Print
Hits: 34017

शरीरात जेव्हा चरबीचा जास्त साठा होतो त्यावेळी व्यक्ती लठ्‍ठ होते, आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले म्हणजे लठ्‍ठपणा दिसतो. लठ्‍ठपणामुळे ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस, हृदयरोग, डायबेटीस. संधीवात असे रोग होतात.

कावीळीची कारणे
कावीळ हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे. आपल्या शरीरातील अन्नपचन करणारे ‘पित्त’ योग्य मार्गाने आतड्यात न जाता, ते रक्तात मिसळण्यास सुरवात झाली म्हणजे हा रोग होतो.

कावीळ म्हणजे यकृताचा आजार
यकृत किंवा लिव्हर मधिल बिघाडाचा आणि रोगांचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणून यकृत या अवयवाची ओळख करून घेऊ. लिव्हर ही पोटात जठराच्या उजव्या बाजूला असणारी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे.

यकृताचे कार्य
रक्तामधील घातक पदार्थ, अनावश्यक घटक, विषारी पदार्थ निष्प्रभ करून टाकण्याचं प्रमुख कार्य लिव्हर मध्ये होते. याखेरीज अन्नपचनासाठी आवश्यक असे पाचक स्त्राव पित्तवाहक नलिकांमार्फत दोन मार्गांनी पित्ताशयात व लहान आतड्याच्या सुरूवातीच्या भागात सोडले जातात.

कावीळ बहुदा विशाणुंमुळे (ए.सी.डी.ई) होते यालाच इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस असे म्हणतात आणि दुषित अन्न व पाणी हेच याचे प्रमुख कारण असते. याखेरीज दारू आणि इतर यकृताला विषारी असणारे पदार्थ.

काविळीतील पथ्यापथ्य
काविळीचा प्रकार कोणताही असला, तरी यकृताला सूज येणे किंवा पित्ताचा स्त्राव (बाईल) स्त्राव आतड्यात येण्यास अडथळा होणे यपैकी काहीतरी निश्‍चित घडते, यकृत हा अवयव अन्नपचनाशी निगडीत असल्यामुळे खाण्यापिण्याच्या बंधनाना या रोगात अतिशय महत्व आहे.

पथ्याचे तत्व काय?
यकृतातील बिघाडामुळे आतड्यात येणारा पित्ताचा (बाईल) स्त्राव अनियमित/अपुरा होतो. यामुळे आहारातील तेलकट, तुपकट, स्निग्ध पदार्थाचे पचन होत नाही. पचनशक्ती मंद होते. म्हणून पहिला नियम म्हणजे असे पदार्थ टाळावेत. फोडणीची पाळी, वडे, भजी, पापड, शेव-चिवडा, फरसाण, वडा-पाव, पाव-भाजी इत्यादी तेलकट-तुपकट, तळलेले पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत.

पचनशक्ती मंद झाल्याने मांसाहार वर्ज्य करावा. पचण्यास जड पदार्थ जसे पंचपक्वान्ने, मेवा-मिठाई, अतिगोड, आंबट, खारट चवीचे पदार्थ भरपेट खाण्याचे टाळावे. आंबवलेले सर्व पदार्थ उदा. इडली, डोसा, खमंग, उत्ताप्पा आणि दही खाऊ नये.

चहा ऐवजी कोकमचे सरबत
सकाळी उठल्यावर कोकमचे सरबत घ्यावे. त्यासाठी आमसुले ५/६ तास पाण्यात भिजवावी. नंतर ती कोळून घेऊन त्यात थोडी साखर व जिर्‍याची पूड मिसळावी.

लाजामंड
काविळीच्या सुरवातीच्या अवस्थेत भूक पूर्णपणे नष्ट होऊन पोटात मळमळ, उलट्या होणं अशी लक्षणे सुरू होतात. यावेळी लाजामंड घेतल्यास ही लक्षणे कमी होऊन शरीरात थोडी शक्ती उत्पन्न होण्यास मदत होते. लाजामंड करण्यासाठी चांदीच्या भांड्यात साळीच्या लाह्या रात्रभर भिजवत ठेवाव्यात. सकाळी त्यात थोडी खडिसाखर घालून चमचा/चमचा पाणी दिवसभर घ्यावं.

षडंगोदक
चंदन (पांढरे आणि तांबडे) पावडर, नागरमोथा, पित्तपापडा, वाळा आणि सुंठ ही समभाग घेऊन १ तांब्याभर उकळून थंड केलेल्या पाण्यात १ चमचा मिसळावी. तहान लागल्यास हेच पाणी प्यावे.

ताजे ताक
अधमुरे दही घुसळून त्यातील लोणी काढून टाकून ताक करावे. या ताकात जिरे, धन्याची पूड, हिंग आणि सैंधव किंवा शेंदेलोण समप्रमाणात घालावे. १ ग्लास ताकात १/२ चमचा हे मिश्रण घालून ताक प्यावे.

नाष्ट्यासाठी फळे व लाह्या
थोडी भूक वाढल्यावर डाळिंब, द्राक्षे किंवा उसाचे काप किंवा गंडेया खाण्यास हरकत नाही. तेल किंवा तिखट न लावलेल्या ताज्या कुरकुरीत साळीच्या मूठभर लाह्या ३ ते ४ वेळा खाव्यात.

दुपारचे जेवण / रात्रीचे जेवण
सूप:
पालक किंवा कोबीच्या पानांचे उकडून सूप करून ते घ्यावे. ७-८ दिवसांनी कोंबडीच्या मटणाचं सूप किंवा पाया सूप (बकरीच्या खुराचं) अर्धी वाटी २ वेळा घेण्यास हरकत नाही. जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर आल्याचा तुकडा व किंचित मीठ चावून खावे. तांदूळ भाजून केलेल्या भाताच्या पेजेत किंचित शेंदेलोण घालून ती प्यावी. गव्हाचा फुलका/चपाती तेल किंवा तूप न लावता करावी अथवा ज्वारीची/बाजरीची भाकरी मुगाच्या वरणाबरोबर खावी.
चटणी:
पुदीना, आमसूल, धने, काळेमिरे, आले आणि ताजे नारळाचे खोबरे यांची चटणी करून ती भोजनात घ्यावी. यामुळे अन्नाला रूची येते आणि अन्न पचण्यास मदत होते.
हळद, हिंग, ओवा आणि शेंदेलोण यांची समभाग पावडर करून ती लिंबू कापून त्याला लावावी. हे लिंबू किंचित्‌ गरम करून जेवण झाल्यावर चोखावे. यामुळेही अन्न पचण्यास मदत होते.
कोशिंबीर:
ताजा कोवळा मुळा किसून त्यात किंचित जिरे, हळद आणि सैंधव घालून केलेली कोशिंबीर खावी.
सॅलड:
कच्च्या भाज्या खाणे ही कल्पना आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. तरी देखील काकडी, शिजवलेले किंवा कच्चे बीट, मुळा यांच्या चकत्या करून त्या खाण्यास हरकत नाही.
जेवणानंतर:
ताजे ताक, संत्री किंवा मोसंबी यांचा रस घ्या. बडिशेप, ओवा, शेंदेलोण यांचे समभाग चूर्ण १/४ चमचा गरम पाण्याबरोबर खावे.

वरील पध्दतीने आहार, पूर्ण विश्रांती यांचे काटेकोर पालन केले तर काविळ लवकर बरी होण्यास मदत होईल.