Print
Hits: 14218

पहिला विषय आहे मेंदूच्या रक्तपुरवठ्याचा. रक्तपुरवठा रक्तवाहिन्यांमधून होतो. रक्तवाहिन्या खूप लवचिक असतात. त्यांचे आकुंचन आणि प्रसरण खूप सफाईनी होतं. पण जसजसं आपलं वय वाढायला लागतं तसतशा ह्या रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतात. स्टिफनेस यायला लागतो. रक्तवाहिन्यांचे आकुंचन आणि प्रसरण सफाईने होणे खूपच कमी होते. आणि त्यात भर म्हणजे रक्त दाब, मधूमेह ह्यासारखे सोबती आपल्याला मिळायला लागलेले असतात. रक्त दाब, मधूमेह, बाहेरचे जेवण, कामाचा अतीताण म्हणजे स्ट्रेस, ह्या तीनही गोष्टींमुळे रक्तवाहिन्यांमधील लवचिकपणा कमी व्हायला लागतो आणि स्टिफनेस वाढायला लागतो, ज्याला वैद्यकीय परिभाषेत ऍथेरोस्क्लेरोसिस असे लांबलचक नाव आहे.

त्याच्यानंतर पंचावन्नाव्या वर्षी लोकांना लोकांना एखादा स्ट्रोक येतो किंवा हार्ट ऍटॅक येतो. त्यानिमित्ताने टेस्ट्स केल्या जातात, आणि नंतर कळतं की मला ब्लडप्रेशर आहे, रक्तवाहिन्या खराब आहेत. आता मी कितीही जरी पावलं उचलली तरी ह्याच्या नंतरची माझी रक्तवाहिन्यांची खराबी टळेल पण जी खराबी झाली ती झाली. ती गाडी काही उलटी नेता येत नाही. त्यामधे फक्त एक करता येते की रक्तदाब असो की मधूमेह असो, त्यामुळे झालेली रक्तवाहिन्यांची खराबी आपण कधीही भरून काढू शकत नाही. ह्या व्याधींना अतिशय महत्त्व देऊन आपण तरूणपणापासून त्याची काळजी घेतली पाहिजे. तीशी चाळीशीत आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष ठेवा. वारंवार तुमच्या तपासण्याकरून तुम्हाला रक्तदाब किंवा मधूमेह नाही, हे बघा आणि जर त्यापैकी काही थोडेसे जरी असले ,सुरवातीची अवस्था असली तरी अगदी भक्तीनी आणि नियमानी त्याचे उपचार घ्या, त्यासाठी लागतील त्या सर्व गोष्टी करा.

एक मोठा लकवा येणं किंवा एक स्ट्रोक येणं ही एक गोष्ट झाली, पण ह्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या बिघाडांमुळे तुम्हाला भले लकवा येत नसेल, पण मेंदूच्या छोट्या छोट्या जागी रक्तपुरवठा कमी होऊन तुमच्या मेंदूची एकंदरीत कार्यक्षमता कमी होते. किंबहुना सत्तरीनंतर होणा-या बुद्धीभ्रंशात एक मोठा भाग गेल्या पंचवीस तीस वर्षात रक्तपुरवठा छोट्याछोट्या रक्तवाहिन्यांतून- ज्याला आपण केशवाहिन्या म्हणतो (कॅपिलरीज), ह्या कॅपिलरीजमधला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूचे खराब झालेले अतिशय छोटे छोटे भाग असतात . त्यानी वरकरणी काहीच त्रास होत नसतो पण आपण ते टाळू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की पन्नाशी नंतर जसे आपण लघवी तपासतो, हिमोग्लोबिन तपासतो तसच रक्तवाहिन्यांना तपासणं ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग भले त्या रक्तवाहिन्या ह्रुदयाला जावोत की मेंदूला जावोत. ह्रुदयविकाराची जागरुकता गेल्या २० वर्षात खूपच वाढली आहे आणि अनेक लोक आपणहून येऊन ’माझ्या ह्रुदयाची तपासणी करून घ्या’ असे म्हणतात. पण एक लक्षात घ्या, की ज्या रक्तवाहिन्या - करोनरी आर्ट्रीज- तुमच्या ह्रुदयाला रक्त पुरवतात, त्याच तुमच्या मेंदूला पुरवतात. त्या रक्तवाहिन्यांची खराबी आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांची खराबी अशी समांतर प्रक्रीया सुरू असते. तेव्हा ह्रुदयाच्या रक्तवाहिन्यांची जेव्हा तपासणी कराल तेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांची सुद्धा तपासणी करा. म्हणजे त्यासाठी मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा फोटो म्हणजे ऍंजिओग्राम काढायची गरज आहे क? - नाही. कारण शेवटी मेंदूला रक्तवाहिन्या ह्या मानेतून मिळतात. ह्या रक्तवाहिन्यांना कॅरॉकिड असं नाव आहे. तर ह्या रक्तवाहिन्यांची सोनोग्राफी, ज्याला डॉपलर म्हणतात, ही चाचणी केली तर रक्तवाहिन्यांच्या आतलं अस्तर असतं तिथे काही खराबी असेल तर दिसून येते. तिथे येणारी खराबी म्हणजे काय? तर रक्तवाहिन्यांच्या आतलं अस्तर पहिल्यांदा खडबडीत व्हायला लागतं. आणि रक्तातल्या प्लेटलेट नावाच्या पेशी त्याला चिकटून बसायला लागतात. आणि तिथे रक्ताच्या गाठी निर्माण व्हायला लागतात. ह्या प्लेटलेटचा एक प्रोग्रॅम असतो. की खडबडीतपणा आढळला रे आढळला की त्याला चिकटायचं. आणि एक प्लेटलेट आढळली रे आढळली की त्याला दुसरी चिकटते. आणि ह्या रक्तवाहिन्यांच्या सोनोग्राफीला जे डॉपलर म्हणतात ते डॉपलर करून घेणं ही एक अगदी साधी तपासणी आहे. पन्नशी नंतर दर दोन ते तीन वर्षांनी करून घ्यावी. आणि एखाद्या रक्तवाहिनीमधे जरी खराबी आली तर दर वर्षी ती तपासणी करावी.

अनेकांच्या मनात प्रश्न असतो, की डॉक्टर आपल्याला तपासण्या करायला सांगत आहेत, पण त्यावर काही करता येईल का? - उत्तर आहे, जरूर करता येईल. जर तुमच्या रक्तवाहिन्यांमधे खडबडीतपणा सुरू झाला असला तर खडबडीत पृष्ठभागाला त्या प्लेटलेट चिकटू नयेत ह्यासाठी आपण इलाज करू शकतो. ह्यासाठी अतिशय परिणामकारक आणि स्वस्त औषध आपल्याकडे गेली पन्नास वर्षे उपलब्ध आहे. ज्याचं नाव स्प्रो किंवा ऍस्परिन आहे, आणि ते अगदी सहज मिळतं. ते आपण फक्त डोकेदुखी साठी सर्रास वापरतो. पण त्याची दुसरी एक खासियत अशी आहे की ह्या ऍस्परिन मुळे रक्तवाहिन्यांना प्लेटलेट चिकटण्याचे प्रमाण खूपच कमी होतं. ही झाली एक गोष्ट. कारण औषध हा एकच काही आरोग्यावर इलाज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जीवनशैलीत जर काही मी बदल केले, आहारात जर चांगले बदल केले तर रक्तवाहिन्या खराब होण्याच्या प्रक्रियेला खीळ बसू शकते. त्यामुळे ही तपासणी करणं महत्त्वाचं आहे. ही झाली शितावरून भाताची परीक्षा. जर तुमच्या केरॉकीड आर्कीड उत्तम असतील तर मेंदूकडे जाणा-या रक्तवाहिन्या उत्तम असतीलच ह्याची खात्री बाळगा. आणि ह्या जर खराब निघाल्या तर मेंदूतल्या आतल्या सुद्धा रक्तवाहिन्यांना काहीतरी खराबी आहे हे प्रतीत होतं. त्याचावरती प्रिव्हेंटीव इलाज आहेत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट.