Print
Hits: 6639

किमोथेरपी या शब्दाची ’कँन्सर’ इतकीच दहशत आहे. वेळप्रसंगी मोठमोठी ऑपरेशन्स करुन घेताना न डगमगणारे लोक किमोथेरपीला मात्र गडबडतात. किमोथेरपी टाळता येते का याची चाचपणी केली जाते. अनेक ’सेकंड ओपिनियन’ घेतले जातात. खर्च, अशक्तपणा, भीती यापासून थेट ’घरातलं लग्न’ अशा सबबी सांगून होतात. आणि मग नाईलाजस्तव किमोथेरपी सुरु होते. मनात प्रश्न असतोच "हे काय आहे, कशासाठी आहे..."

किमोथेरपी म्हणजे कँन्सरवर रसायनांद्वारे केलेले उपचार. इतर आजारांवर ज्याप्रमाणे गोळ्या-इंजेक्शन्स असतात. तशीच किमोथेरपी ही कँन्सरवर वापरण्यात येणारी गोळ्या-इंजेक्शन्स आहेत ( हो किमोथेरपीच्या गोळ्यादेखील असतात). ही किमोथेरपी गेली कित्येक वर्षे वापरात आहे. दुसरया महायुधाच्या वेळी शोध लागलेल्या जैवरासायनिक अस्त्रांच्या चाचणीत असे आढळून आले की या अस्त्रांमुळे रक्तातील पांढ-या पेशींचे प्रमाण कमी होते. याचा उपयोग पांढ-यां पेशींच्या कँन्सर मध्ये सुरु झाला आणि किमोथेरपीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. जैवशास्त्रात झालेल्या प्रगतीबरोबर किमोथेरपीच्या औषधामध्ये देण्याच्या पध्द्ती होणारे फ़ायदे त्यातील त्रास यात आमूलाग्र बदल झाला आहे. फ़क्त कँन्सरग्रस्त अवयवच नव्हे तर प्रत्यक्ष पेशींमध्ये शिरुन त्यातील दोष हेरुन त्यावर मात करणारी किमोथेरपी आता सहज उपलब्ध आहे.

काही आजार हे फ़क्त किमोथेरपीनेच पुर्ण बरे होतात ( उदा. रक्ताचे कँन्सर - ल्युकेमिया व लिम्फ़ोमा). या आजारांसाठी ऑपरेशनचा उपयोग फ़क्त रोगनिदानापुरताच असतो. मात्र ही किमोथेरपी त्रासदायक आणि चांगलीच जहाल असल्यामुळे ह्या प्रकारच्या आजारांवर मोठया व सुसज्ज रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच या किमोथेरपीबरोबर रक्त व रक्तघटकांचाही सतत पुरवठा हवा असतो."ऑपरेशन झालंय मग किमोथेरपी हवीच कशाला" हा प्रश्न अनेकांना पडतो.

ऑपरेशन्मुळे दृश्य स्वरुपातील गाठ काढून टाकलेली असली तरी कँन्सरच्या सूक्ष्म पेशी शरीरात इतरत्र पसरु शकतात व कँन्सर पुन्हा उदभवतो. ही आपत्ती टाळण्यासाठीच ऑपरेशननंतर किमोथेरपी दिली जाते. स्तन, स्त्रीबीजकोष (ovary) मोठे आतडे व हाडाचे कँन्सर यात किमोथेरपी दिल्याने आयुष्यमान वाढते हे सिद्ध झालेले आहे.

किमोथेरपी बद्दल माहिती कमी व गैरसमज जास्त आहेत. इंजेक्शन देताना प्रचंड वेदना होतात. खूप उलट्या होतात. उकडलेले अन्नच खावे लागते एकंदरीतच फ़ार हाल होतात अशी भीती अनेकांना वाटते. खरंतर असे त्रास फ़ार कमी लोकांना होतात. किमोथेरपी घेताना काही सोपी पथ्ये पाळ्ल्यास त्रास होत नाही किंवा कमी त्रास होतो. साधा समतोल आहार (पोळी भाजी वरण भात), अतितेलकट अतिमसालेदार अन्न टाळणे पाणी भरपूर प्रमाणात पिणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे व वेळप्रसंगी तपासून घेणॆ यामुळॆ किमोथेरपी त्रास कमी होण्यात मदत होते. किमोथेरपी चे अनेक अभिनव व अत्यंत कमी त्रासदायक प्रकार (targeted therapy, monoclonal antibodies) आता उपल्बध आहेत. हे उपचार सर्वाना लागू पडतीलच असे नसले तरी ह्या उपचारांबद्द्ल माहिती करुन घेण्याची गरज आहे.

किमोथेरपी ही कँन्सर वरील एक प्रगत व प्रभावी उपचारपध्द्ती आहे. किमोथेरपी ही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य आहे. इतर कोणत्याही औषधांप्रमाणेच योग्य रुग्णांमध्ये योग्य रितीने वापरल्यास कँन्सर पुर्ण बरा करणॆ. आटोक्यात आणणे किंवा टाळणॆ हे किमोथेरपीमुळे शक्य आहे. ऎकीव माहिती अतिरंजित दुष्परिणांमांची वर्णने व गैरसमज यावर विश्वास न ठेवता डॉक्टरांशी स्पष्ट चर्चा केल्यास किमोथेरपी घेणे नक्कीच सुसह्य होइल.

Dr.Chetan Deshmukh MD,
DNB (Medicine) DM (Medical Oncology) Certified Medical Oncologist,
European Society of Medical Oncology Honorary Oncophysician,
B.J.Medical College and Sassoon General Hospital.