Print
Hits: 9755

प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य व सौंदर्य या दोहोंची जपणूक व वर्धन करण्याच्या दृष्टीने हा प्रश्न व त्याची खरी शास्त्रीय उत्तरे अत्यंत महत्वपूर्ण असतात.

काही तज्ज्ञांच्या मते आपला दैनंदिन आहारच असा बदलला आहे की, जरूरीहून कितीतरी पट अधिक प्रमाणात व अनावश्यक अशा साखरेचे सेवन आपण करत आहोत व तेही नैसर्गिक नव्हे, तर कृत्रीम स्वरूपात. म्हणूनच त्या गोड पदार्थापासून अनारोग्य व सौंदर्यास गालबोट लागणे, असे कडवट अनुभवच जास्त आहेत.

आपणास आवश्यक व उपकारक अशी नैसर्गिक शर्करा फळे, भाज्या, दूधजन्य पदार्थ इ. तून प्राप्त होत असते. परंतू चॉकलेटस्‌, केक, शितपेये, इ. सेवन केली जाणारी साखर ही मात्र आपल्या शरीरास हानीकारक असते.

आपले दात नक्‍कीच आपल्या सौंदर्यात भर घालतात. पण खूप प्रमाणात व सातत्याने गोड खाणाऱ्या व्यक्तींचे दात किडतात. कारण दातातील सूक्ष्म जीव हे गोड पदार्थातील साखरेनेच पोसले जातात, वाढतात व त्याच्यातून स्त्रवणारे आम्ल त्यांच्यावर कीड पसरविण्यास हातभार लावत असते. याखेरीज दातास चिकटणारे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ, गोळ्या इ. ही यास मदतच करतात. म्हणून या सर्वांचे सेवन कमी करणे, नेहमी चूळा भरणे व दात ब्रश करणे आवश्यक असते.

साखर न खाणे, कमी खाणे, हा नियम केवळ मधुमेह्यांपुरताच असतो, असे मानणे चुकीचे ठरते, कारण याचे अतिरेकी सेवन व अन्य अनुकूल कारणे एकत्र आली, तर निरोगी स्त्रीसही हा विकार जडू शकतो हे विसरू नये.

जरूरीहून अधिक प्रमाणात साखरेचे गोड पदार्थ खाणे म्हणजे अनेक शारीरिक दोष, आजार यांना आमंत्रण देणे होय. उदा. वजन वाढणे, शरीर बेडौल होणे व एकदा वजनावरील नियंत्रण सुटले, की त्या जोडीलाच व्यक्ती अन्य अनेक आजारांची शिकार होते.

जास्त प्रमाणात साखर खाणे, हे अनेक प्रकारे व्यक्तींच्या आरोग्यास हानिकारक असू शकते. कारण यामध्ये कोणतेही खनिजगुण वा पोषक तत्वे नसतात. यापासून आपल्या शरीरास केवळ उर्जा मिळत असते. (एक ग्रॅम साखरेतून चार कॅलरीज्‌ मिळतात) म्हणूनच आपण सर्वांनीच आहारात थंड पेय, केक बिस्किटे, इ. पदार्थ ठेवू नयेत. यामुळे नुसतेच आहार- संतुलन बिघडत नाही, तर आहारातील पौष्टिकता नष्ट होते.

काही वेळा रोज अधिक प्रमाणात गोड पदार्थाचे सेवन केल्याने व्यक्तीस त्याची सवय लागू शकते व थोडे- थोडके गोड खाऊन त्यांना चालत नाही व ही वाढाती सवयच त्यांचे आरोग्य व सौंदर्य या दृष्टिने घातक ठरते. तसेच या अनेक गोड खाद्यपदार्थांत कृत्रिम स्वीटनर्स्‌ घातलेली असतात व त्यांचे अतिरेकी सेवनही शरीरास हानिकारक ठरते. म्हणून प्रत्येकीने आपण नेमके किती प्रमाणात साखर वा गोड पदार्थ यांचे सेवन करावे, हे ठरविणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते ज्या तरूण निरोगी व्यक्तीचा प्रतिदिन आहार १६०० कॅलरीज्‌ असेल, तिने केवळ सहा टी-स्पून साखरेच खावी. याखेरीज लागणारी शर्करा ही फळे, डाळी, भाज्या इ. तून मिळत असते. तसेच हे गोड पदार्थ खूप तळकट, तूपकट आणि कार्बोहैड्रेटस्‌युक्त असू नयेत. उदा. मिठाई, आइस्क्रिम इ.

भोजनाशी निगडित गैरसमज
आपण दैनंदिन जीवनात जो आहार घेत असतो त्यामुळे आपल्याला लाभ होणे व आरोग्य आणि सौंदर्य - वर्धन होण्यास मदत होणे आवश्यक असते. परंतु या संदर्भात जे विविध गैरसमज आहेत, ते मात्र आपण समजून घेऊन आपले सौंदर्य आणि आरोग्य या दोहोंची जपणूक करावी.

आपली शरीररचना अशी असते की, आपण वीस मिनिटांपेक्षा अधिक काळ एकाच शरीर- स्थितीत बसून चालत नसते. पण नोकरी कराणार्‍या स्त्रीयांना हा निर्णय काटेकोरपणे पाळता येत नसतो म्हणूनच या स्त्रीयांनी देहाच्या कोणत्याही विशिष्ट भागावरच भार टाकून बसू नये. शरीरास रग लागू देऊ नये.