सकाळ
4 Jun 2012
मुंबई –डॉक्टर म्हणजे देवाचं रूपच, ते म्हणतील ती पूर्व दिशा... ही डॉक्टरांवर असणारी प्रगाढ श्रद्धा आता लोप पावली आहे. डॉक्टरांकडे जायचं म्हणजे आता टेन्शन येतं, खिशाला किती भुर्दंड पडणार कोणास ठाऊक, असा विचार सध्या मुंबईकर करीत आहेत. "मेडस्कॅप इंडिया'ने नुकत्याच केलेल्या एका पाहणीमध्ये डॉक्टरांवरील वाढत्या अविश्वासाची विविध कारणे मुंबईकरांनी स्वानुभवाने कथन केली.
मेडस्कॅप इंडिया ही वैद्यक क्षेत्रातील शासकीय, तसेच बिगरशासकीय अशा 21 संस्थांसोबत एकत्रितरीत्या काम करते. 732 मुंबईकरांसोबत केलेल्या चर्चेतून डॉक्टरांवर आता विश्वास राहिला नाही, असा सूर व्यक्त होताना दिसतो. "मेडस्कॅप इंडिया'च्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांना भारतीय आरोग्य व्यवस्थेसाठी हा सर्वांत कठीण काळ असल्याचे वाटते. यापूर्वी डॉक्टर म्हणजे रुग्णांसाठी दैवत होते. कालानुरूप फॅमिली डॉक्टर ही मोडीत निघालेली संकल्पना, त्यात सुपरस्पेशालिटीचे फुटलेले पेव, डॉक्टरांकडून असंख्य छोट्या आजारांसाठी केल्या जाणाऱ्या हजारो तपासण्यांमुळे रुग्णांचा विश्वास उडत चालला आहे.
केवळ आजारासाठीच नव्हे, तर वैद्यक क्षेत्रातील अनेक छोटे-मोठे बदल, घडामोडी यासाठी फॅमिली डॉक्टर फार मोठा "सोर्स' होता. प्रत्येक कुटुंबातील सदस्य, त्यांची प्रकृती, पथ्ये, ऍलर्जी यासारख्या सूक्ष्म नोंदी त्याच्याकडे असत. सुपरस्पेशालिटीमुळे ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. त्याचाच फटका डॉक्टरांच्या विश्वासार्हतेस बसू लागल्याचे निष्पन्न होतेय. क्षुल्लक दुखण्यांसाठी आकारला जाणारा अवाच्या सवा खर्चही रुग्णांसाठी नाहक भुर्दंड होत आहे. या खर्चाची धास्ती घेऊन आजारी पडणे म्हणजे शिक्षाच, अशी भावना मुंबईकरांनी या सर्वेक्षणातून व्यक्त केली आहे.