Print
Hits: 9395

मणके आणि मज्जारज्जूबद्दल सांगायचे झाल्यास पहिली व्याधी येते, ती म्हणजे तुम्हा सर्वांना माहित असलेली - स्पॉन्डिलोसिस. सांध्यांची वयोमानानुसार थोडी पडझड होणं म्हणजे स्पॉन्डिलोसिस. पण वयोपरत्त्वे होणा-या पडझडीपेक्षा कित्येक पटीने जास्त जर ती पडझड झाली, तर तो बहुदा स्पॉन्डिलोसिसच असतो. स्पॉन्डिलोसिसमुळे माझी पाठ दुखते, किंवा स्पॉन्डिलोसिसमुळे माझी मान कडकड वाजते असा लोकांचा भ्रम असतो; पण तसं नसतं. सहसा स्पॉन्डिलोसिस ह्या हाडात होणा-या व्याधीमुळे तुमची मान किंवा पाठ किंवा कंबर दुखत नाही. तर स्पॉन्डिलोसिस बरोबरच तुमच्या मणक्या लगत असलेले लिगामेंट्स किंवा स्नायू यांच्यात पण कमकुवतपणा येतो, यांच्यातलाही स्टिफनेस वाढतो. आणि त्यामुळे मानदुखी वगैरे सुरू होते. व्यायाम करणे हे स्पॉन्डिलोसिससाठी अतिशय महत्त्वाचे. तुमची रोजची रहाण्याची पद्धत कशी आहे? तुमची रोज मोटर्सायकल चालवताना वाकून बसता का? प्रमाणापेक्षा खूप जास्त मोटरसायकल चालवता का? ऑफिसमधे कसे बसता? ह्या सर्व गोष्टी जर पहिल्यापासून विचारपूर्वक नीट केल्या तर तुमचा स्पॉन्डिलोसिस टळू शकतो. अनेक लोकांचा एक समज असतो, की स्पॉन्डिलोसिस असला की एक एम.आर.आय करून टाकावा. हा गैरसमज आहे, कारण १०० पाठदुखी असणा-या माणसांमधे फक्त एखाद्यालाच एम.आर.आय. लागतो. तुमची हिस्टरी ऐकणं, लक्षणं ऐकणं, तपासणी करणं हेच प्रिव्हेंटीव्ह मेजर आहे. योग्य तो सल्ला घेणं, नको ते सल्ले टाळणं आणि थोडीशी स्वत:ला शिस्त लावणं हेच ह्याकरता करावं लागतं. तेव्हा लक्षात ठेवा, विशेषत: साठी सत्तरी नंतर तुम्हाला जेव्हा असं वाटेल की तुमची हाता पायातली हलचाल मंद व्हायला लागली आहे, कडकपणा - स्टिफनेस वाढतो आहे, पूर्वी सारखा चालण्याचा वेग राहिला नाही, तेव्हा त्यातून स्वत: निष्कर्ष काढू नका. कबूल आहे की ह्या गोष्टी वयोपरत्वे होतात, परंतु स्वत: निष्कर्ष काढणे पूर्ण धोकादायक. तुमच्या जवळ असलेला तुमचा फॅमिली डॉक्टर असेल, ऑर्थोपेडिक असेल किंवा न्यूरॉलॉजिस्ट असेल, त्यांना तुमच्या तब्येतीचे निष्कर्ष काढू देत.

मानेचा स्पॉन्डिलोसिस, कमरेचा स्पॉन्डिलोसिस, मानेच्या रक्तवाहिन्यांमधील खराब्या, आणि बुद्धीभ्रंश या चारही गोष्टी समाजात खूप प्रमाणात आढळतात. आज आपल्या घरात, शेजारच्या घरात आपण ह्या तक्रारी ऐकत असतो आणि का माहित नाही, पण आपण काणाडोळा करतो. हा करू नये! ह्यातल्या कुठल्याही तपासण्या महाग नाहित, औषढे महाग नाहित, पण जागरुकता आणि थोडी शिस्त ह्याची आपल्या समाजात खूपच गरज आहे. ही शिस्त आपल्या समाजात खूपच अभावाने आढळते. समाजाचं स्वास्थ्य जर वाढलं तर तेच डॉक्टरचं काम चोख केल्याची पावती आहे.