ताणतणावाचा आपल्या मनाच्या आणि शरिराच्या नेहमीच्या स्थितीवर खूपच पगडा असतो. त्यामुळेच ताण खूप वाढल्यावर आपली तंदुरुस्तीसुद्धा ढासळू शकते. ताणामुळे आपल्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतात. त्यामुळेच उच्च रक्तदाब, अर्धशिषी, भूक जाणे, मानसिक दबाव अशा अनेक व्याधींची शक्यता निर्माण होते. अतीनैराश्याचे ताणतणाव हेच कारण असते, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि हे नैराश्य माणसाला व्यसनाधीनतेकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. नोकरी जाण्याची शक्यता, कौटुंबिक समस्या, पैशाची चणचण, जवळच्या व्यक्तीचे आजारपण ही नैराश्याची कारणे होऊ शकतात.
अतीताण ही अचानक आलेल्या समस्येवरची प्रतिक्रिया असते. किंवा कधी कधी नुसते त्या न आलेल्या संकटाचा विचार केला, किंवा ते संकट आले आहे अशी कल्पना केली तरीही अतीताण येतो.
ह्या सर्व ताण तणावामुळे आपल्या तंदुरुस्तीवर खूपच दुष्परिणाम होतात. वजन वाढणे, स्थूलता येणे हे मुख्य परिणाम असतात; तर काही जणांच्या बाबतीत वजन घटणे, अशक्तपणा येणे असेही होऊ शकते.
ताणतणावाचे व्यवस्थापन:
हे सर्व नकारात्मक ताणतणाव आपल्या तंदुरुस्तीसाठी अतिशय हानीकारक असतात. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. पुढे दिलेले काही मुद्दे आपण स्वत:च स्वत:च्या ताणतणाव नियोजनासाठी वापरू शकतो.
- ताण येण्याची लक्षणे आपली आपल्याला कळण्यासाठी जागरुक रहा. ही लक्षणे म्हणजे अचानक दमल्यासारखे वाटणे, एखादी गोष्ट करायची इच्छाच निघून जाणे, डोळ्यात अचानक अश्रु येणे इत्यादी.
- अशा वेळी आपण काही गोष्टी हमखास करतो: रोजच्या जेवणाकडे दुर्लक्ष, तब्येतीकडे दुर्लक्ष, अचानक दारू - सिगरेटचे व्यसन करायची इच्छा होणे इत्यादी.
पुढील मुद्यांचा नियोजनासाठी उपयोग होईल:
- खाण्याकडे दुर्लक्ष न करता रोजच्या रोज सकस आहार घेणे. विकतच्या तयार अन्न किंवा मैद्याची बिस्किटे न खाता घरचा चौरस आहार, ज्यात पोळी, भाजी, पालेभाजी, सलाड, डाळ भात असा आहार असेल. असा आहार आपल्याला नैराश्याच्या दिशेने न जाण्यासाठी खरोखर उपयोगी ठरतो.
- साखर आणि मीठ सुद्धा योग्य प्रमाणातच पोटात जाणे आवश्यक असते. ह्याचा आपल्या प्रतिकार शक्तीला ताप, सर्दी, खोकल्यापसून वाचवण्यासाठी खूप उपयोग होतो.
- भरपूर पाणी पिणे.
- चहा-कॉफीचे कमी प्रमाणातच सेवन करणे.
- मद्यपान अथवा धूम्रपान न करणे.
- अधून मधून विश्रांती घेण्यास कमीपणा न मानणे.
- संगीत ऐकणे.
- एखाद्या व्यक्तीला ’नाही’ म्हणण्याचा ताण न घेता, हेतू स्पष्ट ठेवणे.
ह्या सर्व गोष्टी योग्य त-हेने आमलात आणल्यास व त्या बरोबरीने नियमीत व्यायाम केल्यास शरीर व मन तंदुरुस्त रहाण्यास नक्कीच मदत होईल.