महाराष्ट्र टाइम्स
१३ एप्रिल २०१२
पुणे भारत
बालदम्याविषयी पालकांसाठी सपोर्ट ग्रुपची स्थापना
दम्याच्या प्रमाणात आठ वर्षांत तिपटीने वाढ
लहान मुलांमधील दम्याचे (अस्थमा) गेल्या आठ वर्षांत प्रमाण वाढले असून, ते आठ टक्क्यांपेक्षा म्हणजेच तिप्पट झाल्याची माहितीही समोर आली आहे. पालकांना धीर देत मुलांच्या अस्थमाची 'श्वास' नावाचा सपोर्ट ग्रुप आता काळजी घेणार आहे.
चेस्ट रिसर्च फाउंडेशनने (सीआरएफ) लहान मुलांच्या वाढत्या दम्याची गंभीर दखल घेतली आहे. 'श्वास'च्या संयोजिका मोनिका चोप्रा यांनी 'मटा'ला अधिक माहिती दिली. 'गेल्या काही वर्षांत शहरातील लहान मुलांमधील दम्याचे प्रमाणही वाढत आहे. अपत्याला दमा झाल्याचे सत्य पालक सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्याचा आजार वाढल्यानंतर त्यावर उपचार काय आणि कसे करावेत यात त्यांचा गोंधळ उडतो. अशा पालकांसह मुलांना आधार मिळावा यासाठी सीआरएफ संस्थेने श्वास नावाचा सपोर्ट ग्रुप स्थापन केला आहे. त्या सपोर्ट गुपअंतर्गत पालकांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर करावेत, त्यांच्या मुलांवर उपचारासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या, त्याचे व्यवस्थापन कसे केले याबाबत त्यांचे अनुभव इतरांना सांगावेत यासाठी हा ग्रुप काम करील. अशा प्रकारचा देशातील पहिलाच ग्रुप स्थापन झाला आहे,' अशी माहिती चोप्रा यांनी दिली.
मुला-मुलींना लहान वयात येणारा सतत खोकला, सदीर्मुळे सातत्याने वाहणारे नाक ही त्याची लक्षणे आहेत. परंतु, किरकोळ औषधोपचार करूनही आजार बरा होत नाही. त्याचे नेमके कारण त्यांना कळत नाही. योग्य वेळीच त्यांच्यावर उपचार झाल्यास सात वर्षांत हा आजार बरा होऊ शकतो. औषधांमध्ये पॅरासिटेमॉलचा अधिक वापर, घरातील ओल्या भिंती, वन रूम किचनमधील व्हेंटिलशेनचा अभाव, सिझेरियन डिलिव्हरीसारख्या कारणांमुळे लहान मुलांना दमा होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथे संपर्क साधा...
सीआरएफने २००३ मध्ये केलेल्या पाहणीत लहान मुलांमध्ये दम्याचे २.५ टक्के एवढे प्रमाण होते. २००८ मध्ये ते ५.५ टक्के झाले. २०१२ मध्ये मात्र ते साधारण आठ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख डॉ. सुदीप साळवी यांनी दिली. मुलांना दमा असणाऱ्या पालकांनी ९८२२४५७२५८ यावर मोनिका चोप्रा यांना संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.