Print
Hits: 18897

काम या शब्दाची वात्स्यायनाने व्याख्या केली आहे ती अशी:

१. मनाच्या आणि आत्म्याच्या अधिपत्यानुसार पंचज्ञानेद्रियांद्वारे प्राप्त होणार्‍या वैषयिक सुखाची जाणीव म्हणजे काम.
२. ‘काम ’ म्हणजे इच्छा काम म्हणजे सुख जागतिक आरोग्य संघटनेने स्वाभाविक कामजीवनाची व्याख्या सांगितली आहे ती अशी:

“माणसाचे व्यक्तीमत्व परस्पर संबंध व प्रेम वृध्दिगंत करणारे व लैंगिकतेचे दैहिक, भावनीक, बौध्दिक व सामाजिक पैलूंचे एकात्मीकरण दर्शविणारे कामजीवन" कामजीवनात

१) सामाजिक व वैयक्तीक संहितेचे पालन व्हावे.
२) भीती, लज्जा अपराधाची भावना नसावी.
३) दैहिक दोष आजार किंवा न्यूनता नसावी.
४) स्वत:चे किंवा दुसर्‍याचे स्वास्थ्य बिघडू नये.

यावरून कामजीवनाचा आरोग्याशी किती निकटचा संबंध आहे याची जाणीव होते. ‘आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे, शारीरीक मानसिक, सामाजिक सुस्थिती म्हणजे आरोग्य’ असेही जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. कामजीवन ही शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. स्वाभाविक कामजीवनासाठी आरोग्याची नितांत गरज आहे. निरामय जीवनासाठी संतुलित आहाराच महत्व अनन्य साधारण आहे. म्हणून निरामय कामजीवनसाठी आहाराला महत्वाचे स्थान आहे.

आहार असंतुलीत असेल तर पोषण दोष उद्‌भवतात थकवा अशक्तपणा येतो. हातापायात मुंग्या येतात, कंबर दुखते त्यामुळे काम इच्छा कमी होते. लिंगात ताठरता सहजासहजी येत नाही. समागमा दरम्यान व नंतर थकवा

येतो. पोषण दोष असणार्‍या मुलीत रजोदर्शन (मासिक पाळीची सुरूवात) उशिरा येते. स्त्रियात मासिक पाळी बंद होते किंवा अनियमितपणे येते.

शरीराचे वजन वाजवीहून अधिक होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आहार. रोजच्या आहारात तूप, लोणी, तेल, साखर याचे प्रमाण किंवा एकूण उष्मांकाचे प्रमाण वाजवीहून अधेक असल्यास वजन वाढते. अशा पुरूषांना समागमा दरम्यान दम लागतो व थकवा येतो. स्त्री/पुरूषांचा पोटाचा घेर खूप वाढलेला असेल तर समागम जमत नाही. पोटाच्या आकारामुळे व्यत्यय येतो.

समतोल आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे, जीवनसत्वे, क्षार व एकूण उष्मांक यांचे योग्य ते प्रमाण आहारात असावे लागते. प्रथिनांमुळे शरीराची वढ होते, झीज भरून येत. शरीरातील दुरूस्तीचे कार्य घडते. विकार (एन्झाइम्स) व संप्रेरके (हार्मोन्स) तयार होतात आणि शरीरात प्रतिकार शक्ती निर्मिली जाते. प्रथिनांची कमतरता असल्यास शुक्राणूंची संख्या. व टेस्टोस्टेरॉन यांच्या निर्मितीत व्यत्यय येतो. स्त्रियात स्त्रीबीज निर्मिती इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण घटते.

प्रथिनापासून अमायनो आम्ले मिळतात. प्राणिजन्य प्रथिनातून ही अमायनो आम्ले अधिक प्रमाणात मिळतात. मांस , मासे, अंडे , दूध यात यांचे प्रमाण अधिक प्रमानात असते. याचा अर्थ शाकाहारी दुधाचा समावेश आहेच, त्यामुळे शाकाहारी माणसाला ही अमायनो आम्ले मोळू शकतात. एकदल धान्ये (तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका) द्विदल धान्ये (मूग, उडीद, चणे सोयाबीन, इतर डाळी व कडधान्य) म्हणून आहारात दूध, अंडे, डाळी, कडधान्ये एकदल धान्ये यांचा समावेश असावा. इडली हा पदार्थ पौष्टिक मानला जातो. कारण त्यात एकदल व द्विदल (तांदूळ व उडीद) याचे प्रमाण असते. शेंगदाणे, काबुले चणे, सोयाबीन यातही भरपूर प्रथिने असतात.

स्निग्धामुळे उर्जा मिळते. शरीराला उष्णता लाभते. अन्नाची रूची वाढते. शरीराचे वजन वाढते. दूध , तुप, लोणी, तेल दूध दुभते यात स्निग्धे असतात. पण स्निग्धांमुळे कोलेस्टेरॉल वाढते. कोलेस्टेरॉलमुळे हार्ट ऍटॅक येतो. रक्तदाब वाढतो रक्तवाहिन्यात काठिण्या निर्माण होते. शिश्नाच्या रक्तवाहिन्यात काठिण्या उद्‌भवल्यास नपुंसकत्व येते.

या सर्व कारणांसाठी जेवणात स्निग्धांचे प्रमाण कमी असावे. कर्बोदके आपल्या शरीराला ऊर्जा पुरवितात. सहसा आपल्या आहारात कर्बोदकाची उणीव आढळत नाही. उलट आपण वाजवीहून अधिक कार्बोदकाची उणीव आढळत नाही. फळे, कंदमुळे, धान्ये , साखर, गूळ मध यातून कर्बोदके मिळतात. साखरेहून गूळ अधिक पौष्टिक असतो. त्यात लोह असल्यामुळे पंडुरोग (ऍनिमिया) टळतो. मधुमेह असणार्‍यांनी शर्करायुक्त पदार्थ टाळावेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की मग चेतातंतू कमजोर होतात यामुळे नपुंसकत्व येते. जीवनसत्वे फार कमी मात्रेत शरीराला आवश्यक असतात. शरीराच्या चयापचयासाठी, शरीरातील विकरांच्या निर्मितीसाठी व इतर अनेक क्रियांसाठी जीवनसत्वांची गरज असते. जीवनसत्वे ‘अ’ चा अभाव असल्यास वंध्यत्व(मूल न होणे) येते. कारण पुरूषात शुक्राणूंची निर्मिती वृषणात व्हावी तितक्या प्रमाणात होत नाही आणि स्त्रियातील स्त्रीबीजग्रंथी व्यवस्थित कार्यरत न राहिल्यामुळे स्त्रीला मासिकपाळी वेळेवर येत नाही.

‘ब’ जीवनसत्वातील पायरिडॉक्सिन, पँटोथिनिक आम्ल ब १२ या घटकांची उणीव असेल तर पुरूषातील वृषणांची कार्यक्षमता घटते. काम‍उद्दीपनाचे प्रमाण कमी होते.

जीवनसत्व ‘अ’, ‘ब’, ‘क’ , व ‘ई’ ही जीवनसत्वे प्रतिउपचयक (अँटीऑक्सिडंट ) असतात. यांच्यामुळे शरीरातील पेशींची क्षमता चांगली राहते. दूध, अंडे, मांस, मासे, फळे, ताज्या पालेभाज्या हातसडीचे तांदूळ, सुकामेवा डाळी यात जीवनसत्वे असतात पिवळा गर असलेल्या फळात (पपया, आंबा, ) व गाजरात जीवनसत्व ‘अ’ भरपूर प्रमाणात असते. आवळा, मोडाच्या कडधान्यात जीवनसत्व ‘क’ भरपूर असते.

सुदृढ कामजीवनासाठी क्षारांचीही गरज असते. लोह असलेल्या आहार वस्तूंचा समावेश जेवणात नसेल तर शरीर फिके बनते, अशक्तपणा वाटतो, लवकर थकवा येतो म्हणून आहारात पालेभाज्यांचे प्रमाण भरपूर असावे. गुळ, बाजरी, नाचणी यातही लोह असते.

पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यास थकवा येतो उत्साह कमी होतो मग कामजीवनातही उत्साह रहात नाही. पालेभाज्या. फळे, नारळाचे पाणी यात पोटॅशियम असते. आहारात आयेडीन कमी असल्यास गलग्रंथीत निर्माण होणार्‍या संप्रेरकांचे प्रमाण घटते, त्यामुले स्त्रीला मासिक पाळी येत नाही. पुरूषात नपुंसकत्व येते. मासे व पिण्याच्या पाण्यपासून आवश्यक ते आयोडीन शरीराला प्राप्त होत असते. म्हणून आयोडीनयुक्त मीठ जेवणात वापरल्यास न्यूनता उद्‌भवत नाही.

जस्त (झिंक) या धातूचाही अंश माणसाच्या शरीरात असतो. जस्ताची उणीव असल्यास पौगंडावस्थेतील शारीरिक बदल व्यवस्थित घडून येत नाहीत. उंची, वाढत नाही. वृषणांची वाढ होत नाही. प्रौढात जस्ताची न्यूनता असल्यास वृषण सुकतात व वंध्यत्व येते. कामेच्छा कमी होते. माणसाला आवश्यक असणारे क्षार त्याला पालेभाज्या व प्राणीजन्य अन्न प्रदार्थातून व सुक्या फळातून मिळतात.

कामजीवन हा सहजीवनाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे, सहजीवनासाठी आरोग्य महत्वाचे असल्यामुळे, आरोग्यासाठी आहार महत्वाचा असल्यामुळे आहाराचा संबंध कामजीवनाशी असतो. आरोग्यासाठी काय किंवा सुदृढ कामजीवनासाठी काय, माणसाने काळजी घ्यावी पण काळजी करू नये. जगातील सर्व प्रकारच्या आहारात भारतीय आहार अत्यंत संतुलीत आहे.

सुवर्णभस्म, वंगभस्म, मौक्तिकभस्म, च्यवनप्राश धात्री, रसायन, वृष्यवटी, सिध्द मकरध्वज, अश्वगंधारिष्ट ही आयुर्वेदीक औषधेही सेक्स टॉनिक म्हणून वापरात आहेत. पुरेसे संशोधन झालेले नसल्यामुळे नक्की सांगणे कठीण आहे. एक मात्र खरे की सर्वात उत्तम सेक्स टॉनिक म्हणजे पती पत्‍नीतील नितांत प्रेम व सर्वागिण स्वास्थ्य!