सकाळ वृत्तसेवा
०७ जुलै २०१०
मुंबई, भारत
मागील वर्षापेक्षा यंदा मलेरियाच्या रुग्णांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून मलेरियाची ही साथ यंदा डोक्याला "ताप'देणारी ठरू शकते. त्यामुळे पालिकेने शहरात ठिकठिकाणी डासांना पळवून लावणारी धूरफवारणी मोहीम हाती घेतली आहे. स्वाईन फ्लूच्या साथीचा धसका घेणारे अनेक मुंबईकर मलेरियाच्या तापाकडे लक्ष देत नाहीत, हे लक्षात घेऊन सार्वजनिक रुग्णालयांप्रमाणेच शहरांच्या विविध भागांतील डॉक्टर तसेच मेडिकल स्टोअरमध्येही मलेरियापासून सावध राहण्याचा इशारा पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी कीटकनाशक अधिकारी आणि अग्निशमन विभाग तसेच तज्ज्ञ कीटकनाशक अधिकारी यांच्या मदतीने एकत्रितपणे तीन दिवसांपासून डासप्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मध्य तसेच पश्चिम रेल्वे तसेच पडीक गिरण्यांच्या जागा तसेच विविध बांधकामांच्या ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये युनायटेड इंडिया मिल, टाटा मिल, गोल्ड मोहर मिल, भारतमाता, दादासाहेब फाळके मार्गावरील काही ठिकाणी मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी ही धूरफवारणी करण्यात आली होती. तसेच आज शहरांमध्ये पाच ठिकाणी आरोग्य शिबिरेदेखील घेण्यात आली. यात एकूण 649 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 73 रुग्णांचे नमुने हिवताप रक्ततपासणी, 98 मुलांना लसीकरण करण्यात आले. याच परिसरातील 2381 घरांमधील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाचे रुग्ण शहरांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात सापडले असल्याचे दिसून येण्यामागील कारण विशद करताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. आम्बे यांनी शहरातील वाढते बांधकाम, प्रदूषण तसेच अस्वच्छता ही सारीच कारणे डासांची पैदास होण्यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले. शहरातील चारशेहून अधिक बांधकामांच्या ठिकाणी जाऊन डास मारण्यासाठी फवारणी करण्यासोबतच येथे मलेरियाची लागण झालेल्या मजुरांवरही उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरांतील झोपडपट्ट्या, तुंबलेल्या पाण्यांच्या ठिकाणीच मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून आलेले नाहीत, तर मलबार हिल, वांद्रे, मरीन लाइन्ससारख्या उच्चभ्रू वस्तीमध्येही मलेरियाच्या रुग्णांची संख्या तितकीच मोठी आहे. मलेरिया ही केवळ झोपडपट्ट्यांमध्ये पसरणारी साथ नसून जेथे डासांची पैदास होते, त्या ठिकाणी मलेरियाची साथ पसरण्याचा धोका असतोच, असेही डॉ. आम्बे यांनी सांगितले. या साथीच्या तापासाठी कोणीही घरगुती उपाय करणे किंवा मेडिकल स्टोअर्समधून तात्पूरती औषधे नेण्यापेक्षा मलेरियाची तपासणी करून त्वरित औषध सुरू करण्यावर भर देण्यासाठी मार्गदर्शन मोहीमही हाती घेण्यात आली आहेत. मलेरियाच्या तापाची लक्षणे दिसताच कोणते औषधोपचार सुरू करावेत, यासाठी पत्रकेही शहरांतील डॉक्टर्स तसेच केमिस्टना पाठवण्यात आली आहेत.