सकाळ वृत्तसेवा
१६ मे २०११
मुंबई, भारत
मज्जातंतूशी निगडित असणाऱ्या "मल्टिपल स्क्लेरॉसिस' या व्याधीत वापरण्यात येणाऱ्या नव्या उपचारपद्धतीबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची मान्यता नसणारी "लिबरेशन' ही उपचारपद्धती सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे तिचा वापर इतक्यात करू नये, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. मज्जारज्जूमधील गुंतागुंत सोडविण्यासाठी "लिबरेशन' ही उपचारपद्धती सध्या वापरात आहे. यात रक्तवाहिन्यांचे अडथळे असताना मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह हा शस्त्रक्रिया करून मोकळा केला जातो.
या शस्त्रक्रियेत "बलून ऍन्जिओप्लास्टी'चा वापर करून "लिबरेशन' ही पद्धती वापरात आणली जाते. ही शस्त्रक्रिया करताना फुग्याचा वापर केला जात असल्याने हे उपचार करणे योग्य आहे की नाही याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. ही व्याधी रक्ताशी संबंधित असल्याने मज्जारज्जूच्या या व्याधीस "ऑटोइम्यून' पद्धतीत वर्गीकरण करण्याची आवश्कयता नसल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रुग्णांना देण्यात येणारी "लिबरेशन' पद्धती ही भारतात अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची अद्याप मान्यता नाही, याशिवाय या पद्धतीचा लाभ झाल्याची; तसेच दीर्घकाळासाठी त्याचा रुग्णास फायदा झाल्याचेही कोणतेही लक्षण अद्याप दिसून आलेले नाही. त्यावर तसे ठोस संशोधनही सुरू नसल्यामुळे पाश्चिमात्य देशातील डॉक्टरांकडूनही या प्रणालीस हिरवा कंदील मिळालेला नाही. मज्जारज्जूच्या या विकारात ही शस्त्रक्रिया केल्यानंतरही रुग्णास औषधे; तसेच गोळ्यांवर विसंबून राहावे लागत असल्याने नव्या उपचारपद्धतीबाबत मुंबई हॉस्पिटलच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेचे मज्जातंतूशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ब ी. एस. सिंघल यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही "ऑटोइम्यून' विकारात शरीरातील प्रतिकारक्षमता ही आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध लढते. ज्याला वैद्यकीय परिभाषेत "मायेलिन शीथ्स' असे संबोधले जाते. या रुग्णांना सुरुवातीस "स्टेरॉईड्स', त्यानंतर "इंटरफ्रॉन'; तसेच काही प्रतिजैविके दिली जातात. या औषधांचा परिणाम म्हणून मज्जातंतूवर आलेली सूज कमी होते. त्यामूळे अपंगत्व किंवा अर्धांगवायूसारख्या व्याधीचा धोका कमी होतो. औषधांचा पर्याय उपलब्ध असताना "लिबरेशन' थेरपीचा वापर करणे सुसह्य नसल्याचे नायर रुग्णालयातील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निर्मल सूर्या यांनी "सकाळ'ला सांगितले.
भारतात दहा हजार रुग्ण
भारतात दहा हजारपेक्षा अधिक रुग्ण या व्याधीने ग्रस्त आहेत. 20 ते 40 वयोगटामधील "एमएस'चे रुग्ण अधिक दिसून येतात. मज्जातंतू प्रणालीतील मज्जातंतूवर आवरण करणाऱ्या आवरणाला इजा झाल्यानंतर ही व्याधी उद्भवते. याची ठोस वैद्यकीय कारणे अद्याप सापडली नसली तरीही आनुवांशिक, पर्यावरणातील काही घटकांचे मिश्रण, "ड' जीवनसत्त्वाची कमतरता अशी विविध कारणे त्यात दिसून येत आहेत.