‘खाऊचा डबा.......... ’ शाळेसाठी!
“खाना खा लो ....... नो मम्मी
"आलू पराठा........ नो मम्मी"
अशा प्रकाराची एक जाहिरात दूरदर्शनवर आपण पहातो. हा (जाहिरातीतील) आई मुलाचा संवाद ! आई मुलाला त्याच्या आवडीचे खाणे देण्यासाठी त्याच्या मागे धावते, पण मुलाला भूक नसते म्हणून तो ‘नो मम्मी’ म्हणतो. साहजिकच आई काळजीत पडते..... भूक का लागत नसावी? मग अमुक-अमुक टॉनिक द्या वगैर वगैरे.

सर्वच आई- वडिलांना (विशेषत: आईला) आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, आवडी- निवडी माहीत असतात. त्याने भरपूर खावे यासाठी ते काळजीही घेत असतात. पण केवळ आहाराचे प्रमाण वाढवून चालेल का? केवळ मुलांच्या आवडीचाच आहार देऊन चालेल का? कसे का होईना एकदा खा बाबा असे म्हणून त्याला ठराविक आहाराची सवय लावून देणे हे त्याच्या /तिच्या सर्वागीण वाढीसाठी योग्य ठरणार नाही.
आई - वडिलांनीच योग्य त्या खाण्यापिण्याच्या सवयी लावायला हव्या आहेत. कोणत्या प्रकरचा आहार? कोणत्या वेळेला द्यायाचा? किती प्रमाणात असावा? या गोष्टी नेहमीच विचारात घ्यायला हव्यात.
१. मुलांचे वय
२. आहारातील पोषक घटक
३. आवश्यक प्रमाण
४. आहार पचविण्याची आपल्या मुलांची क्षमता.
५. ऋतू व हवामान
६. पालकांची आर्थिक परिस्थिती
७. मुलांची आवड
या सर्व मुद्यांचा विचार करून आपण मुलांचा आहार ठरवावा. त्यांचे वेळापत्रक ठरवावे. असे केले असता त्यांना सर्वांगीण वाढीसाठी आहार कसा कोणता द्यावा? हा प्रश्न कठीण वाटणार नाही. या ठिकाणी मला एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते कि घरातील जुने जाणते लोक (आजी - आजोबा) म्हणतील कि ‘ आम्ही नाही बुवा आमच्या मुलांच्या बाबत ( आहाराबाबत ) एवढा विचार केला. आता हे फारच चाललय् ! .... पण एक लक्षात ठेवले पाहिजे. बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलतात. आजचे युग स्पर्धात्मक आहे.
शारीरीक क्षमते बरोबरच बौध्दिक क्षमता वाढ ही तितकीच महत्वाची आहे. मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत. शाळा- अभ्यास-उपक्रम यातील वेळेचे गणित बदलत आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत एका घरात खूप मुले एकत्र वाढत असतं. आता एक- दोनच मुले एका घरात असतात. त्यांच्यावर लक्ष केंद्रित होते आणि जागरूक पालक मुलांच्या सर्व प्रकारच्या क्षमतेच्या वाढीसाठी तसे लक्ष देतातही! एवढी सर्व प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे शाळेतील मुलांसाठी ‘खाऊचा डबा’ कसा असावा? यावर आपण जो विचार करणार आहोत त्याबद्दल सविस्तरपणे उपरोक्त सात मुद्यांचा विचार होणे गरजेचे आहे.
१. मुलांचे वय
शाळेत जाणार्या मुलांचे वय सर्वसाधारणपणे प्राथमिक शाळेत जाणारी व माध्यामिक शाळेत जाणारी मुले अशा दोन गटात करता येईल. साधारण ५ ते ९ वर्षे हा गट प्राथमिक शाळेत जाणार्या मुलांचा गट मानण्यास हरकत नाही. या वयामध्ये मुलांचे धावणे, उड्या मारणे, खेळणे हे सतत चालू असते. त्यामुळे त्यांना चांगल्या पोषक आहाराची गरज असते. वाढते वय व वाढती शारिरीक चळवळ यामुळे या वयात भरपूर आहार आवश्यक असतो. दोन वेळच्या जेवणाखेरीज मधल्या वेळीही काहीतरी उष्मांकपूरक पदार्थ हवे असतात.
२. आहारातील पोषक घटक
आपण जो आहार घेतो, त्याचे आहारशास्त्राच्या दृष्टीने मुख्यत: पाच विभाग पडतात. यांनाच अन्नातील पोषक घटक असे म्हणता येईल.
- प्रथिने (proteins)
- स्निग्ध पदार्थ ( fats)
- कार्बेदके (पिष्टमय) (carbohydrates)
- जीवनसत्वे (Vitamins)
- खनिजे(minerals)
या प्रत्येक घटकाचा शरीराला निरनिराळ्या तर्हेने उपयोग होतो. सर्व अन्नपदर्थात बहुतेक सर्व घटक कमी अधिक प्रमाणात असतातच. पण त्यांचे पोषणमूल्य (Nutritive value) व शरीरात उर्जा निर्माण करण्याची क्षमता निरनिराळी असते. त्या त्या पदार्थातील घटकांच्या प्रमाणानुसार त्या त्या घटकामध्ये पदार्थाची गणना होते. हे घटक आपण थोडक्यात विचारात घेऊ.