ई सकाळ
२१ नोव्हेंबर २०११
पुणे भारत
लोकसंख्येच्या तुलनेत पुण्यातील रुग्णालयांमध्ये सुमारे पाच हजार खाटांचा तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील 31 लाख लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 14 हजार खाटा रुग्णालयांमध्ये आवश्यक आहेत. प्रत्यक्षात खासगी, धर्मादाय, महापालिका आणि सरकारी रुग्णालये मिळूनही शहरातील खाटांची संख्या नऊ ते दहा हजारांपेक्षा जास्त होत नाही. आरोग्यासारख्या सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत गांभीर्याने पाहिले नसल्याचेही यातून अधोरेखित होत आहे.
शहरातील आरोग्य व्यवस्थेत सर्वांत मोठा वाटा धर्मादाय रुग्णालयांचा आहे. पुण्यात 49 धर्मादाय रुग्णालयांत पाच हजार 982 खाटा आहेत. पालिकेची एकूण 43 रुग्णालये आणि दवाखाने आहेत. त्यापैकी 14 प्रसूतिगृहे आहेत. पालिकेच्या या सर्व रुग्णालयांमध्ये जेमतेम 600 खाटा आहेत. उर्वरित खाटा खासगी रुग्णालयांमध्ये असून, त्यांची सेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. ससून या सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयात 1100 पर्यंत खाटा आहेत. सर्वसामान्यांना अगदी सहज उपलब्ध होईल अशी प्राथमिक आरोग्याची सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. पण सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कायमच डोळेझाक केली आहे. दोन वर्षांपूर्वी उद्भवलेल्या "स्वाइन फ्लू'च्या उद्रेकाने पालिकेची आरोग्य व्यवस्था किती पोखरली गेली आहे, हे स्पष्ट झाले होते.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर महापालिका हद्दीत "हेल्थ पोस्ट' करणे बंधनकारक आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये समान पद्धतीने "हेल्थ पोस्ट'चे वाटप करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र पुण्यातील मध्य वस्तीमध्ये ही सर्व आरोग्य सेवा केंद्रित झाल्याचे दिसते. बुधवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ या भागात ही केंद्रे आहेत. या विरुद्धची स्थिती सिंहगड व सातारा रस्ता येथील नव्याने महापालिका हद्दीत आलेल्या भागांमध्ये आहे. तेथे आरोग्याच्या पायाभूत सेवा पुरविण्याची कोणतीही तसदी सत्ताधाऱ्यांनी इतक्या वर्षांमध्ये घेतलेली नाही. आरोग्य विभागाच्या कागदावर दिसणाऱ्या "हेल्थ पोस्ट'ना प्रत्यक्षात नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी आहे.
पालिकेच्या आरोग्य सेवा फक्त पूर्व भागात म्हणजे रेल्वे स्थानक, मंगळवार पेठ, मगरपट्टा, भवानी पेठ येथे केंद्रित झाल्या असून, दक्षिण भागातील पर्वती, सिंहगड रस्ता, कर्वेनगर आणि उत्तर भागातील गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी मोजकेच दवाखाने आहेत. पूर्व भागात डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय, नुकतेच अद्ययावत करण्यात आलेले कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे प्रसूतिगृह अशी वेगवेगळी सात रुग्णालये आहेत. पश्चिम भागात पाच रुग्णालये असून, त्यात जयाबाई नानासाहेब सुतार, सहदेव एकनाथ निम्हण या रुग्णालयांचा समावेश होतो. आंबिल ओढा या झोपडपट्टीच्या भागात मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह हे रुग्णालय आहे. मातामृत्यूकडेही पालिकेने लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट होते.