सकाळ
21 मे 2012
नवी दिल्ली - एमबीबीएसची पदवी मिळविण्यापूर्वी प्रत्येक डॉक्टरला किमान एक वर्ष खेड्यात काम करणे सक्तीचे करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला पत्र लिहिले असून, डॉक्टरांना ग्रामीण भागात काम करण्याबाबत सक्तीचे करण्यास सांगितले आहे. तसेच, याचा अभ्यासक्रमात समावेश असल्याचेही स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, की डॉक्टरांना केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत ग्रामीण भागात काम करणे सक्तीचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यास मदत होईल.
एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात एकदा या प्रस्तावाचा समावेश केल्यानंतर वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला, की हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना एक वर्ष खेड्यात काम करणे सक्तीचे आहे. त्यानंतरच त्यांना पदवी देण्यात येईल.