिच्या सर्व व्यक्तिमत्वाचा व बांध्याचा, डौलदारपणाचा नूर घालवते. म्हणूनच अशा स्त्रियांनी जर रोज दिवसाकाठी थोडा वेळ काढला, तर त्यांना आपले पोट सपाट करणे व त्यावर जमलेली जादाची चरबी कमी करणे जमू शकेल. यासाठी त्यांनी पुढील काही आवश्यक बाबी विचारात घ्याव्यात.

व्यायाम कराताना हलके, ढिले, आरामदायक कपडे घालावेत. उदा. टी-शर्ट व टाइट्‌स्‌, लिओटाड्‌र्स इ. व जेथे लेटून व्यायाम करणार, तेथे सतरंजी, चादर पसरावावी.

व्यायाम करण्याआधी दोन तास काहीही खाऊ नये. व्यायाम झाल्यावर शरीर शिथिल सोडून त्याचा ताण कमी करण्याचे प्रयत्‍न करण्यास विसरू नये किंवा जमिनीवर लोळल्यासारखे करावे व तेव्हा दोन्ही हात मागे धरून खेचावेत. हे करताना मनात आठ आकडे मोजा व यानंतर हात परत ढिले सोडावेत.

आता उठून बसा व ताठ बसा, पाय परस्परांवर क्रॉस करून टाका. उजव्या हातास मुडपा व पंजा खांद्यावर ठेवा. डाव्या हातानेही करावे. मग दोन्ही हात शरीराच्या बाजूस ताठ ठेवावेत व डावा हात ताठ ठेवूनच उजव्या गुडघ्यावर ठेवावा. तेव्हा कुठेही वाकू नये. आठ आकडे मोजा. मग हात पूर्ववत्‌ घ्या शरीर शिथिल सोडा.

वॉर्म-अप्‌ व्यायाम
प्रत्यक्षात हे व्यायाम सुरू करण्याआधी हे व्यायाम - प्रकार करावेत. शरीर व स्नायूपेशींना क्रियाशील करण्यास याचा उपयोग होतो व पुढील व्यायाम करणे सोपे जाते.

प्रथम ताठ उभे रहा व पिंगा घातल्यासारखे शरीर चौफेर फिरवा. मग एक पाय जमीनवीवर व दुसरा जांघेवर ठेवा व जागीच उभे राहून दोन्ही हातांनी मार्चिंग केल्याप्रमाणे हात हलवा.

सिंगल आर्म रो
उभे रहा. मग डाव्या पायावर उभे रहा व उजवा पाय त्याच्या पुढून माहे न्या. हे करताना डाव्या पायाचा गुडघा किंचित वाकवा.

द कर्ल
पाठीवर जमिनीवर लेटा. पाय नितंबांपर्यंत दुमडा. गुडघे वाकवा व पाय जमिनीवर ठेवा. पेल्विस बोन झूकवून पोट थोडे आत दाबा, असे आठ वेळा करा. यानंतर मान थोडी वर उचला. तेव्हा दोन्ही हात शरीरालगत तळवे जमिनीवर ठेवून सरळ ठेवा. मग दोन्ही पाय जमिनीस आडव्या व समांतर रेषेत वर उचला गुडघे वाकवू नका. चारपर्यंत आकडे म्हणा. मग पाय खाल

शरीराच्या दोन्ही बाजूंस ताठ, सरळ, पण सैल ठेवा. मग पाय अलगद वर करा. मग गुडघ्यांत वाकवून क्रॉसस करा. मग खांद वर उचलून जेवढे डोके वर उचलता येईल, तेवढे उचला. आठपर्यंत आकडे मोजा. मग पाय खाली आणा व शरीर शिथिल सोडा.

फायदे
स्त्रीचे शरीर सुडौल आणि योग्य आकारात राहते. वाढते वय आणि मानसिक तणाव यांचा स्त्रीच्या शरीरावर होणारा प्रभाव कमी कमी होत जातो. सांधे मजबूत राहतात व स्नायूंपेशीही मजबूत होतात. त्वचा कांतिमान बनते. देहाची कार्यक्षमता वाढीस लागते. फुफ्फुसे व हृदय यांचे कार्यही योग्य प्रकारे व दिशेने चालू राहते. शरीरात असलेली जादा चरबी विरघळते. पाय, पोटर्‍या, नितंब यांना योग्य आकार प्राप्त होतो. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे घडू लागते.

आधुनिक उपकरणे वापरा, पण...

कूल डाऊन
उपकरण वापरण्याच्या आधी ज्याप्रमाणे वॉर्मिंग अप्‌ आवश्यक असते, त्याचप्रमाणे त्याच वापरानंतरही कूल डाऊन होणे तेवढेच अगत्याचे असते. यासाठी पुढील प्रकार/ प्रकाराचे व्यायाम करू शकता.


उपकरणांच्या आधारे व्यायाम
जॉगर ट्रेडमिल
आपली उंची व सोय यानुसार याची उंची वाढवावी. या व्यायामासाठी नेहमी पायाचा पुढील भाग व बोटे यांचा वापर व्हावा. हँडल घट्‌ट पकडून व पाय नीट अडकून बसावे, म्हणजे पडण्याचे भय नाही. पहिले एक मिनिट वेग मंद ठेवावा. यानंतर पूर्ण वेगाने १५ ते २५ मिनिटे जॉगिंग करावे. तसेच प्रारंभी जॉगिंगचा काळ कमी ठेवावा व तो नंतर वाढवत न्यावा. हा व्यायाम करताना किंचित पुढे झुकावे; पण पाठ ताठ ठेवावी. तसेच श्वसन नाकाने व्हावे. जर या दरम्यान थकवा वाटू लागला, तर थोडे ग्लुकोज वॉटर प्यावे. या उपकरणावर जे मीटर असते, त्यावरून रीडिंग पहावे. हे थांबवायचे असेल, त्याच्या आधी थोडा वेळ हळूहळू याची गती कमी करावी.

फायदा- पूर्ण शरीरास व्यायाम मिळतो. पाय बळकट, पोट सपाट होण्यास मदत होते.

वेस्ट ट्रिमर- याचे हँडल लहान करून बसूनही याचा वापर करणे शक्य असते. यासाठी दोन्ही हातांनी पकडावे व ट्रिमरवर पायांच्या बळावर बसावे व शरीर एकदा डावीकडे, तर एकदा उजवीकडे फिरवावे. नंतर हँडल हव्या तेवढ्या उंचीसाठी वर ओढून घ्यावे व पायांच्या बळावर ट्रिमरवर उभे रहावे व शरीर एकदा डावीकडे, तर एकदा उजवीकडे फिरवावे. स्त्रीला आपली कंबर बारीक करून त्यावर व सभोवताली असणारी अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

स्टमक क्रंच
उभा दांडा व त्यास दोन्ही बाजूंस मांड्यावर बसवता येईल, असे हे उपकरण असते. मधला फिरता दांडा बाजूच्या उपकरणाच्या हूकला जाड रबर बँडने जोडला असतो. खुर्चीत ताठ बसून व पोटावर भार देऊन हा मधील दांडा वरखाली करावा. प्रारंभी एकच रबर बँड लावावे. त्यानंतर त्यांची संख्या वाढवत न्यावी. दबाव वाढत जातो. सायकलीच्या चाकांच्या टायरमध्ये हवा भरण्यास वापरल्या जाणाऱ्या पंपाच्या हाताळणी/ वापराप्रमाणे हा वापर करावा.

फायदा- पोट सपाट होणे, हात, मनगटे, खांदे बळकट होणे. क्रंचचा वापर जर अँगल बदलून केला गेला व मनगटेही विशिष्ट प्रकारे वापरली, तर हातांना त्यांच्या स्नायूंना खूपच चांगला व्यायाम होत असतो. फक्त याबरोबर येणार्‍या माहिती- पत्रकाचे वाचन करून मगच हे वापरावे. याच प्रकारे पॉवर रायडर एक्सरसायजर, सायकल यासारखी अनेक उपकरणे आहेत. तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शक घेउन आपल्या बजेटमध्ये बसणारे व गरज भागविणारे उपकरण खरेदीरावे.

द डायगोनल लिफ्ट
कंबर बारीक करण्यासाठी या व्यायाम - प्रकारचा उपयोग होतो. शरीर उजव्या बाजूस वळल्यासारखे करून लेटावे. उजव्या पायावर डावापाय ठेवावा.गुडघे किंचित वाकवावे. उजव्या नितंबावर तुमचा शरीराचा भार पडावा. याच वेळेस दोन्ही हातांची बोटे परस्परांत गुंतवून डोक्याच्या खाली घ्यावीत, खांदे आपोआप पसरतील, पोटाच्या स्नायुपेशी हळूहळू संतुलित कराव्यात. एक ते चार आकडे मोजावेत. हात व माथा पूर्ववत्‌ आणि शिथिल स्थितीत आणावा आता हीच प्रक्रिया याच क्रमाने शरीराच्या दुसर्‍या बाजूस करावी.

रिव्हर्स कर्ल
जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पाय एकदम सरळ रेषेत व जोडून आकाशाच्या दिशेने वर न्या. मग गुडघ्यात वाकून हळूहळू पाय डोक्यापर्यंत आणा, खांदे व डोके मात्र वर उचलू नमा मग पोटाचे स्नायू जरा आत ओढा व हळूहळू नितंब फरशीवरून वर उचला मग ते खाली आणा. शिथिलता आणून शरीर पूर्ववत्‌ करा व आवश्यकतेनिसार व्यायाम करा.

हेही लक्षात घ्या
कोणतही पोटाचा व्यायाम (वर दिल्याखेरीज अन्य व्यायाम ) करतान काही वेळेस डायना बँड नावाचे साधन बांधा, त्याऐवजी एक लांब कपडा, टॉवेलही वापरू शकता. पोट आत घेण्यासाठी केलेले व्यायाम पाय, डोके, व पोत या तिन्हींसाठी उपयुक्त ठरणारे असतात.

कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म- अप स्थितीत यावे व अन्य कोणत्याही, यातील व्यायाम- प्रकाराहून जागचया जागी मार्चिंग करणे सोपे व उपयुक्त असते. हे व्यायाम केवळ पोटच आत घेत नाहीत, तर स्त्रीच्या पूर्ण शरीरास खास ढब प्राप्त करून देतात. पोटाचा वरचा भाग या व्यायामामुळे पटकन्‌ आत जातो.त्या तुलनेने त्याचा खालचा भाग आत जाणे अवघड ठरते. पोट आत गेले, की आपोआपच कंबर बारीक होते व बांधा एकदम सुडौल होऊन स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. याबरोबर योग्य आहाराची जोडही दिली जावी खूप गोड, तुपकट व तळकट, हाय कॅलरीयुक्त डाएट घेतल्यास त्या स्त्रीचे व्यायामही परिणामहीन ठरू शकतात. कारण वाढती चरबी इतक्या वेगाने कमी होत नसते.