महरास्ट्रा टाईम्स
30 Aug 2012
पुणे ,
शाळेच्या पहिल्या इयत्तेचे धडे गिरवत असतानाच दोन चिमुकल्यांच्या हाताला व्हाइटनर लागले आणि त्यांनी पेन्सिल सोडली. प्रत्येक वर्षी शैक्षणिक प्रगती व्हावी अगदी तशी एका व्यसनाकडून दुस-या गंभीर व्यसनाकडे वाटचाल सुरू झाली. ' आमचे चुकले. आता आम्हाला परत समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं आहे '... या भावना आहेत अवघ्या आठ आणि नऊ वर्षांच्या भावंडांच्या! ...
' वडील बाहेरगावी नोकरीला असतात , आई दिवसभर कामाला जाते. शाळेतल्या मित्रांकडून व्हाइटनरची माहिती मिळाली. गंमत म्हणून अनुभव घेतला आणि व्यसनच लागले. व्हाइटनरसाठी पैसे हवेत , म्हणून अवघ्या चाळीस रुपयांसाठी शाळा सोडून गोठा साफ करायला या मुलांनी सुरुवात केली. पुढे फ्लेक्झिबाँडचीही चटक लागली. पण शाळेतील अनुपस्थितीची माहिती शिक्षकांनी पालकांना सांगितल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आता निराश झालेल्या पालकांनी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडे धाव घेतली आहे. ही काही एक घटना नाही. लहान मुलांच्या अशा अनेक तक्रारी सध्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होत आहेत. त्यामुळेच व्हाइटनरचे व्यसन लागलेल्या मुलांसाठीही स्वतंत्र कार्यशाळा घेण्याची वेळ आली आहे ,' अशी माहिती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष अजय दुधाने यांनी दिली.
केंद्रातर्फे नुकतीच सतरा वर्षांखालील मुलांसाठी व्हाइटनर व्यसनमुक्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विविध आर्थिक स्तरांतील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. दुर्दैवाने प्रत्येक मुलाची केस धक्कादायक होती. ' या शिबिरादरम्यान मुलांचे व्यसन सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपचारांबरोबरच त्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे मत जाणून घेतले. त्यावेळी काही मुलांच्या मनात गुन्हेगारी वृत्ती निर्माण झाल्याचे तर काही मुले पालकांकडून असमाधानी असल्याचे , त्यांना नैराश्य , न्यूनगंड आल्याचे किंवा त्यांच्यामध्ये क्रेझ असल्याचे दिसून आले. व्हाइटनरची नशा ही गंभीर समस्या झाली असून केंद्रात उपचार घेत असलेल्या ६८ पेशंटपैकी सोळा पेशंट हे व्हाइटनरचे व्यसन लागलेले आहेत. त्यामुळे याबाबत सातत्याने जागृतीपर उपक्रम आखण्याची गरज आहे ,' असे मत दुधाने यांनी व्यक्त केले.