सकाळ वृत्तसेवा
३० एप्रिल २०११
पुणे, भारत
प्रतिजैविकांनाही (अँटिबायोटिक्स) प्रभावहीन करण्याची प्रतिकारशक्ती असलेला "सुपर बग' पुण्यातही आढळून आला आहे. ससून रुग्णालयात ऑगस्ट ते डिसेंबर 2010 या चार महिन्यांच्या काळात केलेल्या सर्वेक्षणात "सुपर बग' असलेले वीस रुग्ण आढळून आले आहेत, तर 180 रुग्णांमध्ये बहुऔषधी प्रतिकारशक्ती तयार झाल्याचे आढळून आले, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. रेणू भारद्वाज यांनी दिली.
राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था व ससून रुग्णालय यांच्यावतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. देशातील अन्य शहरांमध्ये "सुपर बग' आढळून आल्यानंतर पुण्यात काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यावर पुढील संशोधन सुरू आहे. यामध्ये डॉ. भारद्वाज यांच्यासह राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे, डॉ. सुवर्णा जोशी, डॉ. वैशाली ढोरे यांनी भाग घेतला. याबद्दल भारद्वाज यांनी सांगितले, ""या चार महिन्यांच्या काळात ससूनमध्ये आलेल्या रुग्णांपैकी एक हजार 340 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 180 नमुन्यांमध्ये तीनपेक्षा जास्त प्रतिजैविकांना प्रतिकार करणारे जिवाणू आढळून आले. या जिवाणूंच्या जनुकरचनेतहीबदल झाल्याचे आढळून आले. त्यामुळे हे नमुने राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेकडे (एनसीसीएस) पाठविण्यात आले. तेथे त्यातील 20 नमुने हे सर्वच प्रकारच्या प्रतिजैविकांना प्रतिकार करू शकणारे म्हणजेच "सुपर बग' प्रकारातील असल्याचे आढळून आले. यामध्ये आठ ते 80 वयोगटातील स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण त्यांच्या मूळ आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. जास्त काळ अतिदक्षता विभागात राहिलेले आणि जास्त काळ प्रतिजैविके घेतलेल्या रुग्णांचे यामध्ये जास्त प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. हे रुग्ण आता या जिवाणूंचा प्रसार करणारे ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्यासंबंधी काळजी घेण्यासाठी पुढील उपाय करण्यात येणार आहेत. याशिवाय ससूनमधील संसर्ग नियंत्रण समितीची बैठक घेऊन रुग्णालयातही योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. प्रतिजैविकांच्या वापरासंबंधी ससून रुग्णालयाने एक धोरण ठरविले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.''
घाबरण्याचे कारण नाही
'ससूनमध्ये "सुपर बग'चे रुग्ण आढळून आले असले, तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासंबंधी योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या असून येथील शस्त्रक्रियाही सुरक्षित वातावरणात होत आहेत. यासंबंधी कर्मचारी आणि रुग्णांचेही प्रबोधन करण्यात येत आहे,'' असे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. रेणू भारद्वाज यांनी स्पष्ट केले.