महाराष्ट्र टाईम्स
०५ सप्टेमबर २०१२
पुणे, भारत.
' हातामध्ये पांढरी काठी , डोळ्यावर काळा चष्मा , हिंडण्या – फिरण्यासाठी कायमच डोळसांच्या मदतीची अपेक्षा मनी बाळगणारा एक व्यक्ती म्हणून तुमच्या मनांमध्ये आम्हा अंधांची प्रतिमा निर्माण झालेली आहे . आता तीच प्रतिमा आम्हाला बदलायची आहे . परीक्षांमध्ये आम्ही रायटर वापरतो , म्हणून लोक आमच्या क्षमतांवर संशय घेतात . तो संशय एका खात्रीमध्ये आम्हाला बदलायचा आहे ...'
सतीश नवले सांगत होते . स्वतः अंध असलेले , परंतु उच्चशिक्षणाच्या बळावर स्वतः सोबतच इतर दृष्टिहीनांना आयुष्य जगण्याची वेगळी दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीमधूनच आता ' नेत्रज्योती जनजागृती अभियान ' या निवासी उपक्रमाची मुहुर्तमेढ रोवली गेली . समाजामध्ये अंधत्व , त्याचे परिणाम , त्यामधून बचावासाठीचे उपाय आणि अंध व्यक्तिंसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती प्रसारित करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून चाललेली त्यांची धडपड समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे .
नवले म्हणाले , ' भारतातील अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी मी नुकताच ' प्रेरणा समावेषीत शिक्षण संशोधन व जनजागृती प्रकल्प ' सुरू केला आहे . त्याच्याच पुढचा आणि विस्तृत टप्पा म्हणून हे अभियान आहे . सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी तालुक्यातील मडिगले सात विद्यार्थ्यांच्या सोबतीने हे अभियान सुरू केले आहे . आम्हाला आवश्यक त्या संसाधनांची पूर्तता झाली , की लवकरच राज्याच्या इतर भागांमध्ये हे अभियान सुरू करण्याचा आमचा मानस आहे .'
या अभियानाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सकाळी पाच ते रात्री साडेनऊ या काळामध्ये निरनिराळ्या उपक्रमांच्या आधारे शैक्षणिक आणि जीवनावश्यक बाबींचे शिक्षण – प्रशिक्षण पुरविण्यात येते . यामध्ये गोकार्य व्यवस्थापन , व्यायाम , दैनंदिन शालेय अभ्यासक्रम , शेतकी शिक्षण , स्वयंपाककला , खेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कम्प्युटरच्या आधारे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठीचे प्रयत्न आदी बाबींचा समावेश करण्यात आल्याचे नवले यांनी सांगितले .
या अभियानामध्ये अंधत्वाची माहिती देण्यासोबतच नेत्रदानाचा प्रसार करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत . त्याच जोडीने ते समाजाला जिवंतपणीच दृष्टीदान करण्याचे आवाहनही करत आहेत . या उपक्रमाचा भाग असलेली माहिती प्रात्यक्षिकांसह राज्यभर शालेय पातळीपासून ते गावपातळीपर्यंत सर्व ठिकाणी प्रसारित करण्याचा त्यांचा मानस आहे . तसेच यातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे दृष्टिहीनांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या अभ्यासक्रमाचीही त्यांना सुरुवात करावयाची आहे .
त्यासाठी त्यांना तीन कम्प्युटर , दोन मोबाइल आणि एका रेकॉर्डरची गरज आहे . त्यासोबतच हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी घरच्या घरून शिक्षक , वाचक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचीही त्यांना गरज आहे . या प्रकल्पामध्ये एम . एड ., बी . एड ., डी . एड ., एम . एस . डब्ल्यू ., इंजिनीअरिंग आदी शाखांचे विद्यार्थीही अंधांसाठी उपयुक्त प्रकल्पांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात . इच्छुकांनी नवले यांच्याशी ९४०५८६४३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहनही त्यांनी केले आहे .
' नेत्रज्योती जनजागृती अभियान ' – वैशिष्ट्ये
अंधासाठी शालेय शिक्षणावर आधारीत समावेषित शिक्षणाचा निवासी स्वरूपातील पहिलाच प्रकल्प
अंध विद्यार्थ्यांसोबतच सामान्य विद्यार्थ्यांनाही शिक्षण – प्रशिक्षण देता येणे शक्य .
गोकार्य व्यवस्थापन , व्यायाम , दैनंदिन शालेय अभ्यासक्रम , शेतकी शिक्षण , स्वयंपाककला , खेळ , कम्प्युटरच्या आधारे शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या उपक्रमांचा समावेश